बलुचिस्तानमध्ये मोठं काहीतरी घडणार? पाकिस्तान सरकारच्या त्या निर्णयानं उडाली खळबळ, बलूच बंडखोर रस्त्यावर
बलुचिस्तानमध्ये या वर्षी गेल्या सहा महिन्यांमध्ये तब्बल 286 हल्ले झाले आहेत. या हल्ल्यांमध्ये 700 पेक्षा जास्त सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला आहे, आता इथे काहीतरी मोठं घडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

पाकिस्तानमधून मोठी बातमी समोर येत आहे, पाकिस्तान सरकारकडून बलुचिस्तान प्रांतामध्ये इंटरनेट पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रीय सुरक्षेचं कारण पुढे करत पाकिस्तानच्या दूरसंचार विभागाकडून याबाबत आदेश काढण्यात आले आहेत. दूरसंचार विभागानं काढलेल्या आदेशानुसार आता 31 ऑगस्टपर्यंत बलुचिस्तानमध्ये इंटरनेट पूर्णपणे बंद राहणार आहे. पाकिस्तान सरकारनं बलुचिस्तानमध्ये इंटरनेट पूर्णपणे बंद करण्याचे आदेश दिले आहेत, या आदेशानंतर आता असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, बलुचिस्तानमध्ये काहीतरी मोठं घडण्याची शक्यता आहे. नुकतेच पाकिस्तानच्या सरकारकडून इंटरनेट बंद ठेवून खैबर पख्तूनख्वा प्रांतामध्ये एक ऑपरेशन राबवण्यात आलं होतं.
पाकिस्तानी सरकारकडून इंटरनेट बंद ठेवून दहशतवादी मारण्याच्या नावाखाली खैबर पख्तूनख्वा प्रांतात पाकिस्तानी सैन्याकडून एक ऑपरेशन राबवण्यात आलं, मात्र या मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांपेक्षा सामान्य नागरिकच अधिक मारले गेल्याचं वृत्त समोर आलं आहे. खैबर पख्तूनख्वा प्रांतानंतर बलुचिस्तान हे पाकिस्तानमधील दुसरं सर्वात जास्त संवेदनशील क्षेत्र आहे. आता या प्रांतामध्ये पाकिस्तानी सरकारकडून इंटरनेट बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
बलुचिस्तानमध्ये 6 महिन्यांत 286 हल्ले
बलुचिस्तानमध्ये या वर्षी गेल्या सहा महिन्यांमध्ये तब्बल 286 हल्ले झाले आहेत. या हल्ल्यांमध्ये 700 पेक्षा जास्त सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला आहे. संयुक्त राष्ट्रानं केलेल्या दाव्यानुसार बलुचिस्तानमध्ये बलूच बंडखोर आणि तहरीक -ए तालिबानचे दहशतवादी तेथील पॉलिसी ठरवत आहेत, त्यासाठी तेथे दोन ट्रेनिंग सेंटरची देखील स्थापना करण्यात आली आहे. बलूच बंडखोरांकडून पाकिस्तानी सैनिकांवर हल्ले सुरूच आहेत.
दरम्यान आता बलुचिस्तानमध्ये इंटरनेट बंद करण्यात आल्यानं हा स्वातंत्र्यावर घाला असल्याचा आरोप करत बलूच बंडखोर आता अधिक आक्रमक झाले आहेत, त्यांच्याकडून पाकिस्तानच्या रेल्वे रुळांवर हल्ला करण्यात आला आहे, तसेच पाकिस्तानी सैनिकांवर देखील हल्ल्याची तयारी सुरू आहे. दरम्यान या घटनेबाबत बोलताना वरिष्ठ पत्रकार मीर यार यांनी म्हटलं आहे की, बलुचिस्तानमध्ये काहीतरी मोठं घडू शकतं, इंटरनेट बंद केल्यामुळे बलूच बंडखोर अधिक आक्रमक झाले आहेत.
