Panvel : मविआ नेत्यांच्या मंचावर राज ठाकरे, शेजारी संजय राऊत…पनवेलमध्ये शेकापचा मेळावा
शेतकरी कामगार पक्षाचा ७८ वा वर्धापन दिन मेळावा यंदा पनवेल येथे होत आहे. शेकाप सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील यांच्यासह अन्य दिग्गज मंडळी कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहे. या मेळाव्याचे विशेष आकर्षण म्हणजे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची उपस्थित आहेत.
शेतकरी कामगार पक्ष अर्थात शेकापचा 78 वा वर्धापन दिन यंदा पनवेल येथे आयोजित करण्यात आला आहे. आज 2 ऑगस्टला नवीन पनवेल येथे शेकापचा वर्धापन दिन मेळावा होतोय. दरम्यान, विशेष म्हणजे या मेळाव्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मंचावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे देखील दिसणार आहेत. कारण पनवेलमधील शेकापच्या मेळाव्याला राज ठाकरेंनी हजेरी लावली आहे. यावेळी एकाच मंचावर ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत आणि राज ठाकरे एकाच मंचावर बाजू-बाजूला बसल्याचे पाहायला मिळातंय. यांच्यासोबत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आणि शशिकांत शिंदे हे देखील मंचावर उपस्थित असल्याची माहिती मिळतेय.
दरम्यान, येत्या काही दिवसातच पनवेल महानगरपालिका त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. त्या अनुषंगानं ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्रित येण्यानंतर शेकापलासोबत घेऊन निवडणूक लढणार का? नेमकी रणनिती काय असणार? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
