India Pakistan: बिथरलेल्या पाकिस्तानची भारताला पुन्हा पोकळ धमकी, युद्ध झाल्यास भारत ढिगाऱ्याखाली…
भारताने ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानला धूळ चारली होती. मात्र तरीही पाकिस्तानचे शेपूट वळवळताना दिसत आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी आज भारताला पोकळ धमकी दिली आहे.

भारताने ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानला धूळ चारली होती. मात्र तरीही पाकिस्तानचे शेपूट वळवळताना दिसत आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी आज भारताला पोकळ धमकी दिली आहे. ‘जर भारताने भविष्यात हल्ला करण्याची हिंमत केली तर पाकिस्तान पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर देईल’ असं आसिफ यांनी म्हटलं आहे. याबाबत त्यांनी एक सोशल मीडिया पोस्ट केली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
भारताला पोकळ धमकी
भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पाकिस्तानला दहशतवादावर आवर घालण्याचा इशारा दिला होता. याला आसिफ यांनी उत्तर दिले आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट करत आसिफ म्हणाले की, ‘भारत सरकार देशांतर्गत मुद्द्यांवरून लक्ष हटवण्यासाठी तणाव वाढवत आहे. पाकिस्तान हा अल्लाहच्या नावाने निर्माण झालेला देश आहे. अल्लाहचे सैनिक आमचे रक्षक आहेत. यावेळी भारताला त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली गाडले जाईल.’
भारताने पाकिस्तानची एफ-16 विमाने पाडली
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने पाकिस्तानची एफ-16 लढाऊ विमाने पाडल्याचा आणि काही पाकिस्तानी लष्करी तळ उडवल्याचे भारतीय हवाई दल प्रमुख ए.पी. सिंग यांनी सांगितले होते. तसेच एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंग यांनी, ‘भारताने पाकिस्तानी हवाई तळावरील तीन हँगरवरही हल्ला केला, ज्यामध्ये अंदाजे 4-5 विमाने कोसळली. यात एफ-16 विमानांचा समावेश होता, कारण हे हँगर एफ-16 विमानांसाठी असतात.’
ऑपरेशन सिंदूर बद्दल बोलताना हवाई दल प्रमुख म्हणाले की,’पाकिस्तान आपल्या लोकांना खोट्या गोष्टी सांगत आहे, त्यांना ते करू द्या. त्यांच्याकडे त्यांच्या लोकांना सांगण्यासाठी काहीतरी आहे. 3-4 दिवसांच्या ऑपरेशन दरम्यान आम्ही अचूक मारा करत टार्गेट हिट केले. आमची विमाने पाकिस्तानच्या आत 300 किलोमीटर घुसून हल्ला करून परत आली.’
ख्वाजा आसिफ यांनी सोशल मीडियावर भारत 0-6 च्या पराभवाची लाज लपवण्याचा प्रयत्न करत आहे असं म्हटलं आहे. मात्र 0-6 च्या पराभवाचा अर्थ काय हे त्यांनी स्पष्ट केले नाही. दरम्यान, पाकिस्तानने स्वतः संघर्ष संपवण्याची विनंती केली होती असं भारत सरकारने अनेकदा स्पष्ट केले आहे.
