…तर एकाही ओबीसी मंत्र्याला महाराष्ट्रात फिरु देणार नाही, प्रकाश शेंडगे आक्रमक

ओबीसी विरुद्ध मराठा वाद पेटवण्याचं षडयंत्र सुरू आहे. मराठा आरक्षणाचं राजकारण होतंय. ओबीसी समाजाचं ताट खेचण्याचा प्रयत्न होतोय, असा आरोर ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी केला.

Akshay Adhav

|

Oct 31, 2020 | 2:54 PM

मुंबई :  मराठा समाजाच्या सगळ्या मागण्या राज्य सरकारकडून ऐकल्या जातात. अगदी एका समाजासाठी नोकरभरती थांबवून इतर समाजाचं नुकसान केलं जातं. मात्र आमच्या ओबीसी मंत्र्यांचा आवाज मुख्यमंत्री आणि सरकारपर्यंत पोहोचत नाही. जर मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याचा प्रयत्न झाला किंवा तशी पावले उचलली गेली तर एकाही ओबीसी मंत्र्याला महाराष्ट्रात फिरु देणार नाही, अशी आक्रमक भूमिका ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी मांडली. (Prakash Shendge warns OBC Minister over Maratha Reservation)

प्रकाश शेंडगे यांनी मराठा आरक्षण तसंच नोकरभरती संदर्भात पत्रकार परिषद घेऊन महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी मराठा नेते आणि संघटनांवर त्यांनी जोरदार टीका केली. मराठा समाजातील काही संघटना, नेतेमंडळी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिलं गेलं पाहिजे, अशी मागणी करत आहेत. अशी मागणी करुन हे नेते महाराष्ट्रातलं सामाजिक सलोख्याचं वातावरण बिघडवण्याचं काम करत आहेत, असा घणाघात शेंडगे यांनी केला.

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा कोणताही प्रस्ताव महाराष्ट्र सरकारने पारित करु नये. जर सरकारने तसा प्रस्ताव पारित करण्याचा प्रयत्न केला किंवा त्यासंबंधी काही पावले उचलली तर ओबीसी आणि भटक्या विमुक्तांचा आक्रोश होईल, असं ते म्हणाले.

ओबीसी विरुद्ध मराठा वाद पेटवण्याचं षडयंत्र सुरू आहे. मराठा आरक्षणाचं राजकारण होतंय. ओबीसी समाजाचं ताट खेचण्याचा प्रयत्न होतोय. ओबीसी आरक्षण बचावासाठी 3 तारखेला राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याचं शेंडगे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

ठाकरे सरकारने मराठा समाजाच्या मागण्या लगोलग मान्य केल्या. सगळ्या वर्गातील मुलं नोकरभरतीची वाट पाहत असताना सरकारने एका समाजासाठी नोकर भरती थांबवली. 13 टक्के जांगांसाठी 87 टक्के जागांची अडवणूक का? असा सवाल करत मराठा समाजाच्या 13 टक्के जागा बाजूला काढून इतर प्रवर्गातील मुलांची भरती करा, असं प्रकाश शेंडगे म्हणाले.

काहीही झालं तरी ओबीसींच्या ताटातलं आम्ही मराठा समाजाला देणार नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळावं हे आमचं देखील मत आहे. परंतू ओबीसीवर अन्याय आम्ही सहन करणार नाही, असं ते म्हणाले.

छत्रपतींचे वंशज फक्त मराठा समाजाच्या बाजून बोलतात, हे काही बरोबर नाही. वास्तविक त्यांनी सगळ्या समाजघटकांच्या प्रश्नांवर बोलणं अपेक्षित आहे, अशी अपेक्षाही यावेळी प्रकाश अण्णा शेंडगे यांनी व्यक्त केली.

संबंधित बातम्या

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याचा प्रयत्न झाल्यास…, प्रकाश शेंडगेंचा ठाकरे सरकारला इशारा

मराठा समाजाकडून आरक्षणाचा खेळखंडोबा, ओबीसीतून आरक्षण देण्यास आमचा विरोध : प्रकाश शेंडगे

OBC समाजाने रस्त्यावर भीक मागत फिरायचं का?; विजय वडेट्टीवारांचा सवाल

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें