मंत्रिमंडळात मोठा फेरबदल; कुणाला मिळणार डच्चू? माणिकराव कोकाटेंबाबत काय निर्णय? राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
Big reshuffle in the state cabinet : सध्या आमदार आणि मंत्र्यांभोवती वादाची झालर वाढत आहे. त्यामुळे सरकार अडचणीत आले आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने मोठा बॉम्बगोळा टाकला आहे.

कँटिन कंत्राटदारांना मारहाण, जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर, हनी ट्रॅप, कृषीमंत्र्यांचा रमी वाद यामुळे राज्य सरकार अडचणीत आले आहे. एका मागून एक प्रकरणं समोर येत आहेत. विरोधक राळ उडवत आहेत. त्यामुळे जनमाणसात सरकारची प्रतिमा डागळत असल्याचा आरोप होत आहे. या सर्व घडामोडींवर मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होण्याचा आणि प्रगती पुस्तकाआधारे काहींना डच्चू मिळण्याचे सूतोवाच राष्ट्रवाटीच्या बड्या नेत्याने केले आहे. काय आहे तो दावा?
ऑडीट झाल्यानंतर कुणाला डच्चू?
मुख्यमंत्र्यांनी १०० दिवसांचा कार्यक्रम दिला होता, त्यानुसार मंत्र्यांच्या कामाचं ॲाडीट झालंय. कोण मंत्री कसा काम करतो, काय करोत याचं ॲाडीट पूर्ण, यानुसार ॲाडीटमध्ये फेल झालेल्या मंत्र्यांमध्ये बदल होतील. मंत्री माणीकराव कोकाटे यांच्यावरील आरोपाच्या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे वरिष्ठ नेते धर्मरावबाबा आत्राम यांचे मंत्रिमंडळात बदलाचे संकेत दिले आहेत.
मंत्रिमंडळात मोठा फेरबदल
मंत्रिमंडळात बदल होईल, असं वातावरण सध्या दिसत आहे. काही बदल होतील. मंत्रिमंडळात काही बदल होतील, कारण एनर्जी असलेले मंत्री हवे, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना परफॉर्मन्स हवा आहे, असे संकेत आत्राम यांनी दिले. त्यामुळे येत्या काही दिवसात मंत्रिमंडळात नवीन चेहरे दिसतील. खांदापालट होईल. काही मंत्र्यांना डच्चू मिळेल असे म्हटले जात आहे.
कोकाटे यांना आत्राम यांचा टोला
मी त्या तुलनेत तरुण नेता, माझ्या कार्यशैलीनुसार माझं वय ३०-३५ आहे. नवीन मंत्री असताना काही शिकायचं आहे, असा टोला त्यांनी कोकाटे यांना लगावला. मी पाच वेळा आमदार राहिलो, मंत्री राहलो, चांगल्या शाळेत शिकलो. आम्हाला माहित आहे. कसं वागायचं मानसन्मान कसा ठेवायचा, आम्हाला माहित आहे, असा चिमटा त्यांनी काढला. मंत्री असताना जबाबदारी असते, कोड ॲाफ कंडक्ट असतात. तसं वागायला हवं. मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या बाबत उपमुख्यमंत्री अजित पवार निर्णय घेतील, असे ते म्हणाले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत संभाव्य उमेदवारांची यादी तयार करण्यात आली आहे. प्रत्येक सर्कलमध्ये संभाव्य चार उमेदवारांची यादी तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आमची बुथकमिटी, स्थानिक बांधणी सुरु असल्याचे ते म्हणाले. तर उपमुख्यमंत्री अजित पवार पूर्व विदर्भाचा दौरा करणार असल्याची माहिती धर्मरावबाबा आत्राम यांनी दिली.
