करोना व्हायरस : मुंबई विमानतळावर 3,997 प्रवाशांची तपासणी, 8 संशयित रुग्णालयात

करोना विषाणूची खबरदारी म्हणून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आतापर्यंत 3,997 प्रवाशांना तपासण्यात आलं आहे. यापैकी 18 प्रवासी हे महाराष्ट्रातील आहेत.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 22:10 PM, 28 Jan 2020
करोना व्हायरस : मुंबई विमानतळावर 3,997 प्रवाशांची तपासणी, 8 संशयित रुग्णालयात

मुंबई : करोना विषाणूची खबरदारी म्हणून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आतापर्यंत 3,997 प्रवाशांना तपासण्यात आलं आहे. यापैकी 18 प्रवासी हे महाराष्ट्रातील आहेत (Corona Virus). यातील आठ प्रवाशांना खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामध्ये मुंबईतील 5 प्रवाशांना कस्तुरबा रुग्णालयात, 2 प्रवाशांना पुण्यातील नायडू रुग्णालयात, तर एका प्रवाशाला नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भरती करण्यात आलं आहे (Corona Virus). यापैकी मुंबईतील 3 प्रवाशांचे प्रयोगशालेय नमुने निगेटिव्ह आल्याचे एनआयव्ही, पुणे यांनी कळवले आहे. या सर्व प्रवाशांचे नमुने एनआयव्ही पुणे येथे पाठविण्यात आले असून उर्वरित प्रवाशांचे प्रयोगशाळा निदान उद्यापर्यंत मिळणार आहे. मात्र, राज्यात एकही पॉझीटिव्ह रुग्ण आढळून आला नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

राज्य शासनाच्या आरोग्य विभागामार्फत चीन आणि विशेष करुन वुआन प्रांतातून आलेल्या प्रवाशांची विमानतळावर तपासणी केली जात आहे. गेल्या 1 जानेवारी पासूनच्या प्रवाशांची यादी विमानतळ प्राधिकरणाकडून घेण्यात येत असून त्यातील महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या प्रवाशांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्यात येत आहे. त्यांना सर्दी, ताप किंवा तत्सम लक्षणे आढळली आहेत का? किंवा कुटुंबातील सदस्यांना जाणवत आहे का? याबाबत विचारणा केली जात आहे.

महापालिका क्षेत्रातील अशा प्रवाशांशी महापालिकेचे आरोग्य अधिकारी संपर्क साधतील, तर ग्रामीण भागातील प्रवाशांना आरोग्य विभागाचे अधिकारी दूरध्वनीवरुन संपर्क साधत आहेत.

महाराष्ट्रात सध्यातरी करोना विषाणूचा धोका मोठ्या प्रमाणावर नाही. मात्र, आपत्कालीन परिस्थिती उद्‌भवल्यास त्यास तोंड देण्यासाठी यंत्रणेने पूर्वतयारी केली आहे. ‘करोना’रुग्णांसाठी मुंबईत कस्तुरबा आणि पुणे येथे नायडू रुग्णालयात विलगीकरण कक्ष आहेत.

कोरोना विषाणूची लक्षणं

कोरोना विषाणूने मृत्यू झालेल्यांचं वय सरासरी 73 वर्ष आहे. मृतांमध्ये सर्वाधिक वयाची व्यक्ती 89 वर्षांची होती, तर सर्वात कमी वयाची व्यक्ती 48 वर्षांची होती.

नाक गळणं, खोकला, घसा खवखवणे, डोके दुखी आणि ताप ही कोरोना विषाणूची लक्षण आहेत. कमकुवत रोगप्रतिकारशक्ती असलेल्या लोकांना या विषाणूची लागण लवकर होते. वयस्कर आणि लहान मुलांना या विषाणूची लागण सहज होते. निमोनिया, फुफ्फुसांमध्ये सूज, शिंका येणे, दमा इत्यादीही या विषाणूची लक्षणं असू शकतात.

विषाणूपासून बचावाचे उपाय

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी, कमी करण्यासाठी काही खबरदारी घेण्यास सांगितले आहे. संयुक्त राष्ट्राने ट्वीट करत यापासून बचावाचे उपाय सांगितले आहेत.

1. हात साबणाने स्वच्छ धुवावे.
2. खोकताना किंवा शिंकताना नाकावर आणि तोडांवर रुमाल ठेवावा.
3. ज्यांना सर्दी किंवा तापाची लक्षणं असतील त्यांनी गर्दीत जाणे टाळावं.
4. मांस आणि अंडी नीट शिजवून घ्यावी.
5. जंगल किंवा शेतात काम करणारे, राहणाऱ्यांनी जनावरांपासून सुरक्षित अंतर ठेवावे.

कोरोना विषाणूवर उपचार

कोरोना विषाणूचा अद्याप कुठलाही उपचार किंवा निदान सापडलेलं नाही. कोरोना विषाणूवर अद्याप कुठलीही वॅक्सीन उपलब्ध नाही. यापासून बचावाचा एकच उपाय आहे आणि तो म्हणजे काळजी घेणे. कुठल्याही आजारी व्यक्ती, सर्दी, निमोनियाग्रस्त व्यक्तीच्या संपर्कात येणे टाळा. मास्क घाला. डोळे, नाक आणि तोडांला स्पर्श करणे टाळा. नेहमी हात स्वच्छ धुवा.

Passengers Screened At Mumbai Airport