मी आमदारांच्या अपात्रतेबाबत… शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीच्या सुरुवातीलाच कपिल सिब्बल यांनी मांडला महत्त्वाचा मुद्दा
सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुनावणी सुरू आहे. कपिल सिब्बल यांनी आमदार अपात्रतेवर आपला युक्तिवाद सुरू केला आहे. सिब्बल यांनी ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष असल्याचा दावा केला, तसेच हे प्रकरण सात न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे वर्ग करण्याची मागणी केली. निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आणि विलीनीकरणाऐवजी पक्ष ताब्यात घेण्यावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाची सुनावणी सुरू झाली आहे. या महत्त्वाच्या खटल्यात ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सुरू आहे, ज्यामध्ये ते प्रामुख्याने आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करत आहेत. मागच्या सुनावणीतही त्यांनी आमदार अपात्रतेवर युक्तिवाद केला होता आणि आताही तेच मुद्दे पुढे नेत आहेत.
निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे, विशेषतः आयोगाने 2010 च्या मार्गदर्शक तत्वांचा वापर केल्याबद्दल त्यांनी आक्षेप घेतला. ही तत्वे केवळ नवीन पक्ष नोंदणीसाठी लागू होतात, असे सिब्बल यांनी म्हटले. सिब्बल यांनी आपला युक्तिवाद करताना ठाकरेंची शिवसेना हाच खरा राजकीय पक्ष असल्याचा दावा केला. विलीन होणे ठीक आहे, पण एखाद्या पक्षावर थेट दावा करणे चुकीचे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यांनी घटनेच्या कलम 10 आणि 29 अ चा उल्लेख करत, तसेच सुभाष देसाई केसचा दाखला देत आपले म्हणणे मांडले. पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाच्या निर्णयातील काही भाग धोकादायक असून, त्यामुळे पक्षांतराला खतपाणी मिळते, असे सिब्बल यांनी म्हटले आहे. या प्रकरणाची सुनावणी सात न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे वर्ग करण्याची मागणीही त्यांनी केली.
