Kunbi Certificate: कुणबी प्रमाणपत्रावरून मनोज जरांगे भडकले; म्हणाले मुद्दामहून अधिकारी…
Kunbi Certificate: मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात मराठा समाजातील अर्जदारांना कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यात येत आहे. पण त्यावरून मनोज जरांगे पाटील भडकले आहेत. त्यांनी अधिकाऱ्यांवर मोठा आरोप केला आहे. त्यावरून आता वाद होण्याची शक्यता आहे.

राम दखणे/प्रतिनिधी/जालना: मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात मराठा समाजातील अर्जदारांना कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यात आले आहे. कुणबी नोंदी सापडल्यानंतर पुढील प्रक्रियेनंतर अर्जदारांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येत आहे. पण हा आकडा 100 च्या आत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनानंतर 2 सप्टेंबर रोजी हैदराबाद गॅझेटियर जीआर निघाला. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात साडेतीन महिन्यांमध्ये मराठा समाजाला केवळ 98 कुणबी ओबीसी प्रमाणपत्रे वाटप करण्यात आले आहे. कुणबी प्रमाणपत्रासाठी 594 जणांनी अर्ज केले होते. 98 अर्ज मंजूर झाल्यानंतर प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी संताप व्यक्त केला आहे.
कुणबी प्रमाणपत्र वाटपात दिरंगाई
सरकार या प्रक्रियेत दिरंगाई करत आहे आणि मराठवाड्यातले काही अधिकारी सुद्धा याला दिरंगाई करत आहे. हैदराबाद गॅझेट निघाल्यानंतर जी गती त्यांनी घ्यायला पाहिजे होती ती मुद्दामहून घेतली नसल्याचा मनोज जरांगे पाटील यांनी केला. सरकारने स्वतः मुख्यमंत्री आणि विखे पाटलांनी यामध्ये पुढाकार घ्यावा आणि अधिकाऱ्यांना स्वतः सूचना दिल्या पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.
तातडीने कुणबी प्रमाणपत्र देण्याचा आदेश काढा
हैदराबाद गॅझेट प्रमाणे जे अर्ज आहे त्यांना तातडीने कुणबी प्रमाणपत्र द्या असा एक आदेश काढायला पाहिजे अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. मराठा समाजात एक गोष्ट लक्षात घ्यावी कोणी गैरसमज पसरवला तर त्यावर आपण विश्वास ठेवू नका असे आवाहनही त्यांनी केले. 1994 ला जीआर निघाला आणि आजपर्यंत सुद्धा ओबीसीचे लोक प्रमाणपत्र काढत आहेत. हैदराबाद गॅझेटचा जीआर निघालेला आहे, त्यामुळे आपल्याला आता धक्का नाही आपण कधीही प्रमाणपत्र काढू शकतो असं देखील जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
तातडीने गाव पातळीवरील समित्या गठीत केल्या पाहिजे, जर समित्या गठीत केल्या नाही तर मराठा समाजाला माझी विनंती आहे की तहसीलदाराकडे अर्ज लिहून द्या, जर ते म्हणाले की आम्हाला सरकारचा आदेश नाही तर मग आपण बघू, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला. हैदराबाद गॅझेटचा जीआर काढला आणि मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी गाव पातळीवर समित्या गठीत करायला पाहिजे होत्या त्या जाणून बोलून केल्या नाही.
शिंदे समितीने ज्या नोंदी दिल्या आहेत त्याचे कुणबी प्रमाणपत्र दिले जात नाही असा हल्लाबोल जरांगे पाटील यांनी केला. फडणवीस आणि विखे यांनी जो जीआर काढला त्यानुसार मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायला पाहिजे होते. पण दिले नाही याचा अर्थ सरकार आणि अधिकारी जाणून बोलून दिरंगाई करत आहे, जीआर झालेत त्या अर्जावर कारवाई करत नाही. येत्या एक तारखेपासून मराठा समाजातील लोकांना अर्ज करण्यासाठी आवाहन करणार असल्याची माहिती जरांगे पाटील यांनी केले.
