Maharashtra News LIVE : शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप
Maharashtra News LIVE Updates : भोंदू बाबा अशोक खरातच्या मुलीची आज एसआयटी चौकशी होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. खरातची मुलगी तृप्तबालाची आज SIT चौकशी होणार आहे. तृप्ताबालाच्या नावावर अशोक खरातने कोट्यवधी रुपयांच्या जमिनी आणि स्थावर मालमत्ता खरेदी केल्याचं तपासात समोर आलं होतं.

LIVE NEWS & UPDATES
-
भोंदू अशोक खरात याच्या नाशिक कार्यालयात पुन्हा एसआयटीचे पथक
नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरातील भोंदू अशोक खरात याच्या कार्यालयात पुन्हा एसआयटीचे पथक दाखल झाले आहे. एसआयटीच्या पथकाने पुन्हा एकदा तपासणी सुरू केली आहे. उद्या भोंदू अशोक खरात याची पोलीस कोठडी संपणार असून त्याला कोर्टात हजर केले जाणार आहे.
-
शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप
भडगाव शेतकी संघात शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप होत आहे. या घटनेत ३ ते ४ शेतकरी जखमी झाले असून जखमींवर जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ज्वारीची नोंदणी करण्यासाठी गेलो होतो, चोरी करण्यासाठी नव्हे असे जखमी शेतकरी संजय पाटील यांनी म्हटले आहे.
-
-
ठाण्यातआंतरजातीय विवाहाने जैन कुटुंबावर बहिष्कार
ठाण्यात आंतरजातीय विवाहामुळे जैन कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे या कुटुंबाला न्यायासाठी धावपळ करावी लागत आहे. त्यामुळे पोलीसांच्या कारवाईवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
-
खरात प्रकरणात आम्ही ईडीला पूर्ण सहकार्य करू – तेजस्वी सातपुते
खरातप्रकरणाची ईडीने दखल घेतली आहे. आमच्याकडून जी माहिती मागितली ती ईडीला देण्यात आली आहे. आम्ही ईडीला पूर्ण सहकार्य करू असे असे एसआयटीच्या प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी म्हटले आहे.
-
नाशिकच्या चांदवडमध्ये पाणीटंचाईने संतप्त ग्रामस्थांनी उद्रेक
नाशिकच्या चांदवडमध्ये पाणीटंचाईने संतप्त ग्रामस्थांनी उद्रेक केलाय…. गणूर ग्रामपंचायतीला ताळे ठोकत आपला रोष व्यक्त केलाय… तीन महिन्यांपासून पाणीपुरवठा ठप्प आहे… हंडा मोर्चा काढत नागरिकांनी आंदोलन केलय…
-
-
माटुंगा रेल्वे कारशेडमधील रेल्वेच्या डब्याला आग
माटुंगा रेल्वे कारशेडमधील रेल्वेच्या डब्याला आग. ही घटना मटुंगा रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या मध्य रेल्वेच्या कोच रिपेअर वर्कशॉपमध्ये घडली, जिथे रेल्वेच्या डब्यांची दुरुस्ती आणि देखभालीचे काम केले जाते. अनेक अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत.
-
सिईटी परीक्षेचे वेळापत्रक बदलले…
राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे 2026- 27 शैक्षणिक वर्षासाठी होणाऱ्या एम एच टी सीईटी ( पीसीएम गट) परीक्षेच्या वेळापत्रक बदल केला आहे 12 एप्रिल रोजी होणाऱ्या अन्य राष्ट्रीय स्पर्धा परीक्षांमुळे हा दिवस वगळण्यात आला असून आता ही परीक्षा 11 ते 20 एप्रिल दरम्यान पार पडेल या परीक्षेसाठी चार लाख 69 हजार 332 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
-
-
मुंबई सेंट्रलवर 60 दिवसांचा ब्लॉक
मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 5च्या कामासाठी 60 दिवसांचा मेगाब्लॉक जाहीर… हा ब्लॉक तात्काळ लागू झाल्याने लांब पल्ल्याच्या गाड्या दादरपर्यंतच धावतील…. पुढील 2 महिने रेल्वेच्या वेळापत्रकात बदल राहणार.. प्रवाशांची मोठी गैरसोय होणार..
-
मुंबईतील नगरसेवकांना 800 कोटींचा निधी
मुंबईतील नगरसेवकांना 800 कोटींचा निधी… ८०० कोटींच्या विकास निधीस स्थायी समितीची मंजुरी… तर विरोधी पक्षातील नगरसेवकांच्या निधीचा वाटा अद्याप गुलदस्त्यात…
-
जाळलेल्या इंधन ऑईलवर चालणारी शेगडी
एका वेल्डिंग धारकाचा नवीन प्रयोग समोर आला आहे. जाळलेला इंधन ऑइल किंवा डिझेलमध्ये स्वयंपाक करण्यासाठी नवीन शेगडी तयार केली आहे. एलपीजी सिलेंडरच्या कमतरतेमुळे प्रत्येक हॉटेलमध्ये या शेगडीवर जेवण तयार करीत आहेत. कमी खर्चात जास्त लोकांचे जेवण तयार करणाऱ्या या ऑइल इंधनवर चालणाऱ्या शेगडीची विशेष चर्चा रंगली आहे.
-
अशोक खरातचा पाय खोलात, आणखी एक गुन्हा दाखल
भोंदू अशोक खरात विरोधात आणखी काही फसवणूक झालेले तक्रारदार समोर आल्याची माहिती मिळली आहे. जमीन खरेदी विक्री सह इतर आर्थिक फसवणूक करणाऱ्यांची एसआयटी कडून चौकशी सुरू आहे. आर्थिक फसवणुकी संदर्भात अशोक खरातवर आणखीन गुन्हे दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
-
जळगावात गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे कोळशाच्या मागणीत वाढ
जळगावात गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे कोळशाच्या मागणीत आणि विक्रीत मोठी वाढ. युद्धामुळे व्यवसायिक आणि घरगुती गॅस सिलेंडर पुरवठा विस्कळीत झाल्याने कोळशाची मागणी वाढली.. दगडी कोळसा, लाकडापासून बनलेला कोळसा याबरोबरच इतर दोन प्रकारचा कोळसा जळगावात विक्री होतो. गॅसच्या तुटवड्यामुळे 30 वर्षांत पहिल्यांदाच कोळशाची मोठी मागणी वाढल्याची विक्रेत्यांची माहिती..
-
गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे कोळशाच्या मागणीत वाढ
जळगावात गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे कोळशाच्या मागणीत आणि विक्रीत मोठी वाढ झाली आहे. युद्धामुळे व्यवसायिक आणि घरगुती गॅस सिलेंडर पुरवठा विस्कळीत झाल्याने कोळशाची मागणी वाढली आहे. दगडी कोळसा, लाकडापासून बनलेला कोळसा याबरोबरच इतर दोन प्रकारचा कोळसा जळगावात विक्री होतो. गॅसच्या तुटवड्यामुळे 30 वर्षांत पहिल्यांदाच कोळशाची मोठी मागणी वाढल्याची विक्रेत्यांची माहिती.
-
लातूर : कांदा आणि बटाट्याची विक्रमी आवक, भाव घसरले
लातूरच्या अडत बाजारात कांदा आणि बटाट्याची विक्रमी आवक झाली आहे, त्यामुळे कांदा आणि बटाट्याचे भाव घसरले आहेत. कांद्याला दोन रुपया पासून पाच ते दहा रुपये प्रति किलो भाव मिळत आहे. विशेष म्हणजे आज कांद्याचा सौदाच झाला नाही. कांद्याचे भाव कोसळल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.
-
जालना : पुरवठा विभागाने 273 ठिकाणी धाडी टाकल्या
व्यावसायिक गॅसचा पुरवठा बंद झाल्यापासून जालना जिल्ह्यात जिल्हा पुरवठा विभागाकडून पथकाची स्थापना करण्यात आली असून त्या माध्यमातून विविध ठिकाणी धाडी टाकून कारवाईची मोहीम सुरू आहे. जालना जिल्ह्यात पुरवठा विभागाकडून आतापर्यंत 273 ठिकाणी धाडी टाकण्यात आले असून त्या माध्यमातून 91 घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले आहे. हॉटेल व्यावसायिक, छोट्या मोठ्या आस्थापना यांची अचानक पणे तपासणी करण्यात येत असून त्यांच्या विरोधात कारवाईचा बडगा पुरवठा विभागाने सुरू केला आहे. दरम्यान प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीतून आतापर्यंत एकावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
-
सांगली – भाजपाकडून राजकीय द्वेषापोटी कृषी उत्पन्न बाजार समितीचे त्रिभाजन
भाजपाकडुन केवळ राजकीय द्वेषापोटी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे त्रिभाजन करण्यात आल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात आला आहे. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बरखास्त संचालकांकडून बाजार समिती विभाजनाचा निषेध नोंदवत, केवळ महाविकास आघाडीची सत्ता सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीवर असल्याने भाजपाने ही कारवाई केली आहे, या विरोधात उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल असून याप्रकरणी दाद मागणार असल्याचे संचालकांनी म्हटले आहे.
-
मुंबई : कांदिवलीच्या गणेश नगरमध्ये डंपरखाली चिरडून एका मुलाचा मृत्यू
आज दुपारी कांदिवली पश्चिम येथील गणेश नगरमध्ये भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरखाली चिरडून एका मुलाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरातील रहिवासी संतप्त झाले आहेत. या परिसरात बेकायदेशीर पार्किंग असून कोणीही सिग्नलचे पालन करत नाही, त्यामुळे एका निष्पाप मुलाला आपला जीव गमवावा लागला आहे, अशी लोकांची तक्रार आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
-
ठाणे-बोरिवली दुहेरी भुयारी बोगदा प्रकल्पाचा आज शुभारंभ
ठाणे-बोरिवली दुहेरी भुयारी बोगदा प्रकल्पाचा आज शुभारंभ होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते टनेल प्रकल्पाचा श्रीगणेशा करतील. १५ मिनिटांत ठाणे ते बोरिवली महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा आज शुभारंभ होईल. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दाखल झाले आहेत. टिबीएमच्या द्वारे आज नायक आणि अर्जुना या मशीनद्वारे शुभारंभ होणार आहे. पुढील दोन वर्षात या बोगदा काम पूर्ण होणार असून ठाणेकर आणि बोरिवली याना दिलासा मिळणार आहे.
-
रासायनिक खतांचे दर 100 ते 300 रुपयांनी वाढले
आखाती देशातील युद्धांचा फटका आता कृषी क्षेत्रालाही बसला आहे. रासायनिक खतांचे दर 100 ते 300 रुपयांनी वाढले. जागतिक युद्धाचा परिणाम उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. खत बनवण्यासाठी लागणारा कच्चामाल मिळत नसल्याने रसायनिक खताची आवकही थांबली आहे. आगामी काळात शेतकऱ्यांचा खरीप हंगाम खताविना संकटात जाण्याची शक्यता आहे. 1500 रुपये किमतीचा खताचं पोतं 1800 रुपयांवर पोहचले.
-
गॅस एजन्सीबाहेर मोठी गर्दी
चाळीसगावमधील प्रियंका गॅस एजन्सीच्या बाहेर भारत कंपनीचे एलपीजी सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांची लांबच लांब रांग लागली आहे. भर उन्हामध्ये ज्येष्ठ नागरिकांसह महिला आणि कामगार वर्ग मोठ्या संख्येने उभा असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गॅस बुकिंग करून महिना उलटूनही सिलेंडर मिळत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. सिलेंडरसाठी वारंवार एजन्सीच्या फेऱ्या माराव्या लागत असल्याने रोजगारावरही परिणाम होत असल्याचे नागरिक सांगत आहेत. चार ते पाच तास उन्हामध्ये उभे राहावे लागत असल्याने नागरिकांचा संयम सुटला असून एजन्सीच्या कारभाराविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
-
अपघातात बहिण-भावाचा जागीच मृत्यू
परभणी जिंतूर महामार्गावरील झरी शिवारात कार आणि मोटरसायकलची समोरासमोर धडक झाली. अपघातात बहिण-भावाचा जागीच मृत्यू झाला. मयतांना परभणीच्या शासकीय रुग्णालयात हलवलं. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी केली. कार चालक घटना स्थळावरून पसार झाला.
-
खरात प्रकरणात पुढारी असेल तर तो सुटता कामा नये
खरात प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, कुणी पुढारी असेल तर तो सुटता कामा नये. अत्यंत शांततेत हा तपास झाला पाहिजे, अशी मागणी मंत्री संजय शिरसाट यांनी केली. सगळ्या चौकश्या व्हाव्यात, अंजली दमानियांना मागणी क्ली निश्चित करा ही आमची भूमिका, राजकिय दबाव टाकून प्रकरण दाबता कामा नये या मताचे आम्ही आहोत. खरात प्रकरण राहीलं एकीकडे ह्या दोघीच भांडत बसल्यायत, खरात प्रकरण गंभीर आहे, सगळ्यांची चौकशी करा. आत्ता हजार नावं समोर येतील, मुळ गुन्हेगाराला शिक्षा व्हायला पाहिजे. रामरहीम पाहा, त्याच्या संपर्कात हजारो लोक होते, पण जेलमध्ये तो गेला, जो कटात सामिल असेल त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे. मुख्यमंत्री यांचे काही अधिकार आहे, त्यामुळे सत्य मुख्यमंत्री समोर आणतील. खरात प्रकरणात मोठे अधिकारी सामिल होते अशी आमच्याकडे अनआॅफिशियल माहिती चौकोनी होतेय हळू हळू सगळे चेहरे उघड होतील, असे शिरसाट म्हणाले.
-
मेट्रो ९ च्या दुसर्या टप्प्याचं काम लवकरच-मुख्यमंत्री
मेट्रो ९ च्या दुसर्या टप्प्याचं काम लवकरच पूर्ण होईल. या मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याचं उद्धघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मिरा भाईंदरपासून ते कुलाब्यापर्यंतही मेट्रोची जोडणी होणार असल्याचे ते म्हणाले. तर याचवर्षी दुसऱ्या टप्प्याचं काम लवकरच उद्धघाटन होईल असे ते म्हणाले.
-
राज्यातील पहिल्या महिला अधिकाऱ्यांचा बॅनरवर गौरव
मुंबईच्या मंत्रालय परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महिला सक्षमीकरणाच्या उपक्रमांचा प्रचार प्रसाराचे बॅनर्स चर्चेचा विषय ठरला आहे. राज्यातील पहिल्या महिला अधिकाऱ्यांचा बॅनरवर गौरव करण्यात आला. मुंबईत महिला सक्षमीकरणाच्या विविध उपक्रमांचा प्रसार करण्यासाठी भाजप नेत्यांच्या वतीने विशेष जनजागृती मोहीम सुरू आहे. या बॅनरवर “चर्चा नाही, प्रत्यक्षात कृती; देवाभाऊंच्या नेतृत्वात महिला सक्षमीकरणाला खऱ्या अर्थाने गती” असा संदेश देण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांमध्ये प्रथमच महत्त्वाची पदे भूषविणाऱ्या महिला अधिकाऱ्यांची छायाचित्रे प्रदर्शित करून त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली आहे.
-
दहिसर ते काशीगाव मेट्रो स्टेशनचा पहिला टप्पा सुरू
आजपासून दोन नव्या मेट्रो मार्गिका मुंबईकरांच्या सेवेत दाखल. दहिसर ते काशीगाव मेट्रो स्टेशनचा पहिला टप्पा सुरू. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मेट्रोचं लोकार्पण पार पडलं.
-
इगतपुरी – बोरटेंभा फाटा ते इगतपुरी पंचायत समिती पर्यंत श्रमजीवी संघटनेचा हंडा व बिऱ्हाड मोर्चा
इगतपुरी – बोरटेंभा फाटा ते इगतपुरी पंचायत समिती पर्यंत श्रमजीवी संघटनेचा पाणीप्रश्न, घरकुल, गावठाण विस्तार, घराखालील जागा या मागणीसंदर्भात हंडा व बिऱ्हाड मोर्चा सुरू आहे. मोर्चात लहान मुलं, महिला डोक्यावर हंडा घेऊन सहभागी झाल्या आहेत . थोड्याच वेळात बिऱ्हाड मोर्चा धडकणार पंचायत समिती आवारात पोहोचेल. पंचायत समिती आवारात बिऱ्हाड घेऊन ठिय्या मांडणार आहेत.
-
नाशिकमधील वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित लवादाकडून स्थगिती
नाशिकमधील वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित लवादाकडून स्थगिती , शहरातील सर्वच भागातील वृक्षतोडीला २८ एप्रिलपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. आज राष्ट्रीय हरित लवादासमोर झालेल्या सुनावणीत निर्णय देण्यात आला.
तपोवनासह शहरातील सर्वच भागातील वृक्षतोडीविरोधात पर्यावरण प्रेमींनी दाखल याचिका केली होती, याचिकेवरील सुनावणी दरम्यान २८ एप्रिलपर्यंत महापालिका प्रशासनाला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश देण्यात आले असून तेव्हाच पुढील सुनावणी होणार आहे.
-
बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 22 एप्रिल रोजी.
बीड – संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 22 एप्रिल रोजी होणार आहे. सरकारी पक्षाकडून पेन ड्राईव्ह मध्ये दिल्या गेलेल्या फाइल्स ओपन होत नसल्याचा दावा आरोपींच्या वकिलांनी केला आहे. संबंधित बाबींची पूर्तता करण्याची न्यायालयाने सरकारी पक्षाला सूचना दिली आहे. आजही खून, खंडणी आणि ॲट्रॉसिटी या मुळ सुनावणीला सुरूवात नाही.
-
जालना : अवकाळी आणि गारपीटमुळे 1 हजार 427 हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका..
जालना जिल्ह्यामध्ये 19 मार्चला अवकाळी पाऊस आणि गारपीटने 1हजार 427 हेक्टरवर नुकसान झाले असल्याची माहिती अपर जिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांनी दिलीय. जिल्ह्यातील जालना बदनापूर, मंठा, घनसावंगी आणि भोकरदन या पाच तालुक्यात अवकाळी पाऊस झाला असून, त्यापैकी 4 तालुक्यांचे अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले असून, जवळपास 2 हजार 628 शेतकऱ्यांचे 1427 हेक्टर एवढ्या क्षेत्रावरती नुकसान झालेला असून नुकसानीपोटी साधारणपणे दोन कोटी चाळीस लाख रुपये निधीची मागणी आम्ही शासनाकडे करणार असल्याचं अपर जिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांनी म्हटलं आहे.
-
दिंडोरीतील विहीर अपघात प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी समिती केली नियुक्त
दिंडोरीतील विहीर अपघात प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी समिती नियुक्त केली आहे. सात दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश समितीलादिलेत . अपघातात दरगोडे कुटूंबातील 6 शालेय विद्यार्थासह 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. संबंधित ठिकाणची परिस्थिती, कामाची पद्धत, सुरक्षा उपाययोजना तसेच प्रशासनिक जबाबदाऱ्या यांचा तपशीलवार आढावा घेऊन अहवाल सादर करण्याचे समितीला निर्देश देण्यात आलेत.
-
छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्रीत हवेत गोळीबार करत दहशत
छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्रीत हवेत गोळीबार करत दहशत पसरवण्याचा काहींनी प्रयत्न केला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून पोलिसांची चौकशी सुरू आहे.
-
शासनाच्या वतीने मका, ज्वारी खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू..
धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ऑनलाईन पद्धतीने शेतकरी आपल्या ज्वारी मक्याची नोंदणी करत आहेत. ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची गर्दी जमली आहे. ऑनलाइन नोंदणी करताना ज्वारीची एका हेक्टरला फक्त 12 क्विंटल खरेदी होत आहे. गेल्या वेळी तब्बल 16 क्विंटल खरेदी एका उताऱ्यासाठी होती यंदा मात्र ती घटवून फक्त 12 क्विंटल केल्याने शेतकऱ्यांची नाराजी दिसून येत आहे. किमान एका हेक्टरी 35 ते 40 क्विंटल ज्वारी मका खरेदी करावा अशई शेतकऱ्यांची मागणी आहे.
-
अशोक खरात प्रकरणी एका IAS अधिकाऱ्यापाठोपाठ दोन वरिष्ठ पोलीस अधिकारी गोत्यात सापडण्याची शक्यता
अशोक खरात प्रकरणी एका IAS अधिकाऱ्यापाठोपाठ दोन वरिष्ठ पोलीस अधिकारी गोत्यात सापडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दोन महिला पोलीस अधिकारी खरातच्या संपर्कात होत्या अशी सूत्रांची माहिती आहे. एक डिसीपी तर दुसऱ्या एसीपी दर्जाच्या अधिकारी असल्याची माहिती समोर येत आहे. आवडती पोस्टिंग मिळावी म्हणून त्यांनी बाबाकडे धाव घेतली होती का? खरात सोबत काही आर्थिक व्यवहारही झाले का ? याबाबत तपास होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
-
मुंबई-विजयदुर्ग रो-रो बोटीच्या इंजिनमध्ये बिघाड; सागरी प्रवास अनिश्चित काळासाठी स्थगित
कोकण किनारपट्टीवरील प्रवाशांना जलद प्रवासाचा पर्याय देणारी मुंबई ते विजयदुर्ग सागरी रो-रो सेवा सुरू झाल्यानंतर अवघ्या २५ दिवसांतच बंद पडली आहे. १ मार्च रोजी मोठ्या उत्साहात सुरू झालेली ही सेवा आता तांत्रिक बिघाडामुळे अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. बोटीच्या इंजिनमध्ये गंभीर बिघाड झाल्याने ही सेवा पूर्ववत होण्यासाठी किमान एक महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. सहा तासांत मुंबई गाठण्याचे स्वप्न पाहणाऱ्या प्रवाशांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, महागडे तिकीट दर आणि बोटीवरील सोयी-सुविधांचा सुमार दर्जा यामुळे प्रवाशांनी आधीच या सेवेकडे पाठ फिरवली होती, त्यातच आता तांत्रिक अडचणींमुळे ही सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे.
-
बीड: मस्साजोग सरपंच पदासाठी पोटनिवडणूक जाहीर; आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात
बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मृत्यूनंतर रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी आता पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीची अधिकृत प्रक्रिया आजपासून सुरू झाली असून १३ एप्रिलपर्यंत इच्छुकांना आपले उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. निवडणूक कार्यक्रमानुसार २८ एप्रिल रोजी मतदान पार पडेल, तर २९ एप्रिलला निकाल जाहीर केला जाईल. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षा धनंजय देशमुख यांनी व्यक्त केली आहे. गावातील राजकीय वातावरण पाहता ही निवड बिनविरोध होणार की चुरशीची लढत पाहायला मिळणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
-
पुण्याच्या राहीजा गार्डन्स पुलाजवळ भीषण अपघात; टँकरने महिलेला चिरडले
पुण्यातील पुणे कॅन्टोन्मेंट परिसरातील राहीजा गार्डन्स पुलाजवळ एका भीषण अपघातात महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने आलेल्या एका टँकरने महिलेला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, संबंधित महिलेचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वानवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत टँकर चालकाला ताब्यात घेतले आहे. सध्या मृत महिलेची ओळख पटवण्याचे काम सुरू असून, वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
-
छत्रपती संभाजीनगरमधील शेंद्रा येथे मांगीरबाबा यात्रेचा उत्साह; लाखो भाविकांची गर्दी कायम
छत्रपती संभाजीनगर जवळील शेंद्रा येथील प्रसिद्ध मांगीरबाबा यात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. आज तिसऱ्या दिवशी लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर कर्नाटक आणि मध्यप्रदेशातूनही हजारो भाविक या ठिकाणी दाखल झाल्याने शेंद्रा परिसर भक्तीमय झाला आहे. पहाटेपासूनच मंदिर परिसरात लांबच लांब रांगा लागल्या असून, भाविकांकडून पारंपरिक पद्धतीने रेवड्या फेकून आणि बोकड-कोंबड्यांचा बळी देऊन नवस फेडले जात आहेत. धार्मिक श्रद्धा आणि अलोट गर्दीमुळे या यात्रेने यंदाही आपला मोठा लौकिक राखला आहे.
-
मुंबईत राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक; राज्यातील पाणी टंचाईवर आणि अवकाळीच्या नुकसानीवर होणार चर्चा
मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्रिमंडळातील प्रमुख नेते उपस्थित आहेत. या बैठकीत प्रामुख्याने राज्यातील गंभीर होत चाललेली पाणी टंचाई, जनावरांसाठीच्या चारा छावण्यांचे नियोजन आणि अलीकडेच झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत सविस्तर चर्चा होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
-
क्रिकेट सामन्यात डीजेच्या आवाज महागात पडला, मधमाशांच्या हल्ल्यात एका वृद्धाचा मृत्यू
चंद्रपूर शहराजवळील दुर्गापूर ग्रामपंचायत हद्दीत एका क्रिकेट सामन्यादरम्यान धक्कादायक घटना घडली आहे. मैदानावर लावलेल्या डीजेच्या मोठ्या आवाजामुळे झाडावरील मधमाशांचे मोहोळ उठले आणि त्यांनी उपस्थित नागरिकांवर भीषण हल्ला चढवला. या हल्ल्यात मधुकर रंगारी या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून, अन्य २ जण जखमी झाले आहेत. काल संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली असून, प्राथमिक माहितीनुसार डीजेच्या कंपनांमुळेच मधमाशा खवळल्याने हा अनर्थ ओढवला.
-
शरद पवारांनी कौटुंबिक कारणाने उमेदवार दिला नाही – संजय राऊत
मी शरद पवारांच्या विचाराशी सहमत आहे. आम्ही भाजपला घाबरत नाही. शरद पवारांनी कौटुंबिक कारणाने उमेदवार दिला नाही. अजित दादांनी देखील पिंपरी चिंचवडची निवडणूक लढवली होती. लोकशाहीत कुणी निवडणूक लढत नसेल, तर दबाव का आणायचा? असा सवाल संजय राऊत यांनी केला.
-
तीन हजार पोलीस जवानांचे ऑपरेशन, माओवादी संघटनेच्या..
माओवादी संघटनेत एकमेव उरलेला_शेवटच्या नेता कमांडरला ठार मारण्यासाठी झारखंड राज्यात ३ हजार पोलीस जवानांच्या ऑपरेशन. माओवादी संघटनेत आता दोन मोठे नेते उरलेले आहेत_ केंद्रीय समितीच्या सदस्य असलेला गणपती हा देश सोडून विदेशात फरार झाल्याची गुप्त माहिती आहे. दुसरा नेता माओवादी संघटनेच्या कमांडर मिशीर बेसरा आपल्या ४० ते ५० शस्त्रांचा साथीदारासोबत झारखंडच्या जंगलातील सारंडा या भागात असल्याची खात्रीशीर माहिती आहे. या माहितीच्या आधारे झारखंड राज्यात मोठ्या प्रमाणात या माओवाद्यांना ठार मारण्यासाठी सीआरपीएफ जवान व कोब्रा बटालियनच्या ऑपरेशन दोन दिवसापासून सुरू आहे. हे दोन्ही मोठे माओवाद्यांचे नेते गडचिरोली जिल्हासह तेलंगाना छत्तीसगड झारखंड उडीसा या राज्यात माओवादी चळवळीत गेल्या 40 वर्षापासून काम करीत आहे
-
ज्वारी व मका खरेदी नोंदणीसाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी..
जळगावच्या पारोळा येथे शेतकी संघाबाहेर ज्वारी व मका खरेदी नोंदणीसाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी, दोन दिवसांपासून लागल्या मोठ्या रांगा. शासकीय ज्वारी व मका खरेदी ऑनलाइन नाव नोंदणी सुरू झाल्याच्या अफवेने शेतकऱ्यांची मोठी गर्दी झाली. ज्वारी – मका खरेदीसाठी नोंदणी सुरू झाल्याच्या अफवेने शेतकी संघाबाहेर शेतकऱ्यांच्या मोठा रांगा लागल्या असून दोन दिवसापासून शेतकऱ्यांचा मुक्काम आहे. दोन दिवसांपासून रांगेत थांबलेल्या शेतकऱ्यांच्या गर्दीमुळे प्रशासनाकडून तातडीने आदेश काढण्यात आले असून आजपासून नाव नोंदणीची प्रक्रिया पार पडणार.
-
बेळगाव सीमा प्रश्नावरून चंद्रकांत पाटील आणि जयंत पाटलांमध्ये रंगली जुगलबंदी
बेळगाव सीमा प्रश्नावरून सांगली मध्ये भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटलांमध्ये चांगलीचं जुगलबंदी रंगली.बेळगाववासी आशा लावून बसलेले आहेत,चंद्रकांतदादांना आमची जबाबदारी दिलेली आहे, पण चंद्रकांतदादाच भेटत नाही,त्यामुळे मी बेळगाव वासीयांचा निरोप घेऊन आलोय, असा मिश्किल टोला जयंत पाटलांना लगावला.
-
जळगाव जिल्ह्यात केळीची निर्यात थांबल्याने केळी पिकाला मोठ्या प्रमाणात फटका
शेतकऱ्यात तीव्र संताप. जिकडेतिकडे भोंदू बाबा अशोक खरात यांचाच विषय चालू आहे आमच्या शेतकऱ्याकडे लक्ष द्या. नुसतं फक्त अशोक खरात सर्वत्र दिसतो आम्ही शेतकरी नाही आमच्याकडे लक्ष द्या. आमच्या केळीला भाव नाही सतत नैसर्गिक संकट येत आहे काय करावे. सरकारचं लक्ष अशोक खरात कडे जास्त आमच्याकडे कमी झालं शेतकरी म्हणताय
-
पार्थ पवार लहान त्याच्यावर बोलणे योग्य नाही- नाना पटोले
नाना पटोले यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांनी म्हटले की, संजय राऊतांना त्यांच्याच पक्षात कोणी विचारात घेत नाही. पार्थ लहान आहे, त्याच्यावर बोलणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले.
-
वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या जैनमुनी नयन पद्मसागर यांच्याविरोधात ऑनलाईन तक्रार दाखल
सोलापुरातील फौजदार चावडी पोलीस स्टेशनमध्ये ऑनलाईन तक्रार दाखल करण्यात आली. मराठी क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक राम जाधव यांनी याविरोधात ऑनलाईन तक्रार दिलीय. महाराणी ताराराणी या जैन समाजाच्या होत्या असे चुकीचे वक्तव्य केले होते. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चाने 6 दिवसापूर्वी निवेदन दिले होते. मात्र जैनमुनीविरोधात गुन्हा दाखल होत नसल्याने अ
-
सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील वृक्षतोडीबाबत आज सुनावणी
सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील वृक्षतोडीबाबत आज सुनावणी होणार आहे. हरित लवादामध्ये आज सुनावणी होणार आहे. वकील श्रीराम पिंगळे वृक्षतोडीविरोधात भूमिका मांडणार आहेत. नाशिक शहरातील सगळ्या वृक्षतोडीबाबत हरित लवाद काय निर्णय देणार याकडे लक्ष लागून आहे. याचिकाकर्ते मनीष बाविस्कर यांनी याचिका दाखल केली आहे.
-
बीड – सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणाची आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयात सुनावणी
केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणाची आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयात सुनावणी होणार आहे. मागील सुनावणीत न्यायालयाने विशेष सरकारी वकील उज्वल निकम बदलण्याचा अर्ज फेटाळला होता. चार्ज फ्रेम झाल्यापासून खून, खंडणी आणि ॲट्रॉसिटी या मूळ प्रकरणाच्या युक्तिवादाला अद्याप सुरूवात झालेली नाही. यासंदर्भातील युक्तिवादाला आज सुरूवात होण्याची शक्यता आहे. तर आरोपींच्या संपत्ती जप्ती संदर्भातील निर्णय कोर्टाने राखून ठेवलेला आहे.
-
भोंदू अशोक खरात प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटी पथकाची आज पत्रकार परिषद
नाशिक – भोंदू अशोक खरात प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटी पथकाची आज पत्रकार परिषद होणार आहे. भोंदू खरात विरुद्ध नाशिकच्या सरकार वाडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांच्या अनुषंगाने माहिती देण्यात येईल. आठ एप्रिल रोजी भोंदू अशोक खरात याला कोर्टात हजर केलं जाणार असल्याने त्यापूर्वीच आज एसआयटीची पत्रकार परिषद घेण्यात येत आहे.
-
म्हाडाचा अर्थसंकल्प १६ हजार कोटींचा टप्पा ओलांडणार
मुंबई : गेल्या आर्थिक वर्षात म्हणजे २०२५-२०२६ साली १५,५६.९२ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मांडणारे म्हाडा येत्या दोन दिवसांत २०२६-२०२७ या नव्या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर करणार आहे. अर्थसंकल्पात म्हाडाच्या मुंबई, पुणे, कोकण, नाशिक, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर या मंडळांमार्फत किती सदनिकांचे बांधकाम करण्याचे उद्दिष्ट असेल, त्यासाठी किती कोटींची तरतूद करण्यात येईल? हे या निमित्ताने स्पष्ट होईल. यंदाचा अर्थसंकल्प १६ हजार कोटींचा आकडा ओलांडेल, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
-
त्रिभाषा सूत्रासाठी राज्य सरकार सीबीएसई पॅटर्न लागू करणार का? दोन आठवड्यांत निर्णय होण्याची शक्यता
सीबीएसईने त्रिभाषा सूत्र सहावीपासून लागू करण्याचा निर्णय घेतल्याने राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये ते कोणत्या इयत्तेपासून लागू करणार, की पुन्हा पहिलीपासून हिंदी किंवा अन्य तिसऱ्या भाषेची सक्ती केली जाणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे. सीबीएसईच्या निर्णयाचा आणि त्रिभाषा सूत्रासंदर्भात राज्य सरकारने नियुक्त केलेल्या माजी कुलगुरू डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालाचा अभ्यास करून लवकरच योग्य निर्णय घेतला जाईल, असे शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह यांनी स्पष्ट केले.
-
एनडीए परीक्षेमुळे १२ एप्रिलची पीसीए CET परीक्षा रद्द
यूपीएससीमार्फत घेण्यात येणाऱ्या एनडीए, सीडीएस परीक्षांमुळे १२ एप्रिलला होणारी इंजिनिअरिंग प्रवेशासाठीची पीसीएम ग्रुपची एमएचटी सीईटी परीक्षा रद्द करण्यात आली आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जारी केले आहे.
-
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला जन्मठेप; अमित जोगीला छत्तीसगड हायकोर्टाने सुनावली शिक्षा
रायपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रामावतार जग्गी यांच्या हत्येप्रकरणी माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचा पुत्र अमित जोगी याला छत्तीसगड उच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अमित हा कटाचा मुख्य सूत्रधार असल्याचं न्यायालयाने म्हटलंय. त्याला १,००० रुपयांचा दंडही ठोठावला आहे. राष्ट्रवादीचे नेते जग्गी यांच्या हत्येचा ठपका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते रामावतार जग्गी हे आपल्या कारमधून प्रवास करत असताना त्यांच्यावर ४ जून २००३ रोजी गोळीबार करण्यात आला. त्यांचा दुसऱ्या दिवशी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यावेळी अजित जोगी हे राज्याचे मुख्यमंत्री होते.
-
घाटकोपरमध्ये पुन्हा उफाळला मराठी-गुजराती वाद; शौचालय वापरल्याने तरुणाला मारहाण
घाटकोपर पूर्व इथल्या नालंदा सोसायटीत असलेल्या एका सार्वजनिक शौचालयाचा वापर केल्यामुळे अक्षय बांगरे या मराठी तरुणाने गुजराती व्यावसायिकाकडून मारहाण झाल्याचा आरोप केला. त्यानंतर तिथे पुन्हा मराठी विरूद्ध गुजराती वाद उफाळून आला आहे. याप्रकरणी पंतनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी या वादात उडी घेऊन आंदोलन केलं.
-
दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए..; भोंदू अशोक खरातचं चौकशीदरम्यान धक्कादायक विधान
नाशिक- “दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए..,” असं धक्कादायक विधान भोंदू अशोक खरातने चौकशीदरम्यान केलं. चमत्कार करून नव्हे तर हातचलाखीने महिलांना धमकावल्याची कबुली दिल्याची सूत्रांची माहिती आहे. भोंदू अशोक खरातला कोणताही पश्चाताप नसल्याचं समजतंय. जे काही केलं ते लोकांच्या मानसिकतेचा अभ्यास करून आणि विज्ञानाच्या ट्रिक्स वापरून केल्याची भोंदू खरातने कबुली दिली.
-
भोंदू बाबा अशोक खरातच्या मुलीची आज एसआयटी चौकशी होणार- सूत्र
भोंदू बाबा अशोक खरातच्या मुलीची आज एसआयटी चौकशी होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. खरातची मुलगी तृप्तबालाची आज SIT चौकशी होणार आहे. तृप्ताबालाच्या नावावर अशोक खरातने कोट्यवधी रुपयांच्या जमिनी आणि स्थावर मालमत्ता खरेदी केल्याचं तपासात समोर आलं होतं. खरातच्या आर्थिक गैरव्यवहारांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आज मुलीची चौकशी केली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
इराणला करार करण्यासाठी दिलेली मंगळवारची मुदत वाढवली जाणार नसल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलं. तसंच इराणने दिलेला शांतता प्रस्ताव पुरेसा नसल्याचं नमूद केलं. होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी अंतिम मुदत पाळली गेली नाही तर अमेरिका इराणचे ऊर्जा प्रकल्प आणि पायाभूत सुविधांवर हल्ले करेल, या इशाऱ्याचा ट्रम्प यांनी पुनरुच्चार केला. इराणला एका रात्रीत संपवू आणि ती रात्र आजची असेल, अशी धमकी ट्रम्प यांनी दिली. दुसरीकडे इराणने युद्ध समाप्तीचा प्रस्ताव फेटाळला. पुन्हा आमच्यावर हल्ला होणार नाही अशी हमी मिळाली तरच युद्ध समाप्ती स्वीकारू, असं इजिप्तमधील इराणी दूतावासाचे प्रमुख मोजतबा फरदौसी पोर यांनी सांगितलं. इराणने शस्त्रसंधीबाबत आपली भूमिका पाकिस्तानला कळवताना थेट अमेरिकेशी चर्चेस नकार दिला. प्रस्तावित शस्त्रसंधीचा कालावधी 45 दिवसांचाच असेल तर होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याची मागणीही इराणने फेटाळली. यासह राज्यातील इतर घडामोडी, देश-विदेश, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील अपडेट्स जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.
Published On - Apr 07,2026 8:02 AM
