नागार्जुन यांनी एक-दोन नव्हे तर तब्बल 15 वेळा या मराठी अभिनेत्रीच्या वाजवली कानाखाली
या अभिनेत्रीने हिंदी सिनेसृष्टीतील मोजक्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने नागार्जुनसोबत काम करतानाचा एक किस्सा सांगितला. नागार्जुन यांनी तिला एक-दोनदा नव्हे तर तब्बल पंधरा वेळा कानाखाली मारलं होतं.

नागार्जुन हे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वांत लोकप्रिय अभिनेते मानले जातात. त्यांनी त्यांच्या आजवरच्या करिअरमध्ये अनेक अभिनेत्रींसोबत काम केलंय. त्यांच्यासोबत काम केलेल्या एका मराठमोळ्या अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अनुभव सांगितला आहे. या अभिनेत्रीने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलंय. परंतु फिल्म इंडस्ट्रीत ती विशेष ओळख बनवू शकली नाही. आता एका मुलाखतीत तिने करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. तिने सांगितलं की 1998 मध्ये साऊथ सुपरस्टार नागार्जुन यांच्यासोबत ‘चंद्रलेखा’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एका सीनमध्ये खरेपणा आणण्यासाठी स्वत:च्या मर्जीने तिने अनेकदा कानाखाली मार खाल्ला होता. ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून ईशा कोपिकर आहे.
‘हिंदी रश’ला दिलेल्या मुलाखतीत ईशा म्हणाली, “मला नागार्जुन यांनी कानाखाली मारलं होतं. मला पूर्णपणे समर्पण भावनेनं आणि रिअल मेथडने अभिनय करायचं होतं. त्या सीनमध्ये खरेपणा आणायचा होता. त्यामुळे जेव्हा त्यांनी मला पहिल्यांदा कानाखाली मारली, तेव्हा मला काहीच जाणवलं नव्हतं. माझ्या करिअरमधील तो दुसराच चित्रपट होता. त्यामुळे मी त्यांना म्हणाले की, तुम्ही मला खरोखर कानाखाली मारा. त्यावर त्यांनी मला विचारलं की, याबद्दल तुला खात्री आहे का? नाही, मी नाही मारू शकत. तेव्हा मी त्यांना समजावलं की, मला ती भावना जाणवली पाहिजे. तुम्ही मला ज्या पद्धतीने मारत आहात, त्याने मला काहीच जाणवत नाहीये. त्यामुळे सीनमध्ये खरेपणा उतरत नाहीये. त्यानंतर त्यांनी मला कानाखाली मारलं, परंतु तेसुद्धा हळुवारच होतं.”
View this post on Instagram
ईशाने सांगितलं की त्या दृश्यामध्ये जितका राग दाखवण्याची गरज होती, तितकं ते स्क्रीनवर दिसत नव्हतं. कॅमेरामध्ये तिचे हावभाव योग्य प्रकारे कैद होत नव्हते. यामुळे दिग्दर्शक वारंवार रिटेक घेत होते. यादरम्यान नागार्जुन यांनी ईशाला जवळपास चौदा वेळा कानाखाली मारले होते. याविषयी ईशा पुढे म्हणाली, “राग दाखवण्याच्या प्रयत्नात मी चौदा-पंधरा वेळा त्यांच्या हातचा मार खावा लागला होता.” परिणामी शूटिंग संपल्यानंतर ईशाचा गाल पूर्णपणे लाल झाला होता. ते पाहून नागार्जुन यांनी तिची माफीदेखील मागितली होती. “माझ्या चेहऱ्यावर त्यांच्या हाताचे वळ उठले होते. त्यांना खूप वाईट वाटत होतं. ते मला बाजूला घेऊन म्हणाले, माफ कर. मग मीच त्यांना समजावलं की, तुम्ही कशाला माफी मागता? हा कामाचाच एक भाग होता.”
ईशा कोपिकरने तिच्या करिअरमध्ये ‘कृष्णा कॉटेज’, ‘पिंजर’, ‘क्या कूल है हम’, ‘डॉन’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. 2024 मध्ये ती एका तमिळ चित्रपटात झळकली होती.
