तुम्ही व्हिडीओ शूटिंग का करताय…; मुंबईत मध्यरात्री राडा, नेमकं काय घडलं?
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या नाकाबंदी दरम्यान विलेपार्ले येथील मिलन सबवे परिसरात निवडणूक आयोगाच्या नोडल ऑफिसर आणि व्हिडीओग्राफरला मारहाण करण्यात आली. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी पोलिसांनी इफ्तिखार अहमद याला अटक केली आहे.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात चोख सुरक्षा व्यवस्था आणि नाकाबंदी लागू करण्यात आली आहे. त्यातच आता मुंबईतील विलेपार्ले परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. निवडणूक आयोगाच्या स्टॅटिक सर्व्हे टीम (SST) च्या नोडल ऑफिसरसह त्यांच्या सहकाऱ्यांना मारहाण आणि शिवीगाळ करण्यात आली. याप्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. इफ्तिखार अहमद मोहम्मद अहमद असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
नेमकं प्रकरण काय?
निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, विलेपार्ले येथील मिलन सबवे परिसरात वाहनांची तपासणी करण्यासाठी तपासणी केंद्र उभारण्यात आले आहे. रविवारी, २८ डिसेंबर रोजी पहाटे १.२५ सुमारास, मुंबई महापालिकेच्या के-ईस्ट विभागातील कनिष्ठ पर्यवेक्षक आणि नोडल ऑफिसर सुरेश जानू राठोड हे आपल्या पथकासह तैनात होते. यावेळी तपासणीसाठी त्यांनी एक पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी स्विफ्ट कार (MH 19 CX 3117) थांबवली.
निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, या तपासणीचे चित्रीकरण करण्यासाठी पथकासोबत असलेले व्हिडीओग्राफर धीरज पांचाळ रेकॉर्डिंग करत होते. मात्र, कारच्या मागच्या सीटवर बसलेल्या इफ्तिखार अहमद याने व्हिडीओ शूटिंगला तीव्र विरोध दर्शवला. यावेळी इफ्तिखार अहमद याने तुम्ही शूटिंग का करत आहात? असा जाब निवडणूक अधिकाऱ्याने विचारला. तो आरोपी गाडीतून खाली उतरला. यानंतर व्हिडीओग्राफरने हे अधिकृत निवडणूक कर्तव्य असल्याचे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला.
मात्र संतापलेल्या इफ्तिखारने पांचाळ यांच्यावर हल्ला केला. यावेळी मध्यस्थी करण्यासाठी गेलेले नोडल ऑफिसर सुरेश राठोड यांनाही आरोपीने मारहाण केली. आरोपीने केवळ सरकारी कामात अडथळा आणला नाही. तर संपूर्ण पथकाला सार्वजनिक ठिकाणी शिवीगाळ करत भविष्यात बघून घेण्याची धमकीही दिली. या घटनेनंतर सुरेश राठोड यांनी विलेपार्ले पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांकडून गंभीर दखल
पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या खालील कलमांनुसार गुन्हा (FIR No. 0942/2025) दाखल केला आहे. यानुसार कलम १३२ नुसार सरकारी कर्मचाऱ्याला कर्तव्य बजावण्यापासून रोखण्यासाठी हल्ला करणे, कलम ११५(२) स्वेच्छेने दुखापत करणे, कलम ३५२: शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमान करणे, कलम ३५१(२) गुन्हेगारी धमकी देणे या अंतर्गत कारवाई करण्यात आली. निवडणूक काळात कर्तव्यावर असलेल्या अधिकाऱ्यांवरील हल्ल्याची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. निवडणूक प्रक्रियेत अडथळा आणणाऱ्यांविरुद्ध कोणतीही गय केली जाणार नाही, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
