Maharashtra News LIVE : विजय वडेट्टीवार यांची सरकारवर जोरदार टीका..
Maharashtra News LIVE : चौंडी येथे अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी होत असून मुख्यमंत्री फडणवीस यांनी पूजा केली. मुंबईत मान्सूनपूर्व पावसाने उकाड्यापासून दिलासा दिला असून पुण्यात विषारी दारू प्रकरणी २१ अधिकारी निलंबित झाले आहेत, तर मनोज जरांगे पाटलांनी उपोषण मागे घेतले आहे; वाचा सविस्तर अपडेट्स.

LIVE NEWS & UPDATES
-
ओबीसी समाजाच्या हातात घंटा देण्याचे काम केले- विजय वडेट्टीवार
बल ढोलकी सरकारने मराठा आणि ओबीसी समाजाच्या हातात घंटा देण्याचे काम केले. जरांगे पाटील उपोषणाला बसले सरकारने तोडगा काढला..यात ५८ लाख नोंदी सापडल्या त्यांना कुणबी प्रमाणपत्र देणार सांगितले. मुख्यमंत्री म्हणाले ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही एकीकडे मुख्यमंत्री ओबीसी बाजू मांडतात. विखे पाटील मराठा समाजाला सांगत आहे मराठा आणि ओबीसी समाजाला एकमेकांना विरोधात उभ करून सत्तेची खुर्ची मजबूत करायची आहे.
-
जालना जिल्ह्यात खळबळ, बदनापूर शहरावर विमानाने घातल्या ६ ते ७ घिरट्या, नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण
जालना जिल्ह्यातील बदनापूर शहरात गेल्या काही तासांपासून एका विमानाने आकाशात सतत घिरट्या घातल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये मोठे कुतूहल आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. बदनापूर ते जालना दरम्यानच्या परिसरात या विमानाने आतापर्यंत ६ ते ७ वेळा घिरट्या मारल्या असून, अद्यापही या घिरट्या सुरूच आहेत. हे विमान नेमके कुठले आहे आणि आकाशात घिरट्या मारण्यामागचे कारण काय आहे, याबाबत प्रशासनाकडून किंवा संबंधित विभागाकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर न आल्याने नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहेत.
-
-
नाशिकमध्ये MPSC संयुक्त पूर्व परीक्षा सुरू; ९ हजारहून अधिक उमेदवार देणार परीक्षा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) आयोजित ‘महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट अ आणि ब संयुक्त पूर्व परीक्षा’ आज नाशिक जिल्ह्यात अत्यंत शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडत आहे. या परीक्षेसाठी संपूर्ण नाशिक जिल्ह्यातून तब्बल ९ हजार ४३२ उमेदवारांची नोंदणी झाली असून, शहरातील २४ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेतली जात आहे. परीक्षा काळात कोणताही गैरप्रकार घडू नये आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने परीक्षेपूर्वीच योग्य ती खबरदारी घेतली असून, सर्वच केंद्रांवर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
-
मुंबईत पावसाची दमदार एन्ट्री, विक्रोळी ते कुर्ल्यासह उपनगरांमध्ये जोरदार सरी
गेल्या काही दिवसांपासून असह्य उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना अखेर मोठा दिलासा मिळाला असून, मुंबईत पावसाची दमदार एन्ट्री झाली आहे. विक्रोळी, कुर्ला या भागांसह मुंबईच्या विविध उपनगरांमध्ये आज मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. या पहिल्याच मोठ्या पावसामुळे मुंबईतील वातावरणात झटपट गारवा निर्माण झाला असून, नागरिकांना उष्णतेच्या त्रासातून मोठी सुटका मिळाली आहे. पावसाच्या या धमाकेदार सुरुवातीमुळे मुंबईकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
-
जळगावात संताप! डांबरीकरणानंतर अवघ्या १२ तासांतच उखडला रस्ता; नागरिकांनी हाताने काढले डांबर
जळगावमधील पिंप्राळा बजरंग बोगदा ते भोईटे नगर दरम्यान लाखो रुपये खर्च करून केलेल्या मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणाचे पितळ अवघ्या १२ तासांच्या आत उघडे पडले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून मक्तेदाराने थेट मातीवरच डांबर आणि खडी पसरवून काम उरकल्यामुळे हा नवीन रस्ता जागोजागी उखडला असून, स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी थेट हाताने रस्त्याचे डांबर आणि खडी उखडून दाखवत तीव्र संताप व्यक्त केला आहे. या निकृष्ट दर्जाच्या कामाविरोधात सामाजिक कार्यकर्ते दीपक गुप्ता यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे रीतसर तक्रार दाखल केली असून, संबंधित निष्काळजी अधिकारी आणि ठेकेदारावर तात्काळ कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
-
-
चौंडीत अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीचा उत्साह; मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महापूजा
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त त्यांचे जन्मस्थान असलेल्या अहिल्यानगरमधील चौंडी येथे आज विविध भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण आहे. या खास दिनाचे औचित्य साधून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अहिल्याश्वर मंदिरात शासकीय महापूजा संपन्न होणार आहे. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, विधानपरिषद सभापती राम शिंदे, तसेच मंत्री शिवेंद्रराजे भोसले, पंकजा मुंडे, जयकुमार रावळ आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अहिल्यादेवींना अभिवादन करण्यासाठी केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर देशभरातून मोठ्या संख्येने भाविक आणि नागरिक चौंडीत दाखल होत आहेत.
-
नाशिकमध्ये ठाकरे गटाची नवी कार्यकारणी जाहीर; डी. जी. सूर्यवंशी व प्रथमेश गीतेंवर पुन्हा विश्वास
आगामी काळातील संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा पाऊल टाकत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची नाशिक जिल्ह्याची नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार नाशिक जिल्हा मध्यवर्ती कार्यालयातून ही अधिकृत घोषणा करण्यात आली असून, जिल्हाप्रमुख पदाची धुरा पुन्हा एकदा डी. जी. सूर्यवंशी यांच्याकडे तर महानगरप्रमुख पदाची जबाबदारी प्रथमेश गीते यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. या महत्त्वाच्या नियुक्त्यांनंतर पुढील रणनीती आखण्यासाठी आणि संघटना मजबूत करण्यासाठी येत्या सोमवारी उपनेते रवींद्र मिर्लेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.
-
-
पुणेकरांना दिलासा, जूनच्या सुरुवातीला मेघगर्जनेसह पावसाची शक्यता
मे महिन्याच्या अखेरीस पुणे शहरासह परिसरात उन्हाचा चटका काहीसा कमी झाला असून, जून महिन्याच्या सुरुवातीला पुणेकरांना पावसाचा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार, जूनच्या प्रारंभी पुण्यात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाच्या पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. दरम्यान, नैऋत्य मोसमी पाऊस (मॉन्सून) अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात वेगाने पुढे सरकत असून, पुढील चार ते पाच दिवसांत तो केरळ आणि तामिळनाडूच्या काही भागांत दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे.
-
श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर १५ जूनपासून होणार खुले; अशी असेल दर्शनाची वेळ
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विकासकामांच्या पार्श्वभूमीवर गेली पाच महिने बंद असलेले बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र, श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर अखेर येत्या १५ जूनपासून भाविकांसाठी खुले होणार आहे. मंदिर प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, भाविकांना आता दररोज सकाळी ७ ते ११ या वेळेत दर्शनाचा लाभ घेता येणार असून, ऑनलाइन नोंदणीद्वारे रोज केवळ १,००० भाविकांनाच प्रवेश दिला जाईल, अशी माहिती प्रभारी जिल्हाधिकारी गजानन पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे भीमाशंकरच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना आता आधीच ऑनलाइन बुकिंग करणे अनिवार्य असणार आहे.
-
नसरापूर चिमुरडी अत्याचार आणि खून प्रकरणी विशेष न्यायालयात आणखी दोघांची महत्त्वपूर्ण साक्ष
नसरापूर परिसरात साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिचा निर्घृण खून केल्याच्या धक्कादायक खटल्याची सुनावणी विशेष न्यायालयात वेगाने सुरू असून, नुकतीच या प्रकरणातील आणखी दोन महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. आरोपीचा शोध घेणारे आणि घटनास्थळाशी संबंधित महत्त्वाचे पुरावे समोर आणणाऱ्या या साक्षीदारांचा जबाब न्यायालयाने नोंदवून घेतला असून, सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील एडव्होकेट अजय मिसर कामकाज पाहत आहेत. या खटल्यात सरकार पक्षाने एकूण ८२ साक्षीदारांची यादी सादर केली असून, पुरावा नष्ट केल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध अतिरिक्त कलम लागू करण्यासाठी न्यायालयात अर्जही दाखल करण्यात आला आहे.
-
पुणे विषारी दारू प्रकरण: मुख्यमंत्री फडणवीसांच्या निर्देशानंतर २१ अधिकारी व कर्मचारी निलंबित
पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी दारू प्यायल्यामुळे झालेल्या जीवितहानीची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार या प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली असून, कर्तव्यात कमालीचा निष्काळजीपणा आणि पर्यवेक्षणाचा अभाव दाखवल्याचा ठपका ठेवत पोलीस तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागातील एकूण २१ अधिकारी व कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.
अहिल्यानगरमधील चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अहिल्याश्वर मंदिरात महापूजा संपन्न होणार आहे. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक प्रमुख मंत्री व राज्यभरातून भाविक उपस्थित आहेत. तर दुसरीकडे, मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत आज सकाळपासूनच मान्सूनपूर्व पावसाच्या रिमझिम सरी कोसळल्याने मुंबईकरांना असह्य उकाड्यापासून अंशतः दिलासा मिळाला आहे, तर मंगळवारसाठी मुंबईत पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मात्र, जळगाव आणि गोंदियात या वादळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. तसेच पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील विषारी दारू प्रकरणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार मोठी कारवाई करण्यात आली आहे. कर्तव्यात निष्काळजीपणा दाखवल्याबद्दल पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या २१ अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांची मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांनी रात्री उशिरा भेट घेतली. सरकारने सर्व मागण्या मान्य केल्यानंतर जरांगे पाटलांनी अखेर आपले उपोषण मागे घेतले आहे. यासह राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी आणि अपडेट इथं वाचा.
Published On - May 31,2026 8:59 AM
