हॉटेल नाही, होमस्टे हवाय? सुरक्षित आणि चांगला पर्याय निवडण्यासाठी काय कराल?
प्रत्येक होमस्टे तुमचा प्रवास सुखद करेलच असं नाही. कारण एक चुकीची निवड केवळ तुमचं बजेटच बिघडवत नाही, तर संपूर्ण प्रवासाचा आनंदही हिरावून घेऊ शकते. त्यामुळे जर तुम्ही प्रवासाला जात असाल आणि होमस्टे बुक करण्याचा विचार करत असाल, तर खाली दिलेल्या ८ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, ज्यामुळे तुमची निवड स्मार्ट ठरेल आणि तुमचा प्रवास अविस्मरणीय बनेल.

प्रवासाला निघालो की, नवीन ठिकाणं, वेगवेगळ्या लोकांची भेट आणि मनसोक्त फिरणं, याचा उत्साह असतो. हल्ली लोक हॉटेल्सऐवजी होमस्टे निवडायला लागले आहेत. होमस्टेमध्ये घरासारखं वाटतं, स्थानिक संस्कृती जवळून अनुभवता येते आणि खर्चातही बचत होते. पण, प्रत्येक होमस्टे तुम्हाला चांगला अनुभव देईलच असं नाही. कधीकधी चुकीचा होमस्टे निवडल्यास प्रवासाचा पूर्ण आनंदच हिरावला जातो. त्यामुळे, तुम्ही जर होमस्टेच्या शोधात असाल, तर खाली दिलेल्या 8 महत्त्वाच्या टिप्स लक्षात ठेवा:
1. ठिकाण (Location)
होमस्टे शहरापासून खूप दूर किंवा पर्यटन स्थळांपासून वेगळा असेल, तर तुमचा वेळ आणि प्रवासाचा खर्च वाढतो. म्हणून, मुख्य ठिकाणांजवळ असलेला होमस्टे निवडा.
2. रिव्ह्यूज (Reviews) आणि रेटिंग्ज (Ratings)
ऑनलाइन बुकिंग करण्यापूर्वी, त्या होमस्टेबद्दल मागील प्रवाशांनी काय लिहिलंय, ते नक्की वाचा. ‘स्टार रेटिंग्ज’ पाहून तुम्हाला होमस्टेची स्वच्छता, सुविधा आणि यजमानांचा (होस्ट) स्वभाव कसा आहे, याचा अंदाज येतो. जास्त नकारात्मक रिव्ह्यूज असतील, तर त्या होमस्टेचा विचार करू नका.
3. सुरक्षितता
तुमचा होमस्टे कितीही सुंदर दिसला तरी, सुरक्षितता नसेल तर तिथे राहू नका. दारांना योग्य कुलूपं आहेत का, सीसीटीव्ही कॅमेरे आहेत का आणि आजूबाजूचा परिसर सुरक्षित आहे का, हे तपासा.
4. जेवण
काही होमस्टेमध्ये ते लोक स्वतः जेवण देतात, तर काही ठिकाणी तुम्हाला स्वयंपाकघराची सोय मिळते. तुम्हाला काय हवंय आणि तुमच्या खाण्यापिण्याच्या गरजा काय आहेत, हे आधीच विचारा.
5. यजमानाचा (Host) स्वभाव आणि मदत:
एक चांगला यजमान तुमच्या गरजांची काळजी घेतो आणि तुम्हाला परिसराची माहिती देतो. बुकिंग करण्यापूर्वी, यजमान किती वेळ उपलब्ध असतील आणि गरज पडल्यास तुम्ही त्यांच्याशी कसे संपर्क साधू शकता, हे विचारा. यामुळे प्रवासात काही अडचण आल्यास लगेच मदत मिळते.
6. स्वच्छता (Hygiene)
कोरोनानंतर स्वच्छतेला खूप महत्त्व आलं आहे. होमस्टेचे फोटो काळजीपूर्वक पहा. बेडशीट, बाथरूम आणि इतर जागा किती स्वच्छ आहेत, याची खात्री करून घ्या.
7. वाय-फाय (Wi-Fi) आणि मूलभूत सुविधा
आजच्या काळात वाय-फाय आणि मोबाईल नेटवर्क खूप गरजेचं आहे. याशिवाय, गरम पाणी, पंखा, थंडीत हीटर आणि लाईट गेल्यास बॅकअप आहे का, यांसारख्या बेसिक गोष्टीही तपासा.
8. कॅन्सलेशन (Cancellation) आणि रिफंड (Refund)
जर काही कारणाने तुमचा प्रवासाचा प्लॅन रद्द झाला, तर तुम्हाला बुकिंगचे पैसे परत मिळतील का? होमस्टेची कॅन्सलेशन आणि रिफंड पॉलिसी काय आहे, ती स्पष्टपणे वाचा. यामुळे भविष्यात होणारे आर्थिक नुकसान टाळता येते.
