Solapur | 130 कोटींच्या ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा संताप अनावर; तलावात उड्या मारत जलसमाधी आंदोलन! 17 दिवसांपासून सुरु होतं उपोषण
सोलापूरमध्ये गोकुळ साखर कारखान्याकडील थकीत ऊस बिलांच्या प्रश्नावरून शेतकरी आक्रमक झाले आहेत, त्यांनी छत्रपती संभाजी महाराज तलावात उतरून जलसमाधी आंदोलन सुरू केले. या आंदोलनामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाची मोठी धावपळ उडाली.
सोलापूरमध्ये गोकुळ साखर कारखान्याकडील थकीत ऊस बिलांच्या प्रश्नावरून शेतकरी आक्रमक झाले आहेत, त्यांनी छत्रपती संभाजी महाराज तलावात उतरून जलसमाधी आंदोलन सुरू केले. या आंदोलनामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाची मोठी धावपळ उडाली.
गोकुळ साखर कारखान्याकडे सुमारे 130 कोटी रुपयांची ऊस बिले थकीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या मागणीसाठी गेल्या 17 दिवसांपासून शेतकरी उपोषण करत आहेत. मात्र, प्रशासन आणि कारखाना व्यवस्थापनाकडून कोणतीही ठोस दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत संतप्त शेतकऱ्यांनी आंदोलन तीव्र केले.
शेतकऱ्यांनी यापूर्वीच जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार मोठ्या संख्येने शेतकरी शहरातील छत्रपती संभाजी महाराज तलाव परिसरात जमा झाले. पोलिसांनी खबरदारी म्हणून बॅरिकेड्स उभारले होते. मात्र, संतप्त शेतकऱ्यांनी बॅरिकेड्स हटवत तलावाकडे धाव घेतली आणि पाण्यात उतरून आंदोलन सुरू केले.
घटनेची माहिती मिळताच पोलिस दलाचे वरिष्ठ अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. काही अधिकारी तलावात उतरून शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, थकीत बिलांबाबत ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.
दरम्यान, दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्रा येथील गोकुळ साखर कारखान्याने सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांची ऊस बिले थकवली असल्याचा आरोप करण्यात येत आहे. याआधीही शेतकऱ्यांनी अर्धनग्न आंदोलनासह विविध प्रकारची आंदोलने केली होती. मात्र, त्यातूनही प्रश्न सुटला नसल्याने आता शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.
या आंदोलनामुळे प्रशासन आणि कारखाना व्यवस्थापनावर दबाव वाढला असून, थकीत ऊस बिलांचा प्रश्न कधी मार्गी लागणार याकडे शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.