त्रिभाषा सूत्राचा दबाव केंद्र सरकारकडून! संजय राऊतांची टीका

| Updated on: Feb 27, 2026 | 11:44 AM

मराठी भाषा दिनानिमित्त संजय राऊत यांनी बंद पडलेल्या मराठी शाळा, प्रशासकीय अधिकाऱ्यांचा ढोंगीपणा आणि त्रिभाषा सूत्राचा उल्लेख करत सरकारवर टीका केली. त्यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी हिंदी सक्तीविरोधात केलेल्या संघर्षाची आठवण करून दिली. तसेच, महाविकास आघाडीतील राज्यसभा जागेच्या तिढ्यावरही भाष्य केले.

मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत यांनी मराठी भाषा, शिक्षण आणि राज्याच्या राजकारणासंबंधित अनेक प्रश्न उपस्थित केले. कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी साजरा होणाऱ्या या दिवसाचे महत्त्व सांगताना त्यांनी महाराष्ट्रात बंद पडत असलेल्या जवळपास 300 मराठी शाळांवर चिंता व्यक्त केली. मराठी भाषेची सक्ती राहील असे सरकार म्हणत असताना शाळा बंद का पडत आहेत, असा सवाल त्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला.

राऊत यांनी प्रशासकीय अधिकारी आणि राजकारणी स्वतःच्या मुलांना मराठी माध्यमात शिकवत नसतील, तर इतरांवर सक्ती करणे निरर्थक असल्याचे म्हटले. त्रिभाषा सूत्राच्या नावाखाली केंद्र सरकारकडून हिंदीची सक्ती केली जात असल्याचा आरोप त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला. या सक्तीविरोधात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्रित संघर्ष केला होता, याची आठवण त्यांनी करून दिली. तसेच, महाविकास आघाडीमधील राज्यसभेच्या एका जागेसाठीच्या रस्सीखेचीवरही त्यांनी भाष्य केले, तिन्ही पक्षांनी एकत्र बसून निर्णय घेण्याची गरज असल्याचे नमूद केले.

Published on: Feb 27, 2026 11:44 AM
Follow Us