माजी आमदारांच्या बंगल्यात चोरट्यांचा डल्ला; 34 लाखांचा ऐवज घेऊन भूर्र, पोलिसांनाच थेट आव्हान, जळगावमध्ये खळबळ
theft in former mla house : जळगावमध्ये चोरट्यांचे धाडस वाढले आहे. माजी आमदारांच्या घरातच त्यांनी धाडसी चोरी केली. या चोरीत 34 लाखांचा ऐवज लंपास केल्याचे समोर आले आहे. आता पोलिसांसमोर चोरट्यांना पकडण्याचे आव्हान आहे.

जळगाव जिल्ह्यात चोरट्यांनी थेट माजी आमदारांच्या घरातच डल्ला मारला आहे. माजी आमदारांच्या घरातच त्यांनी धाडसी चोरी केली. या चोरीत 34 लाखांचा ऐवज लंपास केल्याचे समोर आले आहे. नेत्याच्या पारोळा तालुक्यातील राजवड या गावी ही चोरी झाली आहे. आता पोलिसांसमोर चोरट्यांना पकडण्याचे आव्हान आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
सोन्याच दागिन्यांसह किंमती ऐवज लंपास
जळगावच्या पारोळा तालुक्यातील राजवड येथील राष्ट्रवादीचे माजी आमदार साहेबराव पाटलांच्या बंगल्यातून चोरट्यांनी 24 लाखाचे दागिन्यांसह दहा लाखांची रोकड लांबवली आहे. माजी आमदार साहेबराव पाटील हे आपल्या मुलाकडे नाशिकला गेलेले असताना चोरट्यांनी ही संधी साधली. चोरट्यांनी बंद घर फोडून चोरी केल्याची घटना समोर आली आहे. घराच्या सर्व दरवाजांचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील एकूण 34 लाख 8 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला.
चोरटे सीसीटीव्हीत कैद
घराच्या बाहेरील परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरीसाठी घरात प्रवेश करणारे चार चोरटे कैद झाले आहेत. त्यांच्या एकूण हालचालीवरून, वर्णन, अंगावरील कपड्यांवरून ते पुढे एखाद्या सीसीटीव्हीत कैद झालेत का, याचा पोलीस तपास करत आहेत. थेट माजी आमदाराच्या घरावरच चोरट्यांनी डल्ला मारल्याने पोलिसांसमोर त्यांना अटक करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
35 मिनिटे चोरट्यांचा धुमाकूळ
चोरट्यांनी सीसीटीव्ही पाहताच अगोदर त्यांची तोडफोड केली. इतकेच नाही तर पोलिसांच्या हाती काहीच लागू नये यासाठी डीव्हीआर सुद्धा चोरून नेला. मात्र एका सीसीटीव्ही चोरटे कैद झाले. धरणगाव रस्त्याकडून ते बंगल्यात शिरले. कम्पांऊडच्या भीतींवरून उडी घेत त्यांनी बंगल्यात प्रवेश केला. भल्या पहाटे 3 वाजेच्या सुमारास त्यांनी धाडसी चोरीसाठी बंगल्याची कुलूपं तोडली. त्यानंतर अर्ध्यातासात 24 लाखांचे सोने आणि 10 लाखांची रोख रक्कम घेऊन चोरट्यांनी पोबारा केला.
पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपाधीक्षक यांच्यासह अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. त्यांनी पंचनामा केला. शनिवारी रात्री याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता पोलिसांचा माग काढण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.
