Special Report | राष्ट्रवादी काँग्रेसनंतर शिवसेना नेते ईडीच्या रडारवर

| Updated on: Sep 28, 2021 | 9:51 PM

राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आता शिवसेना नेते आणि मंत्र्यांच्या मागे ईडीचं शुक्लकाष्ट लागल्याचं पाहायला मिळत आहे. मंगळवारी परिवहन मंत्री अनिल परब तब्बल 8 तासानंतर ईडी कार्यालयातून बाहेर पडले. ईडीच्या अधिकाऱ्यांकडून त्यांची तब्बल 8 तास चौकशी झाली. दुसरीकडे शिवसेनेच्या यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी यांचा निकटवर्तीय सईद खान याला अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने अटक केली होती. तर माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या निवासस्थानी ईडी अधिकाऱ्यांनी काल चौकशी केली. त्यावेळी अडसूळ यांची तब्येत बिघडल्यानं त्यांना गोरेगावमधील लाईफ केअर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

Follow us on

राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आता शिवसेना नेते आणि मंत्र्यांच्या मागे ईडीचं शुक्लकाष्ट लागल्याचं पाहायला मिळत आहे. मंगळवारी परिवहन मंत्री अनिल परब तब्बल 8 तासानंतर ईडी कार्यालयातून बाहेर पडले. ईडीच्या अधिकाऱ्यांकडून त्यांची तब्बल 8 तास चौकशी झाली. सकाळी 11 वाजता अनिल परब ईडी कार्यालयात दाखल झाले होते. त्यानंतर संध्याकाळी 7 वाजता ते ईडी कार्यालयातून बाहेर पडले. त्यावेळी आपण ईडी अधिकाऱ्यांच्या सर्व प्रश्नांना उत्तरं दिल्याचं अनिल परब म्हणाले. तसंच यापुढेही ईडीला पूर्ण सहकार्य करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

दुसरीकडे शिवसेनेच्या यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी यांचा निकटवर्तीय सईद खान याला अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने अटक केली होती. आज ईडी कोर्टात हजर केलं असता सईद खानला 1 ऑक्टोबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. मनी लाँडरिंग अर्थात पैशांच्या अफरातफरी प्रकरणात भावना गवळी यांचा निकटवर्तीय असलेल्या सईद खानला सोमवारी रात्री अटक करण्यात आली होती.

तर शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या निवासस्थानी ईडी अधिकाऱ्यांनी काल चौकशी केली. त्यावेळी अडसूळ यांची तब्येत बिघडल्यानं त्यांना गोरेगावमधील लाईफ केअर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आंनदराव अडसूळ यांनी सिटी को-ऑप बँकेत घोटळा केल्याचा आरोप बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी 5 जानेवारी रोजी केला होता. आनंदराव अडसूळ यांच्या विरोधात कागदपत्रं सादर करण्यासाठी ईडी कार्यालयातही ते गेले होते.