त्या आपटेला आपटावेसेच वाटते, जितेंद्र आव्हाड संतापले, ट्विट करत…
Jitendra Awhad on Jaydeep Apate : छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला. यावरून सध्या वातावरण तापलं आहे. अशातच महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत या प्रकरणातील आरोपी जयदीप आपटेवर टीका केलीय. वाचा...

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात आला होता. पण उद्घाटनानंतर आठ महिन्यात शिवरायांचा हा पूर्णाकृती पुतळा कोसळला. यावरून महाराष्ट्राचं समाजकारण, राजकारण ढवळून निघालं आहे. महाविकास आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. 1 सप्टेंबरला मुंबईत महाविकास आघाडी आंदोलन करणार आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी पुतळा कोसळ्याच्या प्रकरणातील आरोपी जयदीप आपटेवर जोरदार टीका केली आहे. या आपटेला आपटावासा वाटतोय!, असं ते म्हणालेत.
जितेंद्र आव्हाड यांनी एक्स (ट्विटर)वर ट्विट करत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळण्या प्रकरणातील आरोपीवर टीका केली आहे. आपल्या महाराजांवर वार करणाऱ्या कृष्णा कुलकर्णीच्या औलादी आजही जीवंत आहेत, असं म्हणत आव्हाडांनी टीकास्त्र डागलं आहे. जयदीप आपटेच्या जुन्या एका व्हीडिओचाही दाखला जितेंद्र आव्हाडांनी दिलाय.
जितेंद्र आव्हाड यांचं ट्विट
मालवणच्या राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणारा जयदीप आपटे हा फेसबुकवर आपल्या एका मित्राशी माजल्यासारखा बोलतो. त्याचा मित्रही याच्यासारखाच; पुतळ्याच्या डोक्यावर आठवणीची खूणही ठेवली आहेस, असे तो म्हणतो. त्यावर आपटे, ” पुतळा बनवताना पूर्ण अभ्यास करावा लागतो.” असे सांगतो. जर आपटेने पुतळा साकारताना हाच अभ्यास केला असता तर महाराष्ट्राला अपमानित व्हावे लागले नसते. या निमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झाले की आपल्या महाराजांवर वार करणाऱ्या कृष्णा कुलकर्णीच्या औलादी आजही जीवंत आहेत.
कुलकर्ण्याने केलेला तो वार फक्त महाराजांवर नव्हता, तर तो वार स्वराज्यावर होता. म्हणूनच महाराजांनी आपल्या तलवारीने कुलकर्ण्याचे मुंडके छाटले, हा इतिहास आहे. परंतु,दोन मित्रांमधील फेसबुकवरील चर्चा आणि त्यामध्ये महाराजांच्या डोक्यावरील खुणेचा उल्लेख करून ती दाखवणे… किळस येते ! या आपटेला आपटावासा वाटतोय!!
मालवणच्या राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणारा जयदीप आपटे हा फेसबुकवर आपल्या एका मित्राशी माजल्यासारखा बोलतो. त्याचा मित्रही याच्यासारखाच; पुतळ्याच्या डोक्यावर आठवणीची खूणही ठेवली आहेस, असे तो म्हणतो. त्यावर आपटे, ” पुतळा बनवताना पूर्ण अभ्यास करावा लागतो.” असे…
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) August 29, 2024
जयदीप आपटे फरार
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे आणि बांधकाम सल्लागार डॉ. चेतन पाटील याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयदीप आपटे हा सध्या फरार आहे. पोलीस आणि सिंधुदुर्ग एलसीबी अर्थात गुन्हे अन्वेषण विभागाचं पथक जयदीप आपटेचा शोध घेत आहेत.
