Sanjay Raut | 15 कोटी घेतलेत, विकासाच्या गप्पा मारू नका! राऊतांचा मोठा खुलासा

Sanjay Raut | 15 कोटी घेतलेत, विकासाच्या गप्पा मारू नका! राऊतांचा मोठा खुलासा

| Updated on: Jun 21, 2026 | 11:50 AM

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील सहा खासदारांच्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले असतानाच खासदार संजय राऊत यांनी एक महत्त्वाचा खुलासा केला आहे. बंडखोरी करण्यापूर्वी एका खासदाराने दिल्लीत भेट घेऊन सरकारशी जुळवून घेण्याचा सल्ला दिला होता, असा दावा राऊत यांनी केला आहे.

एका मुलाखतीत बोलताना राऊत यांनी संबंधित खासदाराचे नाव न घेता त्यांच्यात झालेल्या संवादाची माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, दिल्लीत झालेल्या भेटीत त्या खासदाराने मतदारसंघातील विकासकामांसाठी निधी मिळत नसल्याची खंत व्यक्त केली होती. तसेच सरकारशी समन्वय साधून काम करण्याचा सल्लाही दिला होता.

यावर प्रतिक्रिया देताना राऊत यांनी थेट प्रश्न विचारला की, “सरकारशी नेमकं कसं जुळवून घ्यायचं? त्यासाठी काही ठरावीक फॉर्म्युला आहे का?” असे त्यांनी विचारले. मात्र संबंधित खासदाराने पुन्हा सरकारशी जुळवून घेण्याचाच आग्रह धरल्याचे राऊत यांनी सांगितले.

यानंतर आपण त्या खासदाराला स्पष्ट शब्दांत सांगितले की, पक्षाने उमेदवारी दिली, निवडणुकीत पाठबळ दिले आणि कार्यकर्त्यांनी मेहनत घेतल्यामुळेच ते खासदार झाले. शिवाय निवडणूक लढवताना विरोधी पक्षात राहून संघर्ष करावा लागेल, याची पूर्ण जाणीव असतानाच त्यांनी निवडणूक लढवली होती, अशी आठवणही करून दिल्याचे राऊत म्हणाले.

तसेच विकासकामांच्या नावाखाली पक्षांतराचा विचार केला जात असल्यास तो केवळ बहाणा असल्याचा आरोपही त्यांनी केला. संबंधित खासदाराला काही आर्थिक लाभ मिळाल्याच्या चर्चा ऐकिवात असल्याचा उल्लेख करत, “त्याला विकास निधी कसा म्हणायचा?” असा सवाल आपण विचारल्याचे राऊत यांनी सांगितले.

दरम्यान, शिवसेनेतील सहा खासदारांच्या बंडखोरीनंतर पक्षांतर्गत संघर्ष अधिक तीव्र झाला असून, या प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण रंगले आहे. संजय राऊत यांनी सांगितलेला हा संवाद सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.

Published on: Jun 21, 2026 11:50 AM
Follow Us