राजा माणूस, देवेंद्र फडणवीस साहेब आम्हाला…, अन् मनोज जरांगे पाटलांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
आज धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे, या भेटीवर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे, तसेच त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांचं कौतुक देखील केलं आहे.

आज माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे, आपण आपल्या मतदारसंघातील कामासंदर्भात ही भेट घेतल्याचं स्पष्टीकरण या भेटीवर धनंजय मुंडे यांनी दिलं आहे. मात्र दुसरीकडे या भेटीवरून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्र्यांची आज जी भेट झाली ती विकास कामासंदर्भात झालेली नाही तर , घातपात प्रकरणावर या भेटीमध्ये चर्चा झाली असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. रश्मी शुक्ला यांना माझी विनंती आहे, जे घातपात करत असेल त्यांना वाचवू नका, फडणवीससाहेब तुम्ही या पापामध्ये सहभागी होऊ नका, अजित पवारांना देखील विनंती आहे, असं यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
अडीच कोटीची सुपारी घेतली त्या पोरांच्या कुटुंबांना मी दोष देणार नाही समाजाला सांगितले आहे, आरोपीच्या कुटुंबाना त्रास द्यायचा नाही. मला पोलिस संरक्षण नको. मी नार्को टेस्टसाठी तयार आहे. पण त्या तीन आरोपींची देखील नार्कोटेस्ट झाली पाहिजे. या प्रकरणात जर एसआयटी नेमली असेल तर दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल, मात्र अधिकारी चांगले नियुक्त करा, अशी मागणीही यावेळी जरांगे पाटील यांनी केली आहे.
फडणवीसांचं कौतुक
दरम्यान यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक देखील केलं आहे. माझ्या घातपाताच्या प्रकरणात जर एसआयटी नेमली असेल तर देवेंद्र फडणवीस यांचं मी जाहीर कौतुक करतो. आता फडणवीस नीट काम करायला लागले आहेत. पूर्वीचे देवेंद्र फडणवीस साहेब आम्हाला पुन्हा दिसायला लागले आहेत, अन्यायाच्या विरोधात लढणारे फडणवीस आम्हाला पुन्हा दिसायला लागले आहेत. जर या संदर्भात एसआयटी नेमली असेल तर तुम्ही राजा माणूस आहात, अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीस यांचं कौतुक केलं आहे. आमच्या जालन्याचे पोलीस अधिकारी खमक्या आहेत, कोणी आमदार असू दे नाहीतर मंत्री असू दे ते त्याला तंगडीला धरून आणणार, पण अजून तसे काम झाले नाही, चौकशीला बोलावले नाही, असंही यावेळी जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
