Ladki Bahin Yojana : या लाडक्या बहिणींवर मोठे संकट! पती/वडील नाही हयात, कुणाचे जोडणार आधार कार्ड? सरकार काय उपाय करणार?
Husband/Father is not alive : लाडक्या बहिणींचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरूवात झाली आहे. काहींच्या बँक खात्यात ही रक्कम जमा झाली आहे. पण ई-केवायसीतील एक मोठी अट काही लाडक्या बहिणींची काळजी वाढवणारी ठरली आहे.

Ladki Bahin Yojana Aadhar Card Link : लाडक्या बहिणींचा सप्टेंबर महिना जमा होत असल्याने राज्यातील महिला आनंदून गेल्या आहेत. त्यांना दिवाळीपूर्वीच थोडीफार रक्कम हाती आली आहे. नोव्हेंबर महिन्यापर्यंत ई-केवायसीची प्रक्रिया सुद्धा पूर्ण करावी लागणार आहे. अनेक महिला ई-केवायसीसाठी मोठी कसरत करत असल्याचे दिसते. साईट डाऊन झाल्यावर त्यांना ताटकाळत थांबावे लागते. तर डोंगराळ भागातील महिलांना रेंजसाठी उंच भागावर जावे लागत असल्याचे समोर येत आहे. त्यातच ई-केवायसी करताना पती अथवा वडिलांचे आधार कार्ड जोडण्याची नवीन अट काही महिलांसाठी मोठी जाचक ठरत आहेत. त्यांना आता लाडकी बहीण योजनेला कायमचे मुकावे लागणार की काय अशी भीती सतावत आहे. याप्रकरणी सरकारने तातडीने उपाय सांगावा अशी मागणी करण्यात येत आहे.
राज्यात अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी सुरू करण्यात आली आहे. त्यात एकाच घरातील तीन अथवा त्यापेक्षा अधिक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. 1 लाख 4 हजार महिला आता या योजनेच्या लाभापासून वंचित होतील. या बहिणींचे 1500 रुपयांचे मानधन तातडीने थांबवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. राज्यात 26 लाख संशयित लाभार्थ्यांची छाननी प्रक्रिया सुरू आहे. तर काही भाऊरायांनी या योजनेवर डल्ला मारल्याचे समोर आले होते. छाननी प्रक्रिया सुरूच असल्याने अजूनही काही बहाद्दर समोर येण्याची शक्यता आहे.
काय आहे ई-केवायसी
बोगस लाभार्थी ओळखण्यासाठी आणि पात्र लाभार्थ्याला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यासाठी ई-केवायसी योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेसाठी स्वतंत्र संकेतस्थळ ladakibahin.maharashtra.gov.in आहे. यावर अथवा ई महासेवा केंद्रावर महिलांना ईकेवायसी पूर्ण करता येणार येईल. प्रत्येक लाभार्थी महिलांना ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. याविषयीची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. ई-केवायसी करण्यासाठी सरकारने मोठी मुदत दिली आहे. सणासुदीमुळे महिलांवरील कामाचा ताण पाहता केवायसी प्रक्रियेसाठी दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. नोव्हेंबरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
वडील/पती हयात नसलेल्या महिलांची अडचण
या योजनेत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आधार कार्ड, पासरपोर्ट साईज फोटो, रहिवाशी दाखला, रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र उत्पन्नाचा दाखला, बँक खात्याची सविस्तर माहिती, पती अथवा वडिलांचे आधार कार्ड क्रमांक नोंदवावा लागणार आहे. तरच eKYC प्रक्रिया पूर्ण होईल. पण ज्या महिलांचे वडील/पती हयात नाहीत, त्यांची अडचण होत आहे. त्यांच्यासाठी नवीन निर्देश देण्याची मागणी करण्यात येत आहेत. नाहीतर त्यांचा हप्ता कायमचा बंद होण्याची भीती त्यांना वाटत आहे.
