पत्नीने खून केला, सापाला ठरवले दोषी… मेरठमधील कोब्रा हत्याकांडाने हादरुन टाकले
शनिवारी रात्री पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केली आहे. पण तिने आखलेला हा प्लान जेव्हा पोलिसांना कळाला तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली... आता नेमकं काय झालं? जाणून घ्या...

उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यात पतींच्या हत्येच्या खळबळजनक घटना सातत्याने समोर येत आहेत. सध्या, बहुचर्चित सौरभ हत्याकांडातील आरोपी मुस्कान रस्तोगी आणि साहिल शुक्लाला अटक करण्यात आली. दरम्यान, आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात बायकोने प्रियकराच्या मदतीने नवऱ्याची हत्या केली आहे. बायकोने तिच्या नवऱ्याच्या अंगावर विषारी साप सोडला होता. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये हे संपूर्ण प्रकरण उघड झाले आहे. सौरभच्या हत्येप्रकरणी त्याची पत्नी मुस्कानने निळ्या रंगाचा ड्रम वापरला होता ज्यामध्ये तिने सौरभचा मृतदेह सिमेंटने भरला आणि पुरला.
पोलिसांनी या प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. मृताचे नाव अमित असे आहे, तो मेरठचा रहिवासी आहे. या प्रकरणाशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये अमितचा मृतदेह बेडवर पडलेला दिसत आहे. त्याच्या शरीरावर एक साप असल्याचे दिसत आहे. हा साप त्याला जवळपास १० वेळा चावला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला तेव्हा प्रकरण उघडकीस आले. आजूबाजूच्या लोकांच्या जबाबानंतर पोलिसांनी मृत अमितची पत्नी रविता हिला ताब्यात घेतले आणि तिची चौकशी केली. त्यानंतर रविताने तिचा गुन्हा कबूल केला आणि सांगितले की तिने तिचा प्रियकर अमरदीपसोबत मिळून अमितची हत्या केली होती. रविता म्हणाली की तिने १००० रुपयांना एक साप विकत घेतला होता, ज्याच्या मदतीने तिने अमितला मारले.
शनिवारी रात्री रविता आणि अमरदीप यांनी मिळून प्रथम अमितचा गळा दाबून खून केला. अमित तेव्हा झोपला होता. मग त्याच्या पलंगावर एक साप सोडण्यात आला होता. स्वतःला वाचवण्यासाठी त्याने अमितचा जीव साप चावल्यामुळे गेल्याचे सांगितले. अमित मजूर म्हणून काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे. हे संपूर्ण प्रकरण बहसुमा पोलीस स्टेशन परिसरातील अकबरपूर गावातील आहे.
