अनिल देशमुख यांना पुन्हा जेलमध्ये टाकण्याची मागणी, मुलगा सलील देशमुख यांचं सडेतोड उत्तर
अनिल देशमुख यांना पुन्हा जेलमध्ये टाकण्याची मागणी भाजप नेते परिणय फुके यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीला अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सलील देशमुख यांनी परिणय फुके यांना प्रत्युत्तर देताना कोर्टाचं निरीक्षण सांगितलं आहे.

भाजपचे विधान परिषदेचे आमदार परिणय फुके यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबद्दल मोठा दावा करत त्यांना पुन्हा जेलमध्ये टाकण्याची मागणी केली आहे. परिणय फुके यांच्या दाव्याला अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख यांनी प्रत्युत्तर दिलं आहे . “अनिल देशमुख मेडिकल बेलवर जामीनावर आहेत. ती बेल रद्द करून त्यांना पुन्हा जेलमध्ये टाकावं”, अशी मागणी परिणय फुके यांनी केली. यावर सलील देशमुख यांनी ट्विट करत कोर्टाने अनिल देशमुख यांच्या प्रकरणात नेमकं काय निरीक्षण नोंदवलं आहे, याची माहिती देत प्रत्युत्तर दिलंय. “अनिल देशमुख यांना न्यायालयाने जो जामीन दिला आहे तो मेडिकल ग्राउडंवर नाही तर या प्रकरणात विश्वासार्हता नसल्याच्या मेरीटवर दिला आहे’, असं सलील देशमुख म्हणाले आहेत.
“न्यायालयाने जामीन देताना तीन महत्वाचे निरीक्षण नोंदविलेले आहे. यातील पहिलं निरीक्षण असं की, अनिल देशमुख यांच्या विरोधात कोणतेही ठोस पुरावे नाहीत. दुसरं निरीक्षण हे ऐकीव माहीतीच्या आधारावर अनिल देशमुख यांच्यावर हे कथित आरोप केले आहेत. तर तिसऱ्या निरीक्षणात भविष्यात अनिल देशमुख या प्रकरणात दोषी ठरू शकणार नाहीत, असं म्हटलं आहे. तसेच न्यायालयाने दिलेला निकाल हा समाजमाध्यमांमध्ये उपलब्ध आहे”, असंही सलील देशमुख म्हणाले आहेत.
परिणय फुके आणखी काय म्हणाले?
“मी दुसऱ्यांदा विधान परिषद सदस्य म्हणून शपथ घेतली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानतो. आधी माझ्याकडे दोन जिल्ह्यांचा प्रतिनिधित्व होतं. जी जबाबदारी पक्ष देईल ती मी पार पाडेल”, असं परिणय फुके म्हणाले. “मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या असंविधानिक आहेत. जरांगे पाटील महाराष्ट्रात ओबीसी आणि मराठा यांच्यात भांडण लावण्याचे काम करत आहे”, असा आरोप परिणय फुके यांनी केला.
अनिल देशमुख विरुद्ध देवेंद्र फडणवीस यांच्यात वाकयुद्ध
अनिल देशमुख सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत. भाजप नेते गिरीश महाजन यांना मोक्का गुन्ह्यात अडकवण्याच्या आरोप प्रकरणात जळगावचे तत्कालीन एसपी प्रवीण मुंढे यांनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अनिल देशमुख त्यावेळी तत्कालीन गृहमंत्री होते. अनिल देशमुख यांनी गिरीश महाजन यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव निर्माण केला, असा आरोप प्रवीण मुंढे यांनी केल्याचं सीबीआयने आपल्या अहवालात म्हटलं आहे. याच प्रकरणावर देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुख यांच्यावर टीका केली होती. तर अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ईडीच्या चौकशीतून वाचायचं असेल तर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार आणि अनिल परब यांच्याविरोधात आरोप करुन त्यांना जेलमध्ये टाकायचं, अशी ऑफर देवेंद्र फडणवीस यांनी एका दुसऱ्या व्यक्तीच्या माध्यमातून दिली होती, असा धक्कादायक आरोप अनिल देशमुख यांनी केला आहे. या आरोप-प्रत्यारोपांमुळे राज्यातील राजकारण तापताना दिसत आहे.
