Dattatray Bharane : जमीन वाहून गेली, विहीर बुजली, पण तलाठी पंचनामाच करेना, शेतकऱ्यांनी वाचला तक्रारींचा पाढा, मग कृषीमंत्र्यांनी लावला फोन अन्…
Dattatray Bharane in Jalna : राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, जालना जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या बांधावर गेले. त्यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानीची पाहणी केली. त्यावर शेतकऱ्यांनी तक्रारींचा पाढा वाचला. त्यांनी यंत्रणांची लाज काढली. मग कृषीमंत्र्यांनी फोन काढला अन्...

पावसाने मराठवाडा, विदर्भासह राज्यात कहर केला. अनेक गावात आभाळ फाटलं आहे. शेती आणि शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. शेतात जणू तळंच तयार झालं आहे. आज राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यात बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. गेवराई गावात ते शेतावर गेले. तिथे त्यांनी पिकाच्या नुकसानीची पाहणी केली. त्यावेळी शेतकऱ्यांनी त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. त्यांनी तक्रारींचा पाढा वाचला. यावेळी शेतकऱ्यांनी यंत्रणांची लाज काढली. तलाठी आणि अधिकारी कशी त्यांची अडवणूक करत आहेत, याची तक्रार केली. शेतकऱ्यांच्या रोषाला त्यांना सामोरं जावं लागले. मग कृषीमंत्र्यांनी थेट अधिकाऱ्यांना फोन लावला.
अधिकाऱ्यांना घेतलं फैलावर
कृषीमंत्री बांधावर येताच शेतकऱ्यांनी त्यांच्यावर प्रश्नाचा भडिमार सुरू केला. गेल्या 15 दिवसांपासून पाणीच आहे. जनावरांना खायला नाही. पण प्रशासनानं दखल घेतलीच नाही असं म्हणणं तरुण शेतकऱ्यांनं मांडलं. तो त्रागा करताना दिसला. तर एका शेतकऱ्यानं तलाठी आणि अधिकारी हे पंचनामा करताना पक्षपाती भूमिका घेत असल्याची तक्रार केली. जमीन वाहून गेली. विहीर बुजली. पण अद्यापही पंचनामा झाले नसल्याची ओरड शेतकऱ्यांनी केली.
त्यानंतर मग कृषीमंत्री दत्तात्रय भरणे हे संतापले. त्यांनी लागलीच संबंधित अधिकाऱ्याला फोन लावला आणि चांगलेच फैलावर घेतले. ज्याचं नुकसान झालं, त्यांचं सगळं नुकसान नोंदवून घ्या. मी तुम्हाला मंत्री म्हणून सांगतो, असा दम त्यांनी दिला. शेतकऱ्याच्या एक गुंठ्याचा पंचनामा राहिला तर तुम्ही जबाबदार असाल असा इशारा त्यांनी अधिकाऱ्याला दिला. शेतकरी खूप अडचणीत आहे. तो वंचित राहणार नाही याची काळजी घ्या, असे त्यांनी बजावले.
साहेब 50 हजार मदत द्या
साहेब आम्हाला हेक्टरी 50 हजार मदत करा असा टाहो यावेळी शेतकऱ्यांनी फोडला. त्यांनी पावसामुळे त्यांच्यावर आलेली आपबित्ती सांगितली. तलाठ्यांनी अद्याप पंचनामे केले नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली. सर्वांचे पंचनामे झाले पाहिजेत, असे कृषीमंत्र्यांनी आदेश दिले. नुकसानीची पाहणी करण्यासाठीच आलो असल्याचे त्यांनी सांगितले. तुमच्या तालुक्यातील आणि गावातील एकाही गुंठ्याचा पंचनामा राहणार नाही, असं आश्वासन त्यांनी शेतकऱ्यांना दिलं. गुरंढोरं वाहून गेली असतील. घरांची पडझड झाली असेल त्यासाठी नुकसानभरपाई देण्याचं आश्वासन भरणे यांनी यावेळी दिले.
