डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी खेळी; Gold Card Visa कशासाठी? अमेरिकेत खरंच लागणार लॉटरी?
Donald Trump Gold Card Visa: डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी खेळी खेळली आहे. ट्रम्प सरकारने नवीन गोल्ड कार्ड व्हिसा आणला आहे. ग्रीन कार्डपेक्षा हे कार्ड वेगळे आहे आणि त्यात अधिक आकर्षक सवलती असल्याचा दावा करण्यात येत आहे. कुणासाठी हे कार्ड फायद्याचे ठरणार आहे?

Gold Card Vs Green Card Visa: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी मोठी खेळी खेळली. व्हाईट हाऊसमध्ये व्यापारी प्रतिनिधींच्या उपस्थितीत त्यांनी एक नवीन व्हिसा बाजारात आणला आहे. ट्रम्प गोल्ड कार्ड सुरु केले आहे. परदेशी नागरिकांना अमेरिकेत वास्तव्यासाठी ट्रम्प प्रशासनाने हे कार्ड आणले आहे. गुंतवणूकदार आणि विविध क्षेत्रातील तज्ज्ञांना अमेरिकेत वास्तव्यासाठी ही योजना आणण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. ट्रम्प यांनी ग्रीन कार्डपेक्षा गोल्ड कार्ड काकणभर सरस असल्याचा दावा केला. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेसाठी मोठा निधी जमा करणे आणि त्याचवेळी कौशल्य प्राप्त व्यक्तींना प्रवेश देणे असे दोन्ही उद्देश यातून साध्य करण्यात येणार आहे.
उद्योजक, गुंतवणूकदारांसाठी अमेरिकेचा गेट पास
ट्रम्प यांच्या मते, नवीन गोल्ड कार्ड हे खासकरुन परदेशी गुंतवणूकदार आणि उद्योजकांसाठी तयार करण्यात आले आहे. अमेरिकेत ज्यांना व्यवसाय सुरू करायचा आहे. ज्यांना अमेरिकेत प्रतिभेला वाव मिळेल असे वाटते त्यांच्यासाठी गोल्ड कार्ड हे जणू गेट पास आहे. यामुळे उद्योगविश्वात नवीन संधी मिळेल. कंपन्यांना प्रतिभावान लोक मिळतील आणि अमेरिकेची आर्थिक प्रगती साधता येईल असे ट्रम्प यांना वाटते.
ज्या क्षेत्रात परदेशातील प्रतिभावंत, गुणवंतांची खरंच गरज आणि गेल्या काही वर्षांपासून या क्षेत्रात उणीव भासत होती. त्या क्षेत्रात गोल्ड कार्डमुळे नवीन संधी मिळतील असे ट्रम्प यांना वाटते. भारत, चीन वा फ्रान्समधील अनेक गुणी आणि प्रतिभावंत तज्ज्ञ हे अमेरिकेत शिक्षण पूर्ण करतात आणि परत त्यांच्या देशात जातात. त्यांना अमेरिकेत थांबावासं वाटतं, या नवीन कार्डमुळे कंपन्या आता त्यांना येथेच थांबू शकतात.
गोल्ड कार्ड संकेतस्थळ
राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले की गोल्ड कार्डची अधिकृत संकेतस्थळ सुरु झाले आहे. या नवीन कार्डसाठी अर्ज प्रक्रिया पण सुरु झाली आहे. आता परदेशी नागरिक हे ऑनलाईन हा अर्ज भरून व्हिसासाठी प्रक्रिया पूर्ण करू शकतील. गोल्ड कार्ड मिळवण्यासाठी अर्थातच परदेशी नागरिकांना अमेरिकेच्या गंगाजळीत 10 लाख डॉलरचे योगदान द्यावे लागणार आहे. या रक्कमेमुळे अमेरिका अजून श्रीमंत होईल तर अर्जदाराला अमेरिकेत कायमचा राहण्याचा आणि काम करण्यााच परवाना मिळेल.
