China : चीनने अखेर काढले भात्त्यातील अस्त्र, भारताविषयी ती मोठी घोषणा, ट्रम्प यांना मोठा धक्का
China-India Dialogue : तिकडे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात आलास्का येथे बैठक सुरू होत आहे, अगदी त्याचवेळी चीनने भात्त्यातील अस्त्र काढले. भारताविषयी चीनने मोठी घोषणा केली.

अमेरिकेची दादागिरी मोडीत काढण्यात भारताने जगात पुढाकार घेतला आहे. चीनही अमेरिकेला जुमानताना दिसत नाही. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात आलास्का येथे बैठक सुरू होत असतानाच चीनने मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे ट्रम्प यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. भारताविषयी चीनचे धोरण बदलत असल्याचे संकेत मिळत आहे. त्यातून जगात अमेरिकेला शह देण्यासाठी एक नवीन मंच तयार होण्याची शक्यता आहे. काय घडतायेत घडामोडी?
प्रमुख विकसनशील देश
भारत आणि रशियाची अर्थव्यवस्था मृतावस्थेत असल्याचे बाष्कळ वक्तव्य ट्रम्प यांनी केले होते. त्यानंतर आज चीनने महत्त्वपूर्ण भूमिका घेतली. चीन आणि भारत या जगातील प्रमुख विकसनशील अर्थव्यवस्था असल्याचे चीनने म्हटले आहे. चीनचा भारतीय बाजारपेठेवर डोळा आहे. अमेरिकेने टॅरिफ लादल्यानंतर चीनला भारताची नितांत गरज भासत आहे. तर दुसरीकडे दोन्ही देशातील ही जवळीक ट्रम्प यांची डोकेदुखी वाढवणारी ठरू शकते.
ड्रॅगन आणि हत्ती एकमेकांना मदत करतील
“ड्रॅगन आणि हत्ती यांनी एकमेकांना यशस्वी होण्यास मदत करावी. भागीदार म्हणून सहकार्य करावे हाच दोन्ही बाजूंसाठी योग्य पर्याय आहे.” असे चीनचे परराष्ट्र खात्याने म्हटले आहे. दक्षिण आशियातील या दोन बड्या शक्तींनी आता एकत्र यावे अशी अपेक्षा चीनच्या परराष्ट्र खात्याने व्यक्त केली आहे. ग्लोबल टाईम्सने याविषयीचे वृत्त दिले आहे.
नवी दिल्लीसोबत बीजिंग द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याविषयी आणि जागतिक मंचावर दोन्ही देश एकत्र येण्याविषयी तुमचे मत काय आहे यावर उत्तर देताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान यांनी असे उत्तर दिले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय उत्पादनांवर 50 टक्के टॅरिफ, कर लावण्याची अनाकलनीय भूमिका घेतली आहे. इतकेच नाही तर रशियाशी व्यापार करत असल्याने आर्थिक दंडही ठोठावला आहे. त्यामुळे भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिक्स राष्ट्रे, विशेषतः चीनला जवळ करण्याची रणनीती आखली आहे. 2020 मध्ये गलवान व्हॅलीमध्ये उभय देशांच्या सैनिकात झडप झाली होती. त्यात दोन्ही बाजूंचे नुकसान झाले होते. त्यानंतर दोन्ही देशातील संवाद खंडीत झाला होता.
