Manikrao Kokate : ‘इतका छोटा विषय’, ऑनलाइन रमीच्या आरोपांवर माणिकराव कोकाटेंच काय स्पष्टीकरण?
Manikrao Kokate : मागच्या दोन दिवसांपासून माणिकराव कोकाटे हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत आहे. ते राज्याचे कृषीमंत्री आहेत. राज्यात शेतकरी आत्महत्या करत असताना त्यांच्यावर सभागृहात बसून ऑनलाइन रमी खेळत असल्याचा आरोप झाला. त्या आरोपांवर आज माणिकराव कोकाटे यांनी स्पष्टीकरण दिलं.

राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर सभागृहात ऑनलाइन रमी खेळत असल्याचा आरोप झाला. शरद पवार गटाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी या संदर्भात टि्वट केलं होतं. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्यावर चहूबाजूंनी टीका झाली. आज माणिकराव कोकाटे यांनी पत्रकार परिषद घेऊन त्या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं. सर्वप्रथम माणिकराव कोकाटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने कृषी समृद्धी योजना लॉन्च केली. ही योजना काय आहे ते समजावून सांगितलं. कृषी क्षेत्रात गुंतवणूक वाढवणं हा योजनेचा मुख्य उद्देश असल्याच सांगितलं. “केंद्र सरकार रासायनिक खतासाठी एक लाख ९० हजार रुपये दरवर्षी सबसिडी देते. नैसर्गिक शेतीसाठी औषधे आणि बिबियाणांसाठी अनुदान देणार आहोत. सेंद्रीय शेतीत वाढ करण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी बोललो होतो. योजनेत त्रुटी आढळल्यास त्याचा आढावा घेऊन त्यात बदल करण्यात येईल” असं माणिकराव कोकाटे म्हणाले.
माणिकराव कोकाटे यांना ऑनलाइन रमी खेळण्यावरुन होत असलेल्या आरोपांबद्दल विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी उत्तर दिलं. “याबाबत मला एकच सांगायचं आहे की हा इतका छोटा विषय आहे. हा विषय लांबला का कळलं नाही. मी खुलासा केला आहे. ऑनलाइन नंबर काय माहीत आहे का? ऑनलाइन रमी खेळताना मोबाईल नंबर अटॅच पाहिजे. बँकेचं अकाऊंट अटॅच पाहिजे. अशा प्रकारचं कोणताही मोबाईल नंबर आणि अकाऊंट माझं अटॅच नाही. माझे बँकेचे अकाऊंट देणार आहे. कुठेही चौकशी करा. ऑनलाईन रमी सुरू झाल्यापासून आजपर्यंत एक रुपयाची रमी खेळलो नाही. मला रमी खेळता येत नाही. हा आरोप चुकीचा आणि बिनबुडाचा आहे. ज्या राजकीय नेत्यांनी आरोप केला आणि माझी बदनामी केली. त्यांना मी कोर्टात खेचणार आहे” असा इशाराच माणिकराव कोकाटे यांनी दिला.
पूर्ण व्हिडिओ का दाखवला नाही?
“माझी लक्ष्यवेधी होती तेव्हा. मला ओसडीकडून माहिती घेण्यासाठी एसएमएस करावा लागतो किंवा फोन करावा लागतो. मी मोबाईल उघडताच तो गेम आला. तो स्किप करता आला नाही. मोबाईल नवीन होता. स्किप करणारा व्हिडीओ समोर आला नाही. मोबाईल उघडल्यावर कोणताही गेम स्किप होत नाही. दहा पंधरा सेकंदाचा व्हिडिओ समोर आला. पूर्ण व्हिडिओ का दाखवला नाही?” असा सवाल माणिकराव कोकाटे यांनी विचारला.
…तर राजीनामा देईन
“महाराष्ट्राच्या लक्षात आलं असतं. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांना पत्र देणार आहे. चौकशी करण्याची मागणी करणार आहे. मी दोषी आढळलो तर नागपूरच्या अधिवेशनात मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना न भेटता राज्यपालांना राजीनामा देणार आहे” असं माणिकराव कोकाटे म्हणाले.
