वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार अपघातात गंभीर जखमी

निवडणुकीचा प्रचार ऐन भरात असतानाच बाईक घसरुन झालेल्या अपघातात गडचिरोलीतील अहेरी मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार लालसू नागोटी गंभीर जखमी झाले आहेत

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 12:41 PM, 2 Oct 2019
VBA Gadchiroli Candidate Injured

गडचिरोली : वंचित बहुजन आघाडीच्या तिकीटावर विधानसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरलेला उमेदवार गंभीर जखमी (VBA Gadchiroli Candidate Injured) झाल्याची माहिती आहे. गडचिरोलीतील अॅड. लालसू नागोटी हे अपघातात जखमी झाल्याचं वृत्त आहे. नागोटी हे गडचिरोली जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत.

लालसू नागोटी यांना अहेरी विधानसभा मतदारसंघातून वंचितने विधानसभेच्या रिंगणात उतरवलं आहे. निवडणुकीचा प्रचार ऐन भरात असतानाच बाईक घसरुन झालेल्या अपघातात नागोटी यांना गंभीर दुखापत झाली. ‘गोंडवाना टाइम्स’ या स्थानिक वृत्तपत्राने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील कारमपल्ली गावाजवळ काल सकाळी हा अपघात घडला. नागोटी या भागात बहिणीच्या घरी भेट देण्यासाठी गेले होते. भामरागडहून कारमपल्लीच्या दिशेने जाताना बाईक घसरल्यामुळे ते रस्त्यावर पडले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत (VBA Gadchiroli Candidate Injured) झाली.

भामरागडमध्ये तात्काळ प्राथमिक उपचार केल्यानंतर नागोटी यांना गडचिरोलीतील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आलं. ऐन निवडणुकांच्या तोंडावर उमेदवार जखमी झाल्यामुळे गडचिरोलीत वंचितला मोठा धक्का बसला आहे.

प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकीसाठी दुसरी यादी जाहीर केली आहे. दुसऱ्या यादीत 120 जणांची नावं आहेत. पहिल्या यादीत 22 जणांची नावं होती. लालसू नागोटी यांना पहिल्याच यादीत उमेदवारी जाहीर करण्यात आली होती.

वंचितने आतापर्यंत 142 उमेदवार जाहीर केले आहेत. उर्वरित उमेदवारही लवकरच जाहीर केले जाणार आहेत. एमआयएमने काडीमोड घेतल्यानंतर वंचितने स्वतःच सर्व जागा लढवणार असल्याचं जाहीर केलं होतं. विशेष म्हणजे यादी जाहीर करताना उमेदवारांच्या जातीचाही वंचितने उल्लेख केला आहे.

संबंधित बातम्या 

उमेदवारांच्या जातीसह वंचितची पहिली यादी जाहीर