‘होय ती आमच्यासोबत राहते..’; तब्बू-नागार्जुन यांच्या अफेअरच्या चर्चांवर काय म्हणाली होती पत्नी?
तब्बू आणि नागार्जुन हे एकेकाळी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते, असं म्हटलं जातं. मात्र दोघांनी कधीच जाहीरपणे रिलेशनशिपचा स्वीकार केला नव्हता. या दोघांच्या अफेअरच्या चर्चांवर एका मुलाखतीत नागार्जुनच्या पत्नीने प्रतिक्रिया दिली होती.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते नागार्जुन यांचा आज (29 ऑगस्ट) 65 वा वाढदिवस आहे. त्यांचा जन्म 29 ऑगस्ट 1959 रोजी चेन्नईमध्ये झाला होता. त्यांनी केवळ दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतच नाही तर बॉलिवूडमध्येही काम केलंय. नागार्जुन यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात बालकलाकार म्हणून केली होती. चित्रपटांसोबतच ते त्यांच्या खासगी आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत आले. नागार्जुन यांचं नाव एकेकाळी अभिनेत्री तब्बूशी जोडलं जायचं. तब्बू आणि नागार्जुन यांचं अफेअर होतं, असं म्हटलं जायचं. इतकंच नव्हे तर तब्बू ही नागार्जुन यांच्या हैदराबादमधल्या घरीसुद्धा जायची, अशीही जोरदार चर्चा होती. त्यावर एका मुलाखतीत खुद्द नागार्जुन यांच्या पत्नीने प्रतिक्रिया दिली होती.
नागार्जुन यांनी पहिलं लग्न लक्ष्मी यांच्याशी केलं होतं. लक्ष्मी या रामानायडू दग्गुबती यांची बहीण आहे. लक्ष्मी आणि नागार्जुन यांचं लग्न 1984 मध्ये झालं होतं. मात्र या दोघांचं लग्न फक्त सहा वर्षेच टिकू शकलं होतं. 1990 मध्ये ते विभक्त झाले. दाक्षिणात्य अभिनेता आणि समंथा रुथ प्रभूचा पूर्व पती नाग चैतन्य हा लक्ष्मी आणि नागार्जुन यांचाच मुलगा आहे. त्यानंतर नागार्जुन यांनी अभिनेत्री अमला अक्किनेनी यांच्याशी दुसरं लग्न केलं. 1992 मध्ये त्यांनी हे दुसरं लग्न केलं असून या दोघांना अखिल हा मुलगा आहे. अमला यांच्याशी लग्नानंतर नागार्जुन आणि तब्बू यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं होतं.
View this post on Instagram
नागार्जुन यांच्यासाठी तब्बू मुंबई सोडून हैदराबादला गेल्याचंही म्हटलं गेलं होतं. मात्र एका मुलाखतीत तब्बूने स्पष्ट केलं होतं की ती हैदराबादला नागार्जुन यांच्यासाठी नाही तर घर खरेदी करण्यासाठी गेली होती. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत नागार्जुन यांची पत्नी अमला यांनीसुद्धा पतीच्या अफेअरच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली होती. “माझं घर हे एका पवित्र मंदिरासारखं आहे. फिल्म इंडस्ट्रीतील फालतू चर्चांमुळे मला माझ्या घराची पवित्रता नष्ट करायची नाही. माझा विश्वास कोणीच तोडू शकत नाही. माझ्या घरात काय चाललंय, याने कोणालाच फरक नाही पडला पाहिजे. मी अशा अफवांकडे लक्ष देत नाही. माझ्या पतीलाही मी त्याबाबत प्रश्न विचारत नाही”, असं त्या म्हणाल्या होत्या.
तब्बू आणि नागार्जुन यांच्याविषयी बोलताना त्या पुढे म्हणाल्या, “डॅनी डँझोग्पा यांना मी राखी बांधते आणि त्यांच्यानंतर तब्बूच ही माझी सर्वांत जवळची मैत्रीण आहे. आजसुद्धा ती हैदराबादला आली तरी ती आमच्याच घरी राहते.” 2017 मध्ये ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत नागार्जुन म्हणाले होते, “होय, तब्बू ही माझी खूप चांगली मैत्रीण आहे. आमची मैत्री खूप जुनी आहे. मी 21-22 वर्षांचा आणि ती 16 वर्षांची असल्यापासून आम्ही एकमेकांचे मित्रमैत्रिणी आहोत. म्हणजे हे जणू आमचं अर्ध आयुष्यच झालं आहे. त्यामुळे आमच्या मैत्रीबद्दल जितकं बोलावं तितकं कमीच आहे.”
