कोल्हापुरात भयंकर घडतंय… चुटकी वाजवून भूत पळवतो… अघोरी पूजा; व्हायरल व्हिडीओने सर्वच हादरले
कोल्हापुरात एका भोंदू बाबाचे अघोरी पूजा आणि भूतबाधा उतरवण्याचे धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. पुरोगामी जिल्ह्यात अंधश्रद्धेचा हा प्रकार पाहून सर्वजण हादरले आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन कायदा असतानाही असे प्रकार घडत असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. चुटकी वाजवून भूत पळवणे, करणी करणे यांसारख्या दाव्यांवर तात्काळ कारवाईची मागणी होत आहे, ज्यामुळे या भोंदू बाबाला कायद्याचा चाप बसेल.
अंधश्रद्धेला पायबंद घालण्यासाठी महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आणलेला आहे. या कायद्याचा वचक बसून लोक अंधश्रद्धेपासून दूर जातील आणि अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांनाही चाप बसेल हा या मागचा हेतू आहे. पण राज्यात कुठे ना कुठे अंधश्रद्धेचे प्रकार होताना दिसत आहे. त्यावर तात्काळ कारवाईही केली जाते. पण प्रकार काही थांबताना दिसत नाहीत. कोल्हापूर हा तसा पुरोगामी जिल्हा. पण या जिल्ह्यातच अंधश्रद्धेचा अघोरी प्रकार उघड झाल्याने सर्वच हादरून गेले आहेत. एक भोंदूबाबा लोकांचे भूत उतरवण्यासाठी अघोरी प्रकार करतानाचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून या भोंदूबाबाच्या मुसक्या आवळण्याची मागणी होताना दिसत आहे. टीव्ही 9 मराठी या व्हिडीओची पुष्टी करत नाही .
या व्हायरल व्हिडीओमध्ये अनेक धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. चुटकी वाजवून भूतबाधा दूर करण्यापासून ते करणी करण्यापर्यंतचे प्रकार या कथित व्हायरल व्हिडीओत दिसत आहेत. हा कथित व्हायरल व्हिडीओ कोल्हापुरातील टिंबर मार्केटमधील असल्याचं सांगितलं जातं. मात्र, त्याची अद्याप पुष्टी झालेली नाही. परंतु, सोशल मीडियावर झपाट्याने हे व्हिडीओ व्हायरल होत असल्याने एकच खळबळ उडाली आहे. या भोंदू बाबा आणि मांत्रिकांचा कोल्हापूर जिल्ह्यावर वचक निर्माण झाल्याचंही सांगितलं जात आहे.
स्मशानभूमीत अघोरी पूजा
स्मशानभूमीत चुटकी वाजवून अघोरी पूजा करणे, भूत काढणे, करणी करणे यासह अनेक आघोरी प्रकार कोल्हापुरात होत असल्याचे उघड झाले आहे. लहान मुले, स्त्रिया आणि नागरिकांवर जादूटोणा आणि करणी केली जात असल्याचं सांगण्यात येतं. या व्हिडीओत एक मांत्रिक अघोरी पूजा करताना दिसत आहे. स्मशानाज जाऊन भूत काढताना दिसत आहे. तसेच करणी करतानाही दिसत आहे.
व्हिडीओत काय दिसलं
या भोंदूबाबाशी संबंधित कथित सहा व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओची पुष्टी अद्याप झालेली नाही. टीव्ही9 मराठीही त्याची पुष्टी करत नाही. मात्र, एका व्हिडीओत एक माणूस जमिनीवर बसलेला दिसत आहे. त्याच्यासमोर दिवा पेटलेला आहे. मांत्रिक त्याच्या बाजूला उभा आहे. तो चुटक्या वाजवतो. बसलेल्या व्यक्तीच्या कानात काही तरी सांगतो. नंतर त्याच्या कपाळावर हात ठेवतो. त्यानंतर त्याच्या कपाळाला डोकं लावताना दिसत आहे. तर दुसऱ्या व्हिडीओत नुसती मानवी कवटी दिसत आहे. तिसऱ्या व्हिडिओत मांत्रिक डोळे मिटून मंत्रातंत्राचा जप करताना दिसत आहे. चौथ्या आणि पाचव्या व्हिडीत एक महिला आणि एक तरुणी जमिनीवर झोपलेली आहे. त्यांच्या बाजूला दिवे पेटलेले आहेत. मागे देव्हारा आहे. आणि भोंदूबाबाच्या हातात चिमट्यासारखं काही तरी असून तो त्यांच्या पायाला, गुडघ्याला आणि अंगाला मारताना दिसत आहे. सहाव्या व्हिडीओत भोंदूबाबा हातात त्रिशूल घेऊन मंत्रजाप करताना दिसत आहे. हे सहा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून भोंदूबाबांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
भोंदूबाबाच्या विळख्यात लोकं
पुरोगामी जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी भोंदूगिरी आणि करणीचे प्रकार सुरू असल्याने खळबळ उडाली आहे. अनेक लोक मांत्रिक आणि भोंदू बाबाच्या जाळ्यात अडकले आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांमध्ये प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या फोटोंमध्ये खिळे मारून लिंबू कापून करणी करण्याच्या प्रकारात वाढ होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.