स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसची भूमिका काय, ठाकरे बंधूंच्या मेळाव्यानंतर सपकाळ यांचं मोठं वक्तव्य
सरकारने त्रिभाषा सूत्राबाबतचे दोन्ही निर्णय मागे घेतल्यानंतर शनिवारी मुंबईत विजयी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यानंतर सपकाळ यांनी युतीसंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे.

सरकारने त्रिभाषा सूत्राबाबतचे दोन्ही निर्णय मागे घेतल्यानंतर शनिवारी मुंबईत विजयी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्याला दोन्ही ठाकरे बंधू मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. त्यानंतर आता मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीची जोरदार चर्चा सुरू आहे. यावर आता काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
नेमकं काय म्हणाले सपकाळ?
काँग्रेस आणि राष्ट्रवादी पहिल्यापासूनच एकत्र लढत होती, मात्र भाजपला दूर ठेवण्यासाठी 2019 मध्ये शिवसेनेनं निर्णय घेतला. चर्चेनंतर महाविकास आघाडी अस्तित्वात आली . भाजपला दूर ठेवण्यासाठी राज्यात आणि देशात इंडिया अलायन्स तयार झाली. त्यावेळी आम्ही विधानसभा लोकसभा दोन्ही निवडणूक एकत्र लढलो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम्ही कोणतीही आघाडी युती केली नाही.
स्थानिक पातळीवर समविचारी पक्षासोबत युती करण्याचे अधिकार स्थानिक नेतृत्वाला दिले आहेत. समविचारी पक्षांचा संदर्भ आज रोजी उद्धव ठाकरे यांच्याशी संबंधित आहे. व्यापक स्वरुपाचा निर्णय घेतला जाईल, काँग्रेसच्या मूल्यांना जे स्वीकारतील त्यांच्यासोबत काँग्रेस पुढे जाईल, असं सपकाळ यांनी म्हटलं आहे.
दरम्यान या मेळाव्यावर देखील हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठी विषयाच्या अनुषंगाने दोघांनी एकत्र येऊन साजरा केलेला हा जल्लोष आहे . आगामी काळात दोन्ही पक्षाकडून काही स्पष्टीकरण जेव्हा येईल तेव्हा चर्चा करता येईल. महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका याबाबतचा निर्णय स्थानिक काँग्रेस कमिटीवर सोपवण्यात आला आहे. निवडणुका अद्याप जाहीर झाल्या नाहीत, त्या फेब्रुवारीमध्ये होतात की ऑक्टोबरमध्ये होतात की होतच नाही? हे गौडबंगाल आहे. भाजपाचा मूळ विषय सोडून इतरत्र लक्ष भटकाविणे हाच भाजपचा विषय आहे, असंही त्यांनी यावेळी म्हटलं.
दरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येऊन तिसरी आघाडी निर्माण होईल, महाविकास आघाडीमध्ये फूट पडेल, याचा फायादा हा महायुतीला होईल, असं मत महायुतीमधील काही नेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे, त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आघाडी, युतीचं समिकरण कसं असणार? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.