Exit Poll Results 2024 Date : गुलाल कुणाचा? एक्झिट पोल आज, देशाचं लक्ष लागलेल्या 7 जागा कोणत्या?
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 Date and Time : गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेली लोकसभेची रणधुमाळी आता थांबण्याच्या मार्गावर आहे. आज 1 जून रोजी लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. त्यानंतर लागलीच 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत. तर, आज संध्याकाळी 5 नंतर एक्झिट पोलही येणार आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत कोण जिंकणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

लोकसभा निवडणुकीचा सातवा आणि शेवटचा टप्पा आज 1 जून रोजी पार पडणार आहे. हा टप्पा पार पडताच लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया संपणार आहे. त्यानंतर 4 जून रोजी लोकसभेचा निकाल येणार आहे. या निवडणुकीत कुणाला बहुमत मिळेल? कुणाची सत्ता येईल? कोण सत्तेबाहेर राहील? हे स्पष्ट होणार आहे. 4 जून रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत हे चित्र स्पष्ट होणार आहे. अधिकच अटीतटीची लढत झाली तर दुसऱ्या दिवशी पहाटेही निवडणूक निकाल जाहीर होऊ शकतो. त्यानंतर राजकीय घडामोडींना वेग येईल. सत्ता स्थापनेच्या दिशेने हालचाल सुरू होतील. आज 1 जून रोजी मतदान पार पडल्यावर संध्याकाळी 5 नंतर एक्झिट पोल जाहीर होणार आहेत. या पोलमधून देशाचं चित्र स्पष्ट होणार आहे.
लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी लागणार असला तरी एक्झिट पोल आधीच जाहीर होणार आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीचं चित्र काय असेल याचा साधारण अंदाज येणार आहे. त्यामुळेच एक्झिट पोलची सर्वजण वाट पाहत असतात. त्यामुळे हे एक्झिट पोल काय आहेत? ते कधी घोषित करतात? यावर टाकलेला हा प्रकाश.
एक्झिट पोल कधी घोषित होणार?
आज 1 जून रोजी शेवटच्या टप्प्यातील मतदान झाल्यावर आजच एक्झिट पोल जाहीर होतील. साधारण संध्याकाळी 7 च्या आसपास हे एक्झिट पोल जाहीर होतील. विविध न्यूज चॅनल्स आणि रिसर्च एजन्सींकडून हे एक्झिट पोल जाहीर केले जातात. एक्झिट पोल हे केवळ निवडणूक निकालाचा अंदाज असतात. अनेकदा एक्झिट पोल बऱ्यापैकी योग्यही ठरतात, काही वेळा तंतोतंत खरेही ठरतात तर काही वेळा एक्झिट पोल खोटेही ठरत असतात.
दोन राज्यांचा निकाल आधी
लोकसभा निवडणुकीचा अंतिम टप्पा आज पार पडणार आहे. लोकसभेचा निकाल 4 जून रोजी लागणार आहे. लोकसभेसोबतच सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशातील विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. त्याचे निकाल 2 जून रोजी लागणार आहेत. तर ओडिशा आणि आंध्रप्रदेश विधानसभेचे निकाल 4 जून रोजी लागणार आहेत.
कोणत्या सात जागांवर देशाचं लक्ष?
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणासी लोकसभा मतदारसंघातून लढत आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे अजय राय लढत आहेत. त्यामुळे या मतदारसंघाकडे देशाचं लक्ष लागलं आहे.
भाजप नेते अमित शाह हे गुजरातच्या गांधीनगरमधून लढत आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसने सोनल पटेल यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या जागेकडेही देशाचं लक्ष लागलं आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी हे पहिल्यांदाच रायबरेलीतून लढत आहेत. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचा हा मतदारसंघ. पण त्या राज्यसभेवर गेल्याने राहुल गांधी रायबरेलीतून लढत असून त्यांच्याविरोधात भाजपचे दिनेश प्रताप सिंह उभे आहेत.
मुंबई नॉर्थमधून पीयूष गोयल उभे आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे भूषण पाटील लढत आहेत.
अभिनेत्री कंगना रनौत मंडीमधून भाजपच्या तिकीटावर लढत आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे विक्रमादित्य सिंह लढत आहेत.
नागपूरमध्ये भाजपचे नेते नितीन गडकरी यांची काँग्रेसच्या विकास ठाकरे यांच्याशी लढत आहे. या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे.
बारामतीत पवार घराण्यातच फाईट होणार आहे. शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि अजितदादा गटाच्या नेत्या सुनेत्रा पवार दोघी नणंद-भावजय निवडणूक मैदानात आहेत. या ठिकाणी वंचितने सुप्रिया सुळे यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या लढतीकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.
