Phaltan Doctor Death : डॉक्टरचा लैंगिक छळ अन्… आरोपी बनकरला 4 दिवस कोठडी, तर फरार PSI बदने पोलिसांना शरण, घडलं काय?
सातारा महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात निलंबित पीएसआय गोपाल बदने फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाला. डॉक्टर महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. प्रशांत बनकरलाही अटक झाली असून, या प्रकरणी राजकीय नेत्यांकडून दोषींवर कारवाईची आणि फास्ट ट्रॅक तपासाची मागणी होत आहे. मुख्यमंत्र्यांनी निष्पक्ष चौकशीचे आश्वासन दिले आहे.
फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी निलंबित पीएसआय गोपाल बदने रात्री उशिरा फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाला. डॉक्टर महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप बदनेवर आहे. जवळपास ४८ तास तो पोलिसांना गुंगारा देत होता. त्याला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. या प्रकरणातील दुसरा आरोपी प्रशांत बनकर यालाही काल पहाटे पुण्यातून अटक करण्यात आली असून, त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
मंत्री पंकजा मुंडे यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन न्याय मिळेपर्यंत शांत न बसण्याचे आश्वासन दिले. मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तर, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोषींवर कारवाईचे आश्वासन दिले असून, या प्रकरणाला राजकीय रंग देऊ नये असे आवाहन केले आहे. पीडित डॉक्टरच्या वडिलांनी या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे.
