‘डॉन’चे दिग्दर्शक चंद्रा बारोट यांचं निधन; बॉलिवूडवर शोककळा
अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेल्या 'डॉन' या चित्रपटाचे दिग्दर्शक चंद्रा बारोट यांचं निधन झालं. गेल्या काही वर्षांपासून ते आजारी होती. चंद्रा यांच्या निधनाने बॉलिवूड इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे.

1978 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘डॉन’ या चित्रपटाचे दिग्दर्शक चंद्रा बारोट यांचं निधन झालं. ते 86 वर्षांचे होते. मुंबईतल्या वांद्रे इथल्या रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांची पत्नी दीपा बारोट यांनी निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला. गेल्या सात वर्षांपासून ते फफ्फुसांच्या फाब्रोसिसने ग्रस्त होते, अशी माहिती त्यांच्या पत्नीने दिली. बारोट यांच्यावर डॉ. मनीष शेट्टी यांच्या मार्गदर्शनासाठी गुरूनानक रुग्णालयात उपचार सुरू होते. यापूर्वी त्यांना जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
चंद्रा बारोट यांच्या निधनानंतर अभिनेता फरहान अख्तरने सोशल मीडियावर पोस्ट लिहित शोक व्यक्त केला. ‘मूळ डॉनचे दिग्दर्शक आज आपल्यात नाहीत हे जाणून दु:ख झालं. चंद्रा बारोटजी यांच्या आत्म्याला शांती मिळो’, असं त्याने लिहिलं आहे. चंद्रा यांनी त्यांचे जवळचे मित्र आणि सिनेमॅटोग्राफ-निर्माते नरीमन इराणी यांना पाठिंबा देण्यासाठी ‘डॉन’ या चित्रपटाचं दिग्दर्शन करण्याचा निर्णय घेतला होता. ‘डॉन’ हा त्या काळातील ब्लॉकबस्टर चित्रपटांपैकी एक आहे. चंद्रा यांनी अभिनेते मनोज कुमार यांच्यासोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली होती.
View this post on Instagram
चंद्रा बारोट यांनी मनोज कुमार यांच्या जवळपास सर्व चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं. मनोज कुमार यांच्या सर्व चित्रपटांमध्ये चंद्रा बारोट यांच्यासोबत काम करणारे मनोज गोस्वामी म्हणाले, “त्यांनी मनोज कुमार यांच्यासोबत पूरब पश्चिम ते क्रांती या चित्रपटांपर्यंत काम केलं आहे. त्यानंतर त्यांनी डॉनसाठी स्वतंत्र दिग्दर्शक म्हणून काम केलं. मनोज कुमार यांनीच त्या चित्रपटात एक गाणं समाविष्ट करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर ‘खैके पान बनारस वाला’ हे गाणं या चित्रपटाचं वैशिष्ट्य ठरलं. मनोज कुमार यांच्या तब्येतीविषयी विचारपूस करण्यासाठी ते मला नेहमी फोन करायचे.”
फक्त मित्राला मदत करण्यासाठी चंद्रा बारोट यांनी ‘डॉन’चं दिग्दर्शन केलं होतं आणि हाच चित्रपट त्यांच्या करिअरमधील सर्वांत मोठा ठरला. या चित्रपटात अमिताभ बच्चन, झीनत अमान, प्राण, इफ्तेखार, ओम शिवपुरी, कमल कपूर यांच्या भूमिका होत्या.
