आमदार प्रणिती शिंदेंविरोधात ‘आप’चा मुस्लिम उमेदवार

मुस्मिल बहुल असलेल्या सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघात अॅडव्होकेट खतीब यांना 'आप'ने उमेदवारी जाहीर केली आहे

आमदार प्रणिती शिंदेंविरोधात 'आप'चा मुस्लिम उमेदवार

सोलापूर : दिल्लीत भाजपच्या नाकी नऊ आणणाऱ्या अरविंद केजरीवाल यांच्या ‘आम आदमी पक्षा’ने यावेळीही महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या रिंगणात (Solapur Central AAP Candidate) उतरण्याचा निर्धार केला आहे. सोलापुरात काँग्रेसच्या आमदार असलेल्या प्रणिती शिंदेंविरोधातील उमेदवाराची घोषणा ‘आप’ने केली आहे.

प्रणिती शिंदे या सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघातून (Solapur Central AAP Candidate) आमदार आहेत. या मतदारसंघातून उमेदवार रिंगणात उतरवण्याची तयारी ‘आप’ने केली आहे. मुस्मिल बहुल असलेल्या या मतदारसंघात अॅडव्होकेट खतीब यांना उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. ‘आप’ने सोलापुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

प्रणिती शिंदे यांना पुन्हा काँग्रेस उमेदवारी देणार का, हे अद्याप निश्चित झालेलं नाही. काही दिवसांपूर्वी पक्षातीलच काही जणांनी मुस्लिम समाजातील उमेदवाराला तिकीट देण्याची मागणी केली होती. त्यातच आता आम आदमी पक्षानेही मुस्लिम उमेदवार जाहीर केल्याने शिंदे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

सरकारकडून मेंटल टॉर्चर : प्रणिती शिंदे

प्रणिती शिंदे सोलापूर मध्य मतदारसंघातून सलग दोन वेळा आमदार आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत एमआयएमचे उमेदवार शेख तौसिफ इस्माईल यांचा जवळपास दहा हजारांच्या मताधिक्याने त्यांनी पराभव केला होता.

प्रणिती या माजी गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या कन्या. सुशिलकुमार शिंदे यांचा सलग दोन लोकसभा निवडणुकांमध्ये पराभव झाला आहे. भाजपचे श्रीसिद्धेश्वर स्वामी सोलापूर मतदारसंघातून खासदार आहेत. त्यामुळे आमदारकीला शिवसेना-भाजपकडून कोणता उमेदवार मैदानात उतरणार, हे पाहणं उत्सुकतेचं आहे.

जनतेच्या प्रश्नासाठी आवाज उठवणाऱ्या लोकप्रतिनिधींचा सरकारकडून आवाज दाबला जात आहे. त्याचप्रमाणे आपल्याला मेंटली टॉर्चर केलं जात आहे, असा आरोप प्रणिती शिंदे यांनी केला होता. न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसात हजेरी लावल्यानंतर प्रणिती यांनी सरकारवर ताशेरे ओढले होते. प्रणिती शिंदे यांच्यासह नऊ जणांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला होता.