शिंदे गटाचा ऐनवेळी गेम? मुंबईत महापौर भाजपाचाच? बड्या नेत्याने थेट सांगितल्याने खळबळ!
भाजपाच्या बड्या नेत्याने मुंबईच्या महापौरपदाविषयी मोठं विधान केलं आहे. त्यांनी सर्वांनी संख्याबळ लक्षात घेतलं पाहिजे. महापौर भाजपाचा होईल, असे विधान केले आहे.

BMC Election 2026 Result : राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचा निकाल 16 जानेवारी रोजी जाहीर झाला. या निवडणुकीत बहुसंख्य महापालिकांत भाजपा हाच सर्वात मोठा पक्ष म्हणून नावारुपला आला. परंतु कल्याण डोंबिवली, मुंबई, उल्हासनगर यासह जळगाव अशा काही महापालिकांत महायुतीचा महापौर होण्याची शक्यता आहे. परंतु या सर्व महानगरपालिकांपैकी मुंबईच्या महापौरपदाची सगळीकडे चर्चा रंगली आहे. इथे कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने महापौरपदावर कोण विराजमान होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यातही शिंदे गटाकडून भाजपाला अडीच वर्षे महापौरपदाची मागणी केली जात असल्याचे सांगितले जात असल्यामुळे महापौरपदाच्या निवडीचा प्रश्न जास्तच अडचणीचा ठरल्याचे सांगितले जात आहे. परंतु आता भाजपाचे वरिष्ठ नेते तथा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोठे विधान केले आहे. त्यांनी केलेल्या विधानानंतर आता भाजपाच महापौर बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
देवेंद्र फडणवीस जो-जो प्लॅन तयार करतात, तो…
चंद्रकांत पाटील हे पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी येथे टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला. यावेळी चंद्रकांत पाटील यांना मुंबईच्या महापौरपदाविषयी विचारण्यात आले. तसेच कोणत्या पक्षाचा महापौर असेल, असे विचारताच देवेंद्र फडणवीस जो-जो प्लॅन तयार करतात, तो यशस्वी होतोच. त्यांचा कोणताही प्लॅन अयशस्वी होत नाही. मुळात महापौरपदाविषयी चर्चा का चालू आहे, हेच मला समजत नाही. कारण भाजपा हा सर्वात मोठा पक्ष असल्याचेही सरळ आणि स्पष्ट आहे, असे थेट विधान करत महापौर हा भाजपाचाच होऊ शकतो, असे संकेत दिले.
आपले संख्याबळ किती आहे, ते पाहायला पाहिजे
तसेच, भारतीय जनता पार्टीचा महापौर होणार की महायुतीचा होणार? हे देवेंद्र फडणवीस ठरवतील. परंतु तिसऱ्या व्यक्तीने आशा लावून बसण्यात काहीही अर्थ नाही, असे म्हणत त्यांनी ठाकरे गटाला टोला लगावला. प्रत्येकाने आपले संख्याबळ किती आहे, ते पाहायला पाहिजे. भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे महापौर हा भारतीय जनता पार्टीचा होईल, असे सांगत पुढे त्यांनी केंद्रीय नेतृत्व आणि देवेंद्र फडणवीस जे ठरवतील तोच महापौर होईल, असेही स्पष्ट केले आहे. त्यामुळे भविष्यात नेमके काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
