तुरुंगात बसल्या बसल्या 25 कोटींचं दान; प्रसिद्ध अभिनेत्रीला आरोपीकडून लव्ह-लेटर
200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या या आरोपीने प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला प्रेम पत्र लिहिलं आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त त्याने तुरुंगात बसल्या बसल्या कोट्यवधी रुपये दान केले आहेत.

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आज (11 ऑगस्ट) तिचा 40 वा वाढदिवस साजरा करतेय. यानिमित्त देशभरातील चाहत्यांकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अशातच 200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात तुरुंगात असलेल्या आरोपी सुकेश चंद्रशेखरनेही तिला पत्र लिहिलं आहे. एखादा सण असो किंवा वाढदिवस.. जॅकलिनच्या नावाने सुकेशचे पत्र सतत समोर येतच असतात. दिल्लीतल्या मंडोली तुरुंगात कैद असलेल्या सुकेशने पत्र लिहून जॅकलिनला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.. देव तुला खूप आशीर्वाद देवो”, असं त्याने या पत्रात लिहिलंय. इतकंच नव्हे तर तुरुंगात बसून त्याने जॅकलिनच्या वाढदिवशी तब्बल 25 कोटी रुपये दान केले आहेत.
सुकेशने जॅकलिनला अशा पद्धतीने खुलं पत्र लिहिण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. या नव्या पत्रात त्याने लिहिलंय, ‘उत्तराखंडमध्ये अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. ढगफुटीचा फटका शेकडो लोकांना बसला आहे. अनेकांनी त्यांच्या आप्तस्वकीयांना गमावलं आहे. मी तुझ्याकडून तुझ्या वाढदिवसाची भेट म्हणून मुख्यमंत्री मदत निधीसाठी 25 कोटी रुपये दान करतोय. या पैशांमुळे तिथल्या लोकांची थोडीफार मदत होऊ शकेल.’
View this post on Instagram
जॅकलिन फर्नांडिस ही सुकेशला डेट करत होती, असा दावा त्याच्या वकिलाने कोर्टात केला होता. परंतु तिने हे सर्व आरोप फेटाळले आहेत. विशेष म्हणजे जॅकलिन आणि सुकेशचे इंटिमेट फोटोसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर तिच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली होती. तर दुसरीकडे सुकेशकडून जॅकलिनला अत्यंत महागड्या भेटवस्तू मिळाल्या होत्या, असाही दावा करण्यात आला होता. यामध्ये आलिशान गाड्या, प्रायव्हेट जेट आणि एक यॉट यांचा समावेश होता.
मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलिनने तिच्या जबाबात म्हटलं होतं, “सुकेश माझ्या भावनांशी खेळला आणि त्याने माझं आयुष्य, करिअर उद्ध्वस्त केलं आहे. त्याने माझी फसवणूक केली.” सुकेशने सहकारी पिंकी ईराणीमार्फत जॅकलिनशी संपर्क साधला होता. सुकेश हा गृहमंत्रालयाशी संबंधित असून तो सरकारसाठी काम करतो, अशी खोटी ओळख तिने जॅकलिनला करून दिली होती. इतकंच नव्हे तर “तो सन टीव्हीचा मालक आहे आणि जयललिता यांच्या कुटुंबीयांशी त्याचे जवळचे संबंध आहेत. तुझा तो खूप मोठा चाहता आहे. साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील बरेच प्रोजेक्ट्स त्याने तुझ्यासाठी आणले आहेत”, असं सांगून तिची जॅकलिनची फसवणूक केली होती.
