पाच दिवसांत सैफ इतका फिट कसा? ॲक्टिंग करतोय की काय? विचारणाऱ्यांना डॉक्टरने दिलं उत्तर
अभिनेता सैफ अली खान पाच दिवसांत इतका फिट कसा काय झाला, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. डिस्चार्जनंतर त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यामध्ये तो व्यवस्थित चालताना दिसून येत आहे.

अभिनेता सैफ अली खानला पाच दिवसांच्या उपचारानंतर मंगळवारी लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. डिस्चार्ज मिळाल्यानंतर सैफ धडधाकटपणे चालताना दिसला. त्याच्या हातावर आणि मानेवर फक्त पट्टी पहायला मिळाली. 16 जानेवारी रोजी मध्यरात्री 2 वाजता एक चोर सैफच्या घरात शिरला होता. त्याच्यासोबत झालेल्या झटापटीत चोराने सैफवर चाकूने सहा वार केले. त्यापैकी दोन वार खोलवर झाले होते. यानंतर सैफवर न्यूरोसर्जरी आणि प्लास्टिक सर्जरी करण्यात आली. सैफच्या मणक्याजवळ अडीच इंचाचा चाकूचा तुकडा रुतला होता, तोही काढल्याची माहिती डॉक्टरांनी दिली होती. गंभीर वार झाल्यानंतर सैफ पाच दिवसांत इतका फिट कसा दिसू शकतो, असे प्रश्न काहींनी उपस्थित केले. संजय निरुपम, नितेश राणे यांसारख्या नेत्यांनीही त्यावरून सवाल केला होता. यावर आता बेंगळुरूमधील एका कार्डिओलॉजिस्टने उत्तर दिलं आहे.
सैफ अली खान इतक्या लवकर बरा कसा झाला, यात काहीच नवल वाटण्याचं कारण नाही, असं डॉ. दीपक कृष्णमूर्ती म्हणाले. एक्स (ट्विटर) अकाऊंटवर त्यांनी यासंदर्भात एक पोस्ट लिहिली आहे. ‘ज्या लोकांना (विनोदाचा भाग म्हणजे काही डॉक्टरांनाही) सैफ अली खानच्या मणक्याच्या सर्जरीबद्दल शंका वाटत आहे, त्यांच्यासाठी मी हा व्हिडीओ पोस्ट करतोय. माझ्या 78 वर्षीय आईवर 2022 मध्ये मणक्याची सर्जरी करण्यात आली होती. तिच्या एका पायाला फ्रॅक्चरसुद्धा झालं होतं. ज्या दिवशी तिच्यावर मणक्याची सर्जरी झाली, त्याच दिवशी संध्याकाळी ती चालू लागली होती. कमी वयाचा फिट व्यक्ती त्याहून अधिक जलद बरा होऊ शकतो. ज्या डॉक्टरांना सैफच्या रिकव्हरीबाबत शंका आहे, त्यांना मी सांगू इच्छिते की त्यांनी व्यवस्थित माहिती मिळवावी.’




आमदार नितेश राणे सैफच्या रिकव्हरीबद्दल म्हणाले, “सैफला बिघतल्यावर मलाच संशय येतो. खरंच चाकू मारला की ॲक्टिंग करतोय. सैफ बाहेरुन असा चालत होता की, मलाच संशय आला याला खरंच कोणी चाकू मारला की हा ॲक्टिंग करुन बाहेर पडला. असं टुणटुण करुन.” तर रुग्णालयातून बाहेर पडताच सैफ इतका फिट कसा, असा सवाल शिवसेना नेते संजय निरुपम यांनी केला होता. ‘डॉक्टरांनी म्हटलं होतं की सैफ अली खानच्या पाठीत 2.5 इंच आतमध्ये चाकू घुसला होता. कदाचित तो चाकू आत अडकला असावा. सलग सहा तास शस्त्रक्रिया झाली. हे सर्व 16 जानेवारी रोजी घडलं. आज 21 जानेवारी आहे. रुग्णालयातून बाहेर पडताच सैफ इतका फिट? तेसुद्धा फक्त पाच दिवसात? कमाल आहे,’ असं ट्विट निरुपम यांनी केलं होतं.