तुटलेली लिपस्टिक फेकताय? थांबा! ‘या’ 5 कमाल ब्यूटी प्रोडक्टसाठी करा तिचा वापर!
जेव्हा लिपस्टिक तुटते, तेव्हा आपल्याला वाटते की ती आता कोणत्याही कामाची राहिली नाही. पण तुम्हाला माहीत आहे का की, या तुटलेल्या लिपस्टिकपासून तुम्ही घरबसल्या अनेक अप्रतिम 'मेकअप प्रोडक्ट' तयार करू शकता? यामुळे केवळ तुमचे पैसेच वाचणार नाहीत, तर तुमची नवीन 'मेकअप किट'ही तयार होईल!

आपली आवडती लिपस्टिक तुटली की अनेकांना वाईट वाटते आणि ती सरळ कचऱ्यात टाकून दिली जाते. पण थांबा! ही तुटलेली लिपस्टिक तुमच्यासाठी एक नवा खजिना ठरू शकते. तुमच्या घरातील ही छोटीशी ‘ब्यूटी प्रॉडक्ट’ आता तुम्हाला पैसे वाचवून अनेक नवे मेकअप पर्याय देईल. थोडी कल्पनाशक्ती वापरून, तुम्ही या तुटलेल्या लिपस्टिकपासून 5 खास ‘ब्यूटी प्रोडक्ट्स’ तयार करू शकता, ज्यामुळे तुमची मेकअप किट ताजीतवानी होईल.
तुटलेल्या लिपस्टिकपासून बनवा ‘हे’ 5 अप्रतिम ‘ब्यूटी प्रोडक्ट्स’:
टिंट (Tint):
आजकाल चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणण्यासाठी ‘टिंट’ खूप लोकप्रिय आहे. हा ‘टिंट’ बनवण्यासाठी, तुटलेल्या लिपस्टिकचा एक छोटा तुकडा एका लहान डबीत घ्या. त्यात थोडे कोरफडीचे जेल किंवा व्हॅसलीन मिसळा आणि चांगले एकजीव करा. मिश्रण गुळगुळीत होईपर्यंत ढवळत राहा. जर लिपस्टिक मिसळत नसेल, तर एका वाटीत घेऊन हलके गरम करून वितळवा. हा ‘टिंट’ बोटांनी गालांवर आणि ओठांवर लावा, ज्यामुळे तुम्हाला नैसर्गिक आणि ‘ग्लोइंग’ लुक मिळेल.
क्रीमी ब्लश (Creamy Blush):
‘ब्लश’ तुमच्या गालांना उठाव देतो आणि मेकअपला पूर्ण करतो. तुटलेल्या लिपस्टिकचा वापर करून तुम्ही सहजपणे ‘क्रीमी ब्लश’ बनवू शकता. यासाठी लिपस्टिकचा तुकडा मॉइश्चरायझर किंवा चेहऱ्यावरील तेलात (फेस ऑइल) मिसळा. मिश्रण ‘क्रीमी’ होईपर्यंत मिसळत राहा. हे मिश्रण बोटांनी गालांवर हलके ‘टॅप’ करून लावा आणि हळूवारपणे पसरवा. हा ‘ब्लश’ पावडर ब्लशसारखा कोरडा नसतो आणि तो जास्त काळ टिकतो.
आयशॅडो (Eyeshadow):
डोळ्यांचा मेकअप करताना ‘आयशॅडो’ खूप महत्त्वाचा असतो, कारण तो डोळ्यांना त्वरित सुंदर बनवतो. ड्रेसला शोभेल असा ‘आयशॅडो’ बनवण्यासाठी, लिपस्टिकच्या लहान तुकड्यात थोडे ट्रान्सलुसंट पावडर (पारदर्शक पावडर) मिसळा. तुम्ही थोडे ‘शिमर’ (चमक) देखील घालू शकता, ज्यामुळे पार्टीला जाण्यासाठी ‘बोल्ड लुक’ मिळेल. हा ‘आयशॅडो’ ब्रशने किंवा बोटांनी पापण्यांवर लावा.
लिप स्क्रब (Lip Scrub):
लिपस्टिकमध्ये ओठांना मुलायम ठेवणारे घटक असतात. या गुणधर्माचा वापर करून तुम्ही तुटलेल्या लिपस्टिकपासून ‘लिप स्क्रब’ बनवू शकता. यासाठी, तुटलेली लिपस्टिक गॅसवर किंवा मायक्रोवेव्हमध्ये वितळवा. त्यात ब्राऊन शुगर किंवा पांढरी साखर मिसळा. बेस म्हणून मध, नारळाचे तेल, ऑलिव्ह ऑइल किंवा जोजोबा ऑइल वापरू शकता. हे मिश्रण चांगले एकजीव करा. हा स्क्रब आठवड्यातून १-२ वेळा ओठांवर गोलाकार फिरवत लावा. यामुळे ओठांवरील मृत त्वचा (डेड स्किन) निघून जाईल आणि ओठ मुलायम होतील. स्क्रब केल्यावर ‘लिप बाम’ किंवा पेट्रोलियम जेली लावायला विसरू नका.
नेल पॉलिश (Nail Polish)
लिपस्टिकपासून ‘नेल पॉलिश’ बनवता येते हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हे खरं आहे आणि खूप सोपंही आहे. एका वाटीत तुटलेली लिपस्टिक घेऊन ती चांगली कुस्करून घ्या, जेणेकरून त्यात गुठळ्या राहणार नाहीत. तुम्ही लायटरच्या मदतीनेही लिपस्टिक वितळवू शकता. आता हे मिश्रण ‘ट्रान्सपरंट नेल पॉलिश’मध्ये मिसळा आणि चांगले ढवळून घ्या. मिश्रण गुळगुळीत झाल्यावर ब्रशच्या मदतीने नखांवर लावा.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
