Maharashtra Mahapalika Election 2026 : पहिलं मत पडण्याआधीच संपूर्ण महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेने जिंकल्या तब्बल इतक्या जागा, दमदार ओपनिंग
Maharashtra Mahapalika Election 2026 : महाराष्ट्रात 29 महानगर पालिकेच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीसाठी पहिलं मत पडण्याआधीच महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेने दमदार ओपनिंग केली आहे. मतदानाआधीच आश्चर्य वाटेल इतक्या जागा भाजप-शिवसेना युतीने जिंकल्या आहेत.

महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या. आता कोर्टाच्या आदेशाने या निवडणुका होत आहेत. पहिल्या टप्प्यात नगरपरिषद निवडणुका झाल्या. आता महापालिकेच्या निवडणुका होत आहेत. मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. येत्या 15 जानेवारीला मतदान आणि 16 जानेवारील मतमोजणी म्हणजे निकाल आहे. पण या महापालिका निवडणुकांसाठी एकही मत पडण्याआधीच भाजप-शिवसेना युतीने दमदार सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातील अनेक भागात भाजप-शिवसेनेचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. मतदान होण्याआधीच भाजप-शिवसेनेचे 66 उमेदवार नगरसेवकपदी निवडून आले आहेत.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दोन ठिकाणी जिंकले आहेत. शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. सर्वपक्षीयांकडून बंडखोरांना शांत करण्याचे, त्यांची समजूत घालण्याचे प्रयत्न सुरु होते. अनेक ठिकाणी बंडखोरांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यानंतर 66 ठिकाणी भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचं स्पष्ट झालं. मुंबई मेट्रोपॉलिटन रीजन क्षेत्रातील कल्याण-डोंबिवली महापालिकेत सर्वाधिक बिनविरोध उमेदवार निवडून आले आहेत. इथे महायुतीच्या 21 उमेदवारांनी मतदानाआधीच विजय मिळवला आहे. यात भाजपचे सर्वाधिक 15 आणि शिवसेनेचे 6 उमेदवार आहेत. केडीएमसी महापालिकेची सदस्या संख्या 122 आहे.
जळगावमध्ये सुद्धा भाजप-शिवसेनेचा बोलबाला
उत्तर महाराष्ट्रात जळगावमध्ये सुद्धा भाजप-शिवसेनेचा बोलबाला आहे. इथे सुद्धा दोन्ही पक्ष राजकीय दृष्ट्या फायद्यात आहेत. मतदानाआधीच जळगावमध्ये दोन्ही पक्षांचे डझनभर नगरसेवक निवडून आले आहेत. यात भाजप-शिवसेनेचे प्रत्येकी सहा नगरसेवक आहेत. हाच ट्रेंड MMR पनवेल क्षेत्रात सुद्धा आहे. इथे सात भाजप उमेदवार जिंकले आहेत.
मनसेने विचारले प्रश्न
भिवंडीत सुद्धा न लढताच सहा ठिकाणी विजय मिळवला आहे. एकनाथ शिंदे यांचा गड असलेल्या ठाण्यात शिवसेना सहा जागा जिंकण्यात यशस्वी ठरली आहे. राज ठाकरे यांच्या मनसेने निवडणुकीआधीच अशा प्रकारे विजय मिळवण्याच्या ट्रेंडवर प्रश्न विचारला. आंदोलन केलं. सत्ताधारी सरकारच्या पद्धतीवर प्रश्न विचारले.
अजून कुठे-कुठे विजय मिळवलाय?
दुसऱ्याठिकाणी सुद्धा छोटे पण राजकीय दृष्ट्या फायदे झाले. धुळ्यात भाजपचे मतदानाआधीच तीन उमेदवार निवडून आले. अहिल्यानगरमध्ये राष्ट्रवादी दोन ठिकाणी विजयी ठरली. भाजपने एक जागा जिंकली. नगर परिषद निवडणुकीत महायुतीने क्लीन स्वीप केलं होतं. आता महापालिकेत मिळालेल्या या विजयामुळे सत्ताधारी महायुतीची ताकद वाढणार आहे.
