शरीरात जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे केसांची वाढ थांबते, ते टाळण्यासाठी आहारात ‘या’ पदार्थांचा करा समावेश
केसांच्या वाढीसाठी योग्य पोषण मिळणे आवश्यक आहे. पण जर असे झाले नाही तर त्यांची वाढ थांबू लागते. जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्या केसांची वाढ थांबली आहे, तर तुमच्या शरीरात या जीवनसत्त्वांची कमतरता असण्याची शक्यता आहे. तर ही कमतरता भरून काढण्यासाठी तुमच्या आहारात या पदार्थांचा समावेश करा.

जाड, लांब आणि चमकदार केस असावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण जर केस गळत असतील, कोंडा होत असेल किंवा केसांची वाढ थांबत असेल तर ते चिंतेचे कारण बनते. कारण केस आपल्या आरोग्याबद्दल बरेच काही सांगतात. बऱ्याचदा, केसांची मंद वाढ ही आपल्या शरीरात काही आवश्यक जीवनसत्त्वांच्या कमतरतेशी थेट संबंधित असते.
जर तुमच्या केसांची वाढ कमी झाली असेल किंवा थांबली असेल तर तुमच्या शरीरात पोषणाची कमतरता असण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊया त्या आवश्यक जीवनसत्त्वांबद्दल ज्यांच्या कमतरतेचा तुमच्या केसांच्या वाढीवर थेट परिणाम होतो.
बायोटिन (व्हिटॅमिन बी7)
बायोटिनला अनेकदा ‘हेअर व्हिटामिन’ असे संबोधले जाते. हे जीवनसत्व केस, त्वचा आणि नखांसाठी अत्यंत महत्वाचे आहे. बायोटिन केसांचे मुख्य संरचनात्मक एकक असलेल्या केराटिन नावाच्या प्रथिनाच्या निर्मितीस मदत करते.
कमतरतेची लक्षणे- बायोटिनच्या कमतरतेमुळे केस पातळ होऊ लागतात, वेगाने गळतात आणि त्यांची वाढ पूर्णपणे थांबू शकते. याशिवाय नखे तुटणे आणि त्वचेवर पुरळ उठणे देखील होऊ शकते. तर ही कमतरता भरून काढण्यासाठी अंड्याचा पिवळा भाग, काजू, बदाम, अक्रोड, सूर्यफूलाच्या बिया, रताळे, पालक आणि फ्लावर यांचा आहारात समावेश करा.
व्हिटॅमिन डी
व्हिटॅमिन डी केवळ हाडांसाठीच नाही तर केसांच्या फॉलिकल्सच्या आरोग्यासाठी देखील महत्त्वाचे आहे. हे जीवनसत्व नवीन केसांच्या फॉलिकल्स तयार करण्यास आणि विद्यमान फॉलिकल्स सक्रिय ठेवण्यास मदत करते.
अशातच जर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन डीच्या कमतरता भासल्यास केस गळू लागतात आणि केसांची वाढ मंदावते. बऱ्याचदा अलोपेसियासारख्या समस्या देखील या कमतरतेशी संबंधित असतात. तर व्हिटॅमिन डीची कमतरता भरून काढण्यासाठी तसेच केसांच्या वाढीसाठी तुमच्या आहारात सकाळचा सूर्यप्रकाश, फॅटयुक्त मासे (सॅल्मन, मॅकरेल), अंडी, फोर्टिफाइड दूध आणि दही यांचा समावेश करा.
लोह
लोह शरीरात हिमोग्लोबिन तयार करण्याचे काम करते. जे संपूर्ण शरीरात ऑक्सिजन वाहून नेण्याचे काम करते. केसांच्या फॉलिकल्सपर्यंत ऑक्सिजन आणि पोषक तत्वे पोहोचवण्यात लोह महत्त्वाची भूमिका बजावते. लोहाची कमतरता हे केस गळण्याचे एक प्रमुख कारण आहे, विशेषतः महिलांमध्ये हे अधिक जाणवते. यामुळे केसांचे फॉलिकल्स कमकुवत होतात आणि केस वाढण्याऐवजी गळतात.
तर लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी हिरव्या पालेभाज्या जसे की पालक, बीन्स, मसूर, टोफू, लाल मांस आणि मनुका यांचा आहारात समावेश करा.
व्हिटॅमिन सी
व्हिटॅमिन सी हे एक पॉवरफूल अँटिऑक्सिडेंट आहे जे मुक्त रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून पेशींचे संरक्षण करते. तसेच कोलेजनच्या निर्मितीसाठी देखील आवश्यक आहे. तसेच, व्हिटॅमिन सी शरीराला लोह शोषण्यास मदत करते. व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे केस कोरडे आणि कमकुवत होऊ शकतात. त्याच्या कमतरतेमुळे लोहाच्या शोषणावरही परिणाम होतो, ज्यामुळे अप्रत्यक्षपणे केस गळतात.
तर ही कमतरता भरून काढण्यासाठी लिंबूवर्गीय फळे जसे की संत्री, लिंबू, मोंसबी, किवी, स्ट्रॉबेरी, शिमला मिरची आणि ब्रोकोली या पदार्थांचे आहारात समावेश करा.
व्हिटॅमिन-ई
व्हिटॅमिन ई हे एक आवश्यक अँटिऑक्सिडेंट देखील आहे जे ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करून स्कॅल्पमध्ये रक्त परिसंचरण सुधारते . चांगले रक्त परिसंचरण म्हणजे केसांच्या फॉलिकल्सपर्यंत अधिक पोषण आणि ऑक्सिजन पोहोचणे.
व्हिटॅमिन ईच्या कमतरतेमुळे स्कॅल्पचे आरोग्य खराब होते आणि केसांमध्ये कोरडेपणा येते, त्याचबरोबर केसांची वाढ मंद होते. तर ही कमतरता भासू नये यासाठी तुमच्या आहारात बदाम, सूर्यफुलाच्या बिया, एवोकॅडो, पालक आणि किवी यांचा समावेश करा.
व्हिटॅमिन-ए
शरीरातील प्रत्येक पेशीच्या वाढीसाठी व्हिटॅमिन ए आवश्यक आहे आणि केस हे शरीरातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या पेशींपैकी एक आहे. ते स्कॅल्पमध्ये सेबम उत्पादनास देखील मदत करते, ज्यामुळे स्कॅल्पमध्ये ओलावा राहतो आणि निरोगी केस राखले जातात. लक्षात ठेवा की व्हिटॅमिन ए च्या अतिसेवनामुळे केस गळू शकतात.
तर या पोषक तत्वाची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात रताळे, गाजर, पालक, भोपळा आणि अंडी यांचा समावेश करा.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
