बेस्टच्या कंत्राटी बसची टींग टींग बंद !
कंत्राटी बसेसच्या डिझाईनमुळे प्रवाशांना गर्दीच्या वेळी बसमधून उतरताना त्रास होतो आहे. तसेच या कंत्राटी बसेसमध्ये इतरही अनेक दोष आहेत.

मुंबई : बेस्टने आपल्या ताफ्यात अर्ध्याहून अधिक वेट लिजेसच्या म्हणजेच भाडेतत्वावरील बसेसचा भरणा करण्याचा निर्णय घेतला आहे. या बसेसमध्ये टाटाच्या मार्कोपोलो कंपनीच्या साध्या बसेसच्या डिझाईनमध्ये जरा गडबड असल्याने प्रवाशांना तर त्रास होतोच आहे. शिवाय महिला कंडक्टरांना एका वेगळ्याच समस्येला समोरे जावे लागत आहे.
सध्या बेस्टच्या ताफ्यात 1900 वेट लिजेसच्या कंत्राटी बसेसचा भरणा झाला आहे. सध्या बेस्टमध्ये तीन महिला ड्रायव्हर तर 22 हून अधिक महिला कंडक्टरची भरती करण्यात आली आहे. कंत्राटी बसेसच्या डिझाईनमुळे प्रवाशांना गर्दीच्या वेळी बसमधून उतरताना त्रास होतो आहे. तसेच या कंत्राटी बसेसमध्ये इतरही अनेक दोष आहेत.
टाटा मार्कोपोलो कंपनीच्या या साध्या विना एसी बसेस सध्या प्रतिक्षानगर आगारातून सोडल्या जात आहेत. प्रतिक्षानगर आगाराचे संपूर्ण खाजगीकरण झाले आहे. प्रतिक्षानगर आगारात सध्या कंत्राटी तत्वावरील महिला कंडक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. या महिला कंडक्टरना त्यांच्या कंत्राटदारांकडून 20 हजाराचे आश्वासन देऊन प्रत्यक्षात तेरा ते चौदा हजार वेतन दिले जात आहे.
टाटा कंपनीच्या मार्कोपोलो कंपनीच्या साध्या बसेसचा आतले इंटेरिअर चुकीचे आहे. त्यामुळे बसच्या वाहतूकीच्या दृष्टीने महत्वाची असलेली कंडक्टरच्या बेलची दोरी इतकी वर गेलेली आहे की बेल वाजविण्यासाठी साधारण उंचीच्या पुरुष कंडक्टरना त्रास होत आहे. तर महिला कंडक्टरना तर बेलची दोरीच हाती येत नसल्याने बेल वाजविणे शक्य होत नाही. त्यामुळे ड्रायवरना बेल शिवायच अंदाज घेत बस चालवावी लागत आहे.
हे कंत्राटी चालक आणि वाहक मुंबई बाहेरचे असल्याने यांना मुंबईतल्या रस्त्यांची फारशी माहिती नसताना थेट त्यांना बसचा ताबा दिला जात असल्याने प्रवाशांना धोका निर्माण झाला आहे. बेस्टचे हे वाहक सतत नोकरी बदलत असल्याने त्यांच्याकडून एखादा गुन्हा घडल्यास आतापर्यत बेस्टने कमविलेल्या प्रतिमेला तडा जाण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. बेस्टच्या कंत्राटी वाहकात महिला कंडक्टरची भरती करताना त्यांची उंची आणि शारीरिक क्षमतेचा विचार केलेला नसल्याचा आरोप बेस्टचे सदस्य सुनील गणाचार्य यांनी केला आहे.
