Home Tips : रक्षाबंधनापूर्वी घराला द्या ‘नवा लूक’, कमी खर्चात होईल काम
रक्षाबंधन काही दिवसांवर आले आहे. जर तुम्हालाही त्यापूर्वी आपले घर सुंदर आणि आकर्षक बनवायचे असेल, तर आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत, ज्यांच्या मदतीने तुम्ही कमी खर्चात घराला 'फेस्टिव्ह लूक' देऊ शकता.

रक्षाबंधन हा सण जवळ येत आहे आणि सणासुदीला घर स्वच्छ आणि सुंदर दिसणे कोणाला आवडणार नाही? पाहुणे येणार म्हटल्यावर घराची स्वच्छता आणि सजावट करणे क्रमप्राप्तच असते. पण यासाठी फार मोठा खर्च करण्याची गरज नाही. काही सोप्या आणि प्रभावी युक्त्या वापरून तुम्ही कमी वेळेत आणि कमी खर्चात आपल्या घराला एक नवा, आकर्षक आणि सणासुदीचा लूक देऊ शकता. चला, तर मग जाणून घेऊया असे कोणते उपाय आहेत, जे तुमच्या घराची शोभा वाढवतील.
घराची स्वच्छता
कोणत्याही सजावटीपूर्वी सर्वात महत्त्वाचे आहे ते म्हणजे घराची सखोल स्वच्छता. सर्वप्रथम संपूर्ण घराची व्यवस्थित साफसफाई करा. फर्निचरवरील धूळ आणि जाळी स्वच्छ करा. खिडक्या आणि दरवाजे पूर्णपणे पुसून घ्या. जर तुम्हाला वाटत असेल की भिंतींचा रंग फिका पडला आहे किंवा खूप हलका दिसतोय, तर तुम्ही भिंतींना नवीन रंग देऊ शकता किंवा आकर्षक वॉलपेपर लावून बदल घडवू शकता. यामुळे घराला त्वरित एक ‘फ्रेश लूक’ मिळतो.
पडदे आणि झाडे बदला
खिडक्या आणि दारांवरील जुने पडदे बदलून नवीन, रंगीत किंवा प्रिंटेड पडदे लावा. पडदे बदलल्याने घराचा संपूर्ण ‘मूड’ बदलतो आणि घराची रोनक वाढते. तुमच्या बाल्कनीमध्ये ठेवलेल्या कुंड्यांमधील झाडे जुनी झाली असतील, तर ती बदलून नवीन हिरवीगार रोपे लावा. बाल्कनीमध्ये आकर्षक लॅम्प्स किंवा फेअरी लाइट्स लावल्याने सायंकाळी घराला एक सुंदर आणि उबदार वातावरण मिळते.
भावंडांच्या आठवणींचा फ्रेम लावा:
घराच्या भिंतींवर भाऊ-बहिणीच्या नात्याशी संबंधित एखादा सुंदर फोटो फ्रेम लावल्यास तुमच्या बहिणीला किंवा भावाला नक्कीच आनंद होईल. तुम्ही तुमच्या बालपणीचे जुने फोटो मोठ्या फ्रेममध्ये लावून भिंती सजवू शकता. ही एक भावनिक आणि सुंदर सजावट ठरू शकते, जी पाहुण्यांचेही लक्ष वेधून घेईल.
सुंदर कारपेट आणि दिव्यांचा वापर:
रक्षाबंधनाचा कार्यक्रम ज्या खोलीत ठेवणार असाल, त्या खोलीला थोडी हलकी आणि उबदार प्रकाशयोजना (लायटिंग) करा. जमिनीवर सुंदर ‘कारपेट’ अंथरा आणि कोपऱ्यांमध्ये छोटी रोपे किंवा फुलदाण्या ठेवा. तुम्ही सणाच्या आदल्या दिवशी त्या खोलीत सुंदर फुलांची किंवा रंगांची रांगोळीही काढू शकता. यामुळे घरात येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला प्रसन्न आणि ताजेतवाने वाटेल.
जुण्या वस्तूंचा स्मार्ट वापर:
घरातील जुन्या पण चांगल्या वस्तूंचा वापर करून तुम्ही घराला एक वेगळा ‘डेकोरेटिव्ह’ लूक देऊ शकता. जुनी फुलदाणी, शोभेच्या वस्तू किंवा कलाकृतींना नवीन जागेत ठेवून तुम्ही त्यांचा पुनर्वापर करा. घराच्या बाहेरही सुंदर कुंड्यांमधील झाडे ठेवल्यास घराचे प्रवेशद्वार अधिक आकर्षक दिसेल. या सोप्या आणि बजेट-फ्रेंडली टिप्स वापरून तुम्ही घराला सुंदर बनवू शकता. तुमच्या या सजावटीचे कौतुक रक्षाबंधनासाठी येणारे पाहुणे नक्कीच करतील
