Sanjay Raut Health : राऊत यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट, उद्धव ठाकरे म्हणाले, तलवार घेऊन लवकरच…
संजय राऊत गेल्या दीड महिन्यांपासून फोर्टीस रुग्णालयात उपचार घेत आहेत, तरीही ते सामना आणि सोशल मीडियाद्वारे सक्रिय आहेत. आज उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांची त्यांच्या निवासस्थानी जात भेट घेतली.
उद्धव ठाकरे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांच्या भांडुप येथील निवासस्थानी भेट दिली. राऊत यांच्या खालावलेल्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी ते मिलिंद नार्वेकर यांच्यासह पोहोचले होते. प्रकृती अस्वस्थ असतानाही संजय राऊत हे पूर्णपणे निष्क्रिय नाहीत. ते नियमितपणे सामना वृत्तपत्रासाठी संपादकीय लिखाण करत आहेत आणि रोक-ठोक सदरातून त्यांचे विचार मांडत आहेत. तसेच, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स जसे की ट्विटर आणि फेसबुकचा वापर करून ते राजकीय भूमिका व्यक्त करत आहेत. त्यामुळे थेट पत्रकार परिषदांमध्ये अनुपस्थित असले तरी, त्यांची राजकीय सक्रियता कायम आहे.
दरम्यान, संजय राऊत यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरे म्हणाले, सध्या मी संजय राऊतांना फोन करत नाही. त्यामुळे सुनील राऊत यांना राऊतांच्या प्रकृतीबद्दल विचारपूस करण्यासाठी छळत असतो. खूप दिवसापासून भेटायचं होतं आज भेट झाली. संजय राऊत आज खूप फ्रेश दिसले. पुन्हा एकदा लवकरच संजय राऊत तलवार घेऊन मैदानात दिसतील असं विधानही उद्धव ठाकरे यांनी राऊतांच्या भेटीनंतर केलं.
