Manoj Jarange: SIT नेमली, कुणी नाही पाहिली; मनोज जरांगेंचा सुपारी प्रकरणात धनंजय मुंडेंसह सरकारवर तुफान टीका
Manoj Jarange on Dhananjay Munde: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आज एक वर्ष पूर्ण झाले. मनोज जरांगे देशमुख कुटुंबियांना भेटले. त्यावेळी त्यांनी धनंजय मुंडे आणि अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली. त्यांनी सरकारच्या भूमिकेवरही तोंडसूख घेतले.

Manoj Jarange Patil: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येला आज एक वर्ष पूर्ण झाले. मनोज जरांगे पाटील यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतली. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी धनंजय मुंडे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीकेची झोड उठवली. तर देशमुख हत्येप्रकरणात सरकारच्या भूमिकेवरही तोंडसूख घेतले. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याप्रकरणात लवकरात लवकरत न्याय देण्याची मागणी केली.
संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा कधी?
मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर प्रश्नांचा भडीमार केला. त्यावेळी वाटलं होतं की वर्ष उजाडणार नाही. कारण मुख्यमंत्र्यांनी तशा वल्गना केल्या होत्या. मुख्यमंत्र्यांचा त्या दिवशी हा शब्द होता. एक वर्षात का होईना सर्वजन फासावर लटकतील असं वाटलं होतं.अजित दादांच्या राष्ट्रवादीचा एक आमदार आहे. त्याच्या नुसार यंत्रणा सुरू आहे का? सरकार तर त्याला मार्गदर्शन करत नाही ना असा संशय जरांगे पाटील यांनी व्यक्त केला.
वाल्मिक कराड सुटणार असल्याच्या अफवा
यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी परळी आणि बीडमध्ये वाल्मिक कराड या प्रकरणातून सुटणार असल्याच्या अफवा पसरवण्यात येत असल्याचा दावा केला. मुंबईत आमची देशमुख प्रकरणासंदर्भात चर्चा झाली. परळीवाल्याने लोकांमध्ये पेरून ठेवलंय की आपला माणूस सुटणार असं म्हणा. परळीतुन तो असे काम करतोय. लोकांमध्ये चर्चा झाली आहे. जर तो सुटला तर बीड जिल्हा आणि महाराष्ट्र कडकडीत बंद ठेवला जाईल असा इशारा त्यांनी दिला. धनंजय मुंडे यांच्या इशाऱ्यावरूनच अशा चर्चा सुरू असल्याचा आरोप ही जरांगे पाटील यांनी केला. कोणी कितीही म्हणाला सुटणार आहे तरीही तो जेलमध्येच सडणार आहे. सुटला तर त्यादिवशी महाराष्ट्रात चाक सुध्दा फिरणार नाही, असे जरांगे म्हणाले.
अजितदादांना खडा सवाल
तुमच्यासाठी परळीवाला महत्वाचा आहे का? असा सवाल जरांगे पाटील यांनी अजितदादांना विचारला. अजितदादा, धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील भेटीवर त्यांनी निशाणा साधला. कृष्णा अंधाळे हा आरोपी पकडला तर खुप मोठा उलगडा होणार आहे. ही घटना गांभीर्याने घेऊन सर्व आमदार, मंत्र्यांनी न्याय देण्याचं काम करावं. 4-5 महिन्यात तरी करावं. नाहीतर मस्साजोगने हाक दिली तर आम्ही मागे पुढे बघणार नाही. अजित दादाला धनंजय मुंडे हेच हवे आहेत का? क्रुर लोकांना सोबत घेतल्यावर आम्हाला राग येणारच. अजित दादा आणि फडणवीस, परळीवाल्याची बैठक झाली. विकास कामाच्या बैठकीसाठी पोलीस महासंचालकांची गरज काय असा सवाल करत आतमध्ये काहीतरी शिजवत असल्याचा आरोपही मनोज जरांगे पाटील यांनी केला.
गुप्त एसआयटी काय भानगड?
काल धनंजय मुंडे यांनी आपल्या घातपातासाठी 2.5 कोटींची सुपारी दिल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी दिला होता. तर याप्रकरणी एसआयटी स्थापन झाली असून ती तपास करत असल्याचे धनंजय मुंडे सांगत असल्याचे जरांगे म्हणाले. माझ्या घातपाताच्या प्रकरणात गुप्त SIT गठीत करण्यात आल्याचे मुंडे म्हणत आहेत. माझ्या घातपात प्रकरणात एसआयटी स्थापन झाली आणि मलाच कशी माहिती नाही. धनंजय मुंडे हे सरकार चालवतात का असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी या एसआयटी प्रकरणावरून केला.
