‘नरेंद्र, सरेंडर’ या राहुल गांधींच्या वक्तव्याविरोधात काँग्रेसमधूनच पहिला बॉम्ब; शशी थरूर यांनी असा घेतला समाचार
Congress Shashi Tharoor : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी 'नरेंद्र, सरेंडर' अशी बोचरी टीका केली होती. त्यानंतर एकच खळबळ उडाली. आता काँग्रेसमधूनच त्यांच्या वक्तव्यावर पहिला बॉम्बगोळा पडला आहे. काय म्हणाले शशी थरूर?

ऑपरेशन सिंदूर विषयी काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर बोचरी टीका केली होती. नरेंद्र, सरेंडर या त्यांच्या विधानाने एकच खळबळ उडाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावामुळेच भारत आणि पाकिस्तानातील तणाव निवळाला. भारताने कारवाई थांबवल्याचे सूतोवाच राहुल गांधी यांनी केले होते. त्यावर आता काँग्रेस खासदार शशी थरूर यांचे वक्तव्य आले आहे. वॉशिंग्टन डीसीमधील पत्रकार परिषदेत त्यांना गांधींच्या विधानाविषयी विचारले. तेव्हा थरूर यांनी मोठा बॉम्ब टाकला.
काय म्हणाले शशी थरूर?
भारत आणि पाकिस्तानातील तणावादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी खरंच मध्यस्थी केली होती का? असा सवाल शशी थरूर यांना विचारण्यात आला. काँग्रेस सुद्धा ट्रम्प यांच्या दबावामुळेच कारवाई थांबवल्याचा आरोप करत असल्याचे त्यांना विचारण्यात आले. त्यावर शशी थरूर यांनी मोठे वक्तव्य केले. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांविषयी आमच्या मनात आदर आहे. आम्ही आता केवळ इतकेच सांगू इच्छितो की, आम्ही कधी कोणाला मध्यस्थी करण्यास सांगितले नाही.
पाकिस्तानला सुनावले
थरूर यांनी पाकिस्तानवर सुद्धा निशाणा साधला. पाक जर दहशतवादाला प्रोत्साहन देण्यास थांबवणार असेल. दहशतवाद पोसणे बंद करणार असेल तर आम्ही त्यांच्याशी चर्चेच तयार आहोत. जर पाकिस्तान खरंच कठोर पावलं टाकेल आणि तसे दिसून येईल तर भारताचे पाकिस्तानसोबत संबंध सामान्य होतील. असे होत असेल तर आम्ही खरंच पाकिस्तानसोबत चर्चेस तयार आहोत.
राहुल गांधी काय म्हणाले?
लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान सैन्य संघर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला आणि त्यानंतर ते झुकले असा दावा गांधी यांनी केला होता. 1971 च्या युद्धावेळी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी या झुकल्या नाहीत. तेव्हा अमेरिकेने त्यांच्या युद्धनौका पाठवल्या होत्या. पण तरीही इंदिरा गांधी मागे हटल्या नाहीत. या कार्यक्रमात त्यांनी नरेंद्र, सरेंडर असे वक्तव्य केले.
या कार्यक्रमानंतर राहुल गांधी यांनी एक्सवर एक पोस्ट केली. “ट्रम्प यांचा एक फोन आला आणि नरेंद्र मोदी यांनी लागलीच सरेंडर केले. ते झुकले. इतिहास साक्षीला आहे. हेच भाजपा-आरएसएसची प्रवृत्ती आहे, चरित्र आहे. ते नेहमी झुकतात” असा घणाघात घातला. 1971 मध्ये अमेरिकेच्या धमकीनंतरही भारताने पाकिस्तानचे दोन तुकडे केले होते. काँग्रेसचे वाघ आणि वाघिणी हे सुपरपॉवर्स शी दोन हात करतात, ते कधी झुकत नाहीत, असा दावा गांधी यांनी केला.
