ज्या कंपनीमुळे आरोग्य भरती परीक्षा रद्द झाली, ती कुणाची, कुठली?, आरोग्यमंत्री माफी मागून मोकळे!

ज्या कंपनीमुळे हजारो विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला, आर्थिक भुर्दंड सोसावा लागला, ती कंपनी नेमकी कुणाची, कुठली, जर कंपनी परीक्षा घेण्यास असमर्थ होती, तिच्या कारभारावरट पहिल्यापासून प्रश्नचिन्ह होतं तर तिला कंत्राट का दिलं?, असे सवाल आता विद्यार्थी विचारु लागले आहेत.

ज्या कंपनीमुळे आरोग्य भरती परीक्षा रद्द झाली, ती कुणाची, कुठली?, आरोग्यमंत्री माफी मागून मोकळे!
राजेश टोपे

अवघ्या 12 तासांवर परीक्षा आलेली असताना रात्री उशिरा सरकारने आरोग्य भरती परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. परीक्षा घेण्यास कंपनी असमर्थ आहे, असं कारण देत ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. तसंच विद्यार्थ्यांना झालेल्या त्रासाबद्दल त्यांनी माफीही मागितली. पण प्रश्न इथेच संपत नाही. ज्या कंपनीमुळे हजारो विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला, आर्थिक भुर्दंड सोसावा लागला, ती कंपनी नेमकी कुणाची, कुठली, जर कंपनी परीक्षा घेण्यास असमर्थ होती, तिच्या कारभारावरट पहिल्यापासून प्रश्नचिन्ह होतं तर तिला कंत्राट का दिलं?, असे सवाल आता विद्यार्थी विचारु लागले आहेत.

कंपनी नेमकी कुठली?

आरोग्य विभागाच्या परीक्षा पुढे ढकलल्याने राज्यभरातील विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. मात्र या परीक्षेच्या नियोजनाचं काम ज्या न्यासा कम्युनिकेशन या कंपनीला आरोग्य विभागाने दिल होतं त्या कंपनीच्या अकार्यक्षमतेमुळे परीक्षा पुढे ढकलावी लागली, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलंय. या कंपनीबाबत माहिती घेतली असता ही मूळ दिल्लीची कंपनी असून अशा प्रकारच्या परिक्षांचे आयोजन त्यासोबत परीक्षांचे नियोजन करण्याचं काम ही कंपनी करते.

कंपनीचं कार्यालय कुठे?

या कंपनीचे एक कार्यालय मुंबईतील नरिमन पॉइंट इथल्या डालामाल टॉवर या इमारतीत असल्याचं या कंपनीच्या संकेतस्थळावर सांगण्यात आलंय. टीव्ही 9 मराठीच्या टीमने तिथे भेट दिली असता आज मात्र हे कार्यालय बंद असून तिथे कुठल्याही प्रकारचं काम सुरु नाहीये. शिवाय या संकेतस्थळावर देण्यात आले संपर्क क्रमांक देखील बंद आहेत.

परीक्षेच्या आयोजनापासून नियोजनापर्यंत गोंधळच गोंधळच!

या कंपनीने आरोग्य विभागाची परीक्षा घेण्यास असमर्थता दर्शवली असं सांगण्यात जरी असलं तर त्याची कारणं किंवा अधिकृत स्टेटमेंट कंपनीकडून अद्याप मिळालेले नाहीय. हॉल तिकीट गोंधळापासून ते परीक्षेचे नियोजन करण्यापर्यंत अगदी सुरुवातीपासूनच या कंपनीचा गोंधळ होता. कंपनीचं जिथे कार्यालय आहे तिथे ना कोणत्या प्रकारचा बोर्ड आहे ना कंपनीचं नाव… त्यामुळे कंपनीचा नेमका काय सावळा गोंधळ सुरु आहे, असे सवाल आता उपस्थित होऊ लागलेले आहेत.

परीक्षा होणारच, जाहीर केलेल्या जागा भरणारच, त्रासाबद्दल माफी मागतो- टोपे

आरोग्य विभागाची परीक्षा रद्द झालेली नसून पुढे ढकलण्यात आलेली आहे. जाहीर केलेल्या जागा कोणत्याही परिस्थिती भरणारच आहे. कंपनीने असमर्थता दाखविल्यमुळे परीक्षा रद्द करण्याची नामुष्की ओढावली. पण विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. मी विद्यार्थ्यांची माफी मागतो. पण विद्यार्थ्यांनी काळजी करु नये. येत्या काहीच दिवसांत परीक्षेच्या तारखेची घोषणा केली जाईल, असं स्पष्टीकरण आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलं.

राज्यात आज आणि उद्या (शनिवार आणि रविवार ता. 25 आणि 26 सप्टें) आरोग्य विभागाच्या गट क व गट ड पदाची परीक्षा (Maharashtra Health Department Exam) घेतली जाणार होती. मात्र कंपनीच्या असमर्थततेमुळे परीक्षा रद्द केल्याची प्रतिक्रिया राजेश टोपे यांनी दिली. मात्र शासनाने रात्री उशिरा हा निर्णय घेतल्याने हजारो विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली. परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी कुणी प्रवास करत होतं. तर कुणी अगोदरच पोहोचलं होतं. मात्र शासनाने परीक्षेला जेमतेम 12 तास बाकी असताना हा निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

(maharashtra Government postpones recruitment Exam For 6200 Post In health Department Nyasa PVT LTD not able to make Arrangement For Exam)

हे ही वाचा :

परीक्षा होणारच, जाहीर केलेल्या जागा भरणारच, झालेल्या त्रासाबद्दल माफी मागतो : राजेश टोपे

आरोग्य विभागाची परीक्षा पुढे ढकलली, विद्यार्थ्यांना त्रास झाला, मनापासून माफी मागतो, आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI