Girija Oak: गिरिजा ओकच्या सौंदर्यावर इम्रान हाश्मी फिदा, विमानात तिला पाहिलं अन् सतत.. काय घडलं?
एका निर्मातीने मुलाखतीमध्ये स्वत: हा किस्सा सांगितला आहे. हा किस्सा 2004 रोजी घडला होता. तेव्हा इम्रान हाश्मी गिरिजा ओकच्या सौंदर्यावर फिदा झाला होता. नेमकं काय घडलं होतं? वाचा...

सध्या गिरीजा ओकचे नाव फक्त मराठीतच नव्हे, तर हिंदी मनोरंजन विश्वातही जोरदार गाजत आहे. एका मुलाखतीमुळे ती ‘नॅशनल क्रश’ बनली आहे. हिंदी प्रेक्षकांना तिची ओळख आता नव्याने झाली असली, तरी मराठी रसिक तिला वर्षानुवर्षे ओळखत आहेत. मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये गिरीजा नेहमीच झळकली आहे. २००४ मध्ये गिरीजा ओक आणि स्वप्नील जोशी यांचा ‘मानिनी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या शूटिंगनंतर गिरीजा दुबईहून भारतात परतत असताना विमानात बॉलिवूडचा सीरियल किसर इम्रान हाश्मी तिच्याकडे एकटक पाहत होता. हा किस्सा प्रसिद्ध दिग्दर्शिका आणि निर्मात्या कांचन धर्माधिकारी यांनी उलगडला आहे.
कांचन धर्माधिकारी काय म्हणाल्या?
‘तरुण भारत’ला दिलेल्या मुलाखतीत कांचन धर्माधिकारी यांनी 2004मध्ये घडलेला किस्सा सांगितला आहे. त्या म्हणाल्या, “२००४ साली मी ‘मानिनी’ हा माझा पहिला चित्रपट दिग्दर्शित केला. आम्ही तिघे निर्माते होतो. सर्वांनी मिळून पैसे जमवले आणि हा चित्रपट बनवला. हा पहिलाच मराठी चित्रपट होता ज्याचे शूटिंग परदेशात झाले. आम्ही दुबईत १२ दिवस शूटिंग केले होते. गिरीजा ओक, जी आता तुमची ‘नॅशनल क्रश’ आहे, ती तेव्हा या चित्रपटाची नायिका होती. दुबईहून परतताना आम्ही विमानात होतो, तेव्हा इम्रान हाश्मीही त्या विमानात होता. तो ‘मर्डर’ चित्रपटाच्या शूटिंगनंतर परत येत होता. गिरीजा तेव्हा कॉलेजमध्ये शिकत होती. तिचे सरळ लांबसडक केस, चमकदार त्वचा आणि अतिशय सुंदर दिसणे… आजही ती तशीच आहे. नॅशनल क्रश होणे स्वाभाविकच होते, कारण तेव्हा स्वतः इम्रान हाश्मी तिच्याकडे सतत पाहत होता. त्यामुळे इम्रान हाश्मीची क्रश असलेली मुलगी नॅशनल क्रश होणारच ना! माझ्या असिस्टंटने येऊन मला सांगितले, ‘मॅडम, बघा तो तिच्याकडे पाहतोय’.”
पुढे बोलताना कांचन म्हणाल्या, “आज गिरीजा ‘नॅशनल क्रश’ म्हणून व्हायरल झाल्याचे पाहिले आणि त्यावर येणाऱ्या कमेंट्स वाचून मला खूप वाईट वाटले. मराठी माणूस नेहमी पाय खेचण्यातच तरबेज असतो. अरे, तिने आधी काय काय काम केले, किती संघर्ष केला हे तरी पाहा. तिचे ‘गौहर जान’ हे नाटक किती अप्रतिम आहे. तिने कधीही चुकीचे काही केले नाही. अंगप्रदर्शन करून प्रसिद्धी मिळवली नाही. तुम्ही तिचे कौतुक करा. आपली मराठी मुलगी इतक्या मोठ्या स्तरावर पोहोचली आहे, त्याची प्रशंसा करा.” गिरीजा ओकच्या या प्रवासाने आणि तिच्या सौंदर्याने इम्रान हाश्मीसारख्या स्टारलाही प्रभावित केले होते, हे उघड झाल्याने गिरिजाचे चाहते आनंदी झाले आहेत.
