महाराष्ट्रासाठी 'आप'ची दुसरी यादी जाहीर, सात उमेदवारांना तिकीट

दुसऱ्या उमेदवार यादीत सात जणांना तिकीट देण्यात आलं आहे. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील तीन, कोकणातील दोन, तर उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील प्रत्येकी एका मतदारसंघाचा समावेश आहे.

महाराष्ट्रासाठी 'आप'ची दुसरी यादी जाहीर, सात उमेदवारांना तिकीट

मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजल्यानंतर उमेदवार यादी जाहीर करण्यात आघाडी घेणाऱ्या आम आदमी पक्षाने (AAP Second Candidate List) आपली दुसरी उमेदवार यादीही जाहीर केली आहे. जालना, मीरा रोड, शिवाजी नगर, मुंब्रा कळव्यासह सात मतदारसंघातील आपले उमेदवार ‘आप’ने जाहीर केले आहेत. पत्रकार, रिक्षाचालक, वकील, कोचिंग क्लासचालक अशा विविध व्यवसायातील उमेदवारांचा यादीत भरणा आहे.

मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आपने याआधीही आठ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. दुसऱ्या उमेदवार यादीत सात जणांना तिकीट देण्यात आलं आहे. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील तीन, कोकणातील दोन, तर उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील प्रत्येकी एका मतदारसंघाचा समावेश आहे.

‘आप’ची महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील 7 उमेदवारांची दुसरी यादी (AAP Second Candidate List)

1. कैलास फुलारी – जालना (जालना) – मराठवाडा
2. नरेंद्र भांबवानी – मीरा रोड (ठाणे) – कोकण
3. मुकुंद किर्दत – शिवाजी नगर (पुणे) – पश्चिम महाराष्ट्र
4. गणेश धमाले – बडगावंशरी (पुणे) – पश्चिम महाराष्ट्र
5. अॅड. खतीब वकील – मध्य सोलापूर (सोलापूर) – पश्चिम महाराष्ट्र
6. डॉ. सुनील गावित – नवापूर (नंदुरबार) – उत्तर महाराष्ट्र
7. डॉ. अल्तामाश फैजी – मुंब्रा कळवा (ठाणे) – कोकण

कैलाश फुलारी – कैलाश फुलारी हे आघाडीच्या वर्तमानपत्रांसोबत गेल्या 15 वर्षांपासून पत्रकार म्हणून काम करत आहेत. त्यांनी भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवलेला आहे.

मुकुंद किर्दत – मुकुंद किर्दत हे पुणे आपचे अध्यक्ष आहेत. स्त्री-पुरुष समानतेसाठी कार्यरत ‘पुरुष उवाच’ या संघटनेच्या संस्थापकांपैकी ते एक आहेत. शिक्षणाच्या हक्कासाठी त्यांनी योगदान दिलेलं आहे.

गणेश धमाले – गणेश धमाले हे व्यवसायाने रिक्षाचालक आहेत. पुण्यातील आम आदमी रिक्षाचालक संघटनेचे ते उपाध्यक्ष आहेत. पुण्यात फलक पडून झालेल्या अपघातात बळी पडलेल्या नागरिकांना नुकसानभरपाई देण्यासाठी पाच दिवस आंदोलनाला बसणाऱ्यांपैकी ते एक होते.

अॅड. खतीब वकील – अॅड. खतीब वकील हे व्यवसायाने वकील आहेत. मुंबई उच्च न्यायालय आणि सोलापूर जिल्हा कोर्टात ते प्रॅक्टिस करतात. अ. भा. नागरिक ग्राहक मंचाचे ते संस्थापक आहेत.

नरेंद्र भांबवानी – नरेंद्र भांबवानी हे मीरा भाईंदरमध्ये कॉमर्स विषयातील विद्यार्थ्यांसाठी कोचिंग क्लास चालवतात. महाराष्ट्र क्लास ओनर्स असोसिएशनचे ते उपाध्यक्ष आहेत.

डॉ. अल्तामाश फैजी – डॉ. अल्तामाश फैजी हे संयुक्त राष्ट्रसंघाशी निगडीत आहेत. काश्मीरमध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानासाठी त्यांनी काम केलं आहे.

पहिल्या उमेदवार यादीत कोण?

1. पारोमिता गोस्वामी – ब्रह्मपुरी विधानसभा
2. विठ्ठल गोविंदा – जोगेश्वरी पूर्व
3. आनंद गुरव – करवीर विधानसभा (कोल्हापूर)
4. विशाल वडघुले – नांदगाव (नाशिक)
5. डॉ. अभिजीत मोरे – कोथरूड विधानसभा (पुणे)
6. सिराज खान – चांदोली विधानसभा (मुंबई)
7. दिलीप तावडे – दिंडोशी विधानसभा (मुंबई उपनगर)
8. संदीप सोनवणे – पर्वती विधानसभा (पुणे)

‘आप महाराष्ट्रात 50 जागा लढवणार’

आपच्या महाराष्ट्र संयोजक प्रीती मेनन यांनी आप महाराष्ट्रात 50 जागा लढवण्याचा विचार करत असल्याचं सांगितलं होतं. विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी महाराष्ट्रातून 600 ते 700 अर्ज आले होते. आम्ही 600 उमेदवारांचे अर्ज घेतले. अंतिमतः सर्व अर्जांची तपासणी आणि अभ्यास करुन यादी तयार करण्यात आली आहे. आप महाराष्ट्रात 50 ते 55 जागा लढवणार असल्याचं त्या म्हणाल्या होत्या.

‘वंचित सोबत बोलणी सुरू’

आपने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीसोबत युती करण्याबाबत बोलणी सुरु असल्याचंही नमूद केलं होतं. वंचितचे लोकसभा निवडणुकीतील उमेदवार चळवळीचे कार्यकर्ते होते. त्यामुळे जर चांगले लोक राजकारणात येत असतील, तर त्यांच्यासोबत जायला काहीच हरकत नाही. म्हणूनच आम्ही वंचित सोबत जाऊ. वंचितसोबत गेल्यास कोणत्या जागा कुठे सोडायच्या यावर चर्चा सुरू आहे. वंचित आमच्यासोबत येत असेल, तर आम्ही तयार आहोत.” असं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

वंचित आघाडीने कोल्हापुरातील करवीर विधानसभा मतदारसंघातून आनंद गुरव (Anand Gurav Karveer) यांना उमेदवारी दिली. मात्र आनंद गुरव (Anand Gurav Karveer) यांचं नाव ‘आप’च्याही पहिल्या यादीत होतं. त्यामुळे गुरव नेमके कोणाच्या तिकीटावर लढणार, हा सस्पेन्स कायम आहे

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *