Sanjay Raut : आम्ही लढत होतो म्हणून तुम्ही मुंबईत राहू शकताय मि. फडणवीस – राऊतांनी सुनावलंच
मुख्यमंत्री फडणवीसांनी केलेल्या टीकेला संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. 'आम्ही लढलो म्हणूनच मुंबई महाराष्ट्रात टिकली,' असे राऊत म्हणाले. आम्ही 'डबल सर्टिफाईड मुंबईकर' म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिलं. हा राजकीय वाद चांगलाच पेटल्याचे दिसत आहे.

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नेत्यांच्या सभा, दौरे सुरू झाले असून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीकाही करताना दिसत आहे. मुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच मुलाखत झाली. तेव्हा त्यांनी विरोधक तसेच ठाकरे बंधूंवर टीका केली. “आज जे लोक मुंबईत जन्माला येऊन म्हातारे झाले, ते शहराचा विकास करू शकले नाहीत, ते आता काय विकास करणार?” अशा बोचऱ्या शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचा समाचार घेतला. त्यांच्या या टीकेला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सडेतोड शब्दांत उत्तर दिलं.
आम्ही मुंबईत जन्माला येऊन म्हातारे झालो, म्हणूनच मुंबई महाराष्ट्रात टिकली. आणि तुम्ही मुंबईत राहू शकताय. का राहताय ? आम्ही मुंबईत संघर्ष करून म्हातारे झालो, आमची एक आधीची पिढी शहीद झाली म्हणून तुम्हाला या मुंबईत बसून महाराष्ट्रावर राज्य करता येतंय मि. फडणवीस अशा शब्दांत संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना सुनावलं. तुम्ही तरूण आहात अजून, नागपूरचा काय विकास केलात मग ?लोकं तुम्हाला दारातून हाकलून देत आहेत, ते मी बघितलं आहे असंही राऊतांनी म्हटलं.
आम्ही डबल सर्टिफाईड मुंबईकर
“राज ठाकरेंनी मला मुंबईच्या बाहेरच ठरवल्यामुळे मी आता अधिकृतपणे ‘सर्टिफाईड नागपूरकर’ झालो आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले होते. त्यावरही संजय राऊत यांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं. ते नागपूरकर असतील तर चांगली गोष्ट आहे. नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे. तुम्ही ‘सर्टिफाईड नागपूरकर’ आहात, आम्हीसुद्धा ‘डबल सर्टिफाईड मुंबईकर’ आहोत असं त्यांनी सुनावलं. मि. फडणवीस आम्ही मुंबई ही लढून मिळवली आहे. जमिनीतून बटाटे, भुईमुगाच्या शेंगा येतात तसं हे आम्हाला आयतं मिळालेलं नाहीये. ही मुंबई लढून मिळवली. आणि जेव्हा आम्ही लढत होतो, तेव्हा फडणवीसांचा जन्मही झालेला नव्हता. यांना गब्बर सारखे डायलॉग मारायला काय झालं ? अशा शब्दांत राऊतांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीकास्त्र सोडलं.
ठाकऱ्यांशिवाय मुंबई म्हणजे महाराष्ट्र दुबळा..
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे युतीमधले लूझर आहेत, अशी टीकाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली होती. ” ते तुम्ही कशाला सांगायला पाहिजे? आता ( निवडणुकांमध्ये) पाहू ना कोण लूझर आहे आणि कोण विनर आहे ते… ते या मुंबईची जनता ठरवेल ना. आणि मुंबईतली जनता ही कायम ठाकऱ्यांच्याच मागे उभी राहिली आहे ते फडणवीसांनाही चांगलं माहीत आहे . ठाकऱ्यांशिवाय मुंबई म्हणजे महाराष्ट्र दुबळा आणि पांगळा.. हे लक्षात ठेवा ” असं राऊत म्हणाले.
